Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

आता स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात इलेक्ट्रिक सायकल

Share

नाशिक | प्रतिनिधी

शहरात सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी आणि पर्यावरण संतुलन  राखण्यासाठी नाशिक स्मार्ट सिटी कंपनीअंतर्गत शंभर ठिकाणी सुरू झालेल्या पब्लिक बायसिकल शेअरिंग (सार्वजनिक सायकल सुविधा) प्रकल्पास मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर आता कंपनीकडून जुलैच्या पहिल्या आठवड्यात इलेक्ट्रिक सायकल आणण्यात येणार आहे. यामुळे या प्रकल्पास मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

नाशिक स्मार्ट सिटी कंपनी आणि हॅक्सा सायकल यांच्या संयुक्त विद्यमाने पब्लिक बायसिकल शेअरिंग हा प्रकल्प सुरू करण्यात आल्यानंतर त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. नागरिकांकडून या सायकलला मोठी पसंती मिळत असून सायकल शेअरिंग अ‍ॅप डाऊनलोड करणार्‍यांची संख्या २५ हजाराच्या वर गेली आहे. शहरात शंभर स्टेशन्सवर सध्या शंभर सायकल ठेवण्यात आल्या आहेत.

नाशिक शहरात सार्वजनिक वाहतुकीला चालना देणे, प्रदूषणमुक्त शहर ठेवणे या संकल्पनेतून स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत पर्यावरणपूरक, आरोग्यास हितकारक आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असा पब्लिक बायसिकल शेअरिंग हा प्रकल्प नाशिककरांच्या पसंतीस पडला आहे. हेच लक्षात घेत आता स्मार्ट सिटीकडून पुढचे पाऊल म्हणून इलेक्ट्रिक सायकल आणल्या जाणार आहेत. या सायकललादेखील नाशिककरांची मोठी पसंती लाभेल, असा विश्‍वास स्मार्ट सिटीच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

या उपक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात २५ इलेक्ट्रिकल सायकल आणल्या जाणार असून जुलैच्या पहिल्या आठवड्यात त्या शहरातील तीन स्टेशनवर ठेवल्या जाणार आहेत. यात गोल्फ क्लब मैदान, दिंडोरी नाका परिसर व पशुसंवर्धन विभाग कार्यालय दवाखाना अशा तीन ठिकाणांचा समावेश आहे. या इलेक्ट्रिक सायकलला प्र्रतिसाद मिळाल्यास दुसर्‍या टप्प्यात शहरात या सायकलची संख्या ५०० पर्यंत नेण्यात येणार असून यानुसार नियोजन करण्यात येत आहे.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!