Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

निफाड : नेते अन् कार्यकर्ते आकडेमोडीत दंग

Share

निफाड। प्रतिनिधी

निफाड विधानसभा मतदारसंघात यावेळी विक्रमी २ लाख १ हजार ६९० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने यावेळी वाढलेले मतदान कोणासाठी हितकारक अन् कुणासाठी तापदायक ठरणार याचीच चर्चा सध्या सुरु असून नेते अन् कार्यकर्ते आकडेमोडीत दंग आहेत. यावेळी अपक्ष यतिन कदम यांनी मोठी व्यूहरचना आखत प्रचारात रंगत आणल्याने कुणाची शिट्टी वाजविणार यावर देखील बरेच काही अवलंबून असणार आहे.

मागील विधानसभा निवडणूकीत सर्वच पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी सात उमेदवार रणांगणात होते. मात्र खरी लढत आमदार अनिल कदम व माजी आमदार दिलीप बनकर यांचेतच झाली होती. त्यावेळी बनकरांचा निसटत्या फरकाने पराभव झाला होता..

मागील वेळेप्रमाणे गोदाकाठची मते यावेळीही बनकरांना पडणार की कदमांच्या पारड्यात जाणार तर तरुणाईचे आकर्षण ठरलेले यतिन कदम कोणत्या भागातून किती मते घेणार यावर देखील जय-पराजयाचा फैसला अवलंबून असणार आहे. यापूर्वी तालुक्यात झालेल्या निवडणुका ह्या विकास, बेरोजगारी समस्या या प्रमुख मुद्यांभोवती लढविल्या जात असत.

यावेळी मात्र प्रचाराची पातळी घसरलेली दिसली. वैयक्तिक पातळीपर्यंत पोहचलेल्या प्रचाराने मतदारांची करमणूक झाली असली तरी प्रत्यक्ष मतदान यंत्रात मतदार राजाने आपले मत कुणाच्या पारड्यात टाकले याचा फैसला उद्या गुरुवार दि २४ रोजी होणार आहे.

एक मात्र नक्की विधानसभेचा बिगुल वाजण्यापूर्वी राष्ट्रवादी व शिवसेना या दोन्ही पक्षात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचे इनकमिंग, आऊटगोईंग झाले आहे. त्यामुळे नेते, कार्यकर्ते यांनी अंतिम क्षणी काय भूमिका निभावतील अन् मतदारांनी नेमकी कुणाला पसंती दिली हे अवघ्या दोन दिवसात समजणार आहे.

एकूण यावेळची ही निवडणूक आजी-माजी आमदारांसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. तसेच ती यतिन कदमांचा राजकीय प्रवास ठरविणारी आहे.यावेळी निफाडच्या रणांगणात ६ उमेदवार नशीब आजमावित होते. मात्र खरी लढत आजी-माजी आमदारांमध्येच झाली असली तरी अपक्ष यतिन कदमांनी नेमकी कुणाची किती मते घेतली यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.

एकूणच, प्रचारात निसाका, रासाका, एच.ए.एल, रस्ते आदी प्रश्‍न प्रचाराच्या अंतिम टप्प्यात दुर्लक्षित होऊन प्रत्येकाच्या अस्तित्वाचा प्रश्‍न ऐरणीवर आल्याने कार्यकर्ते अंतिम क्षणी मतदार मतदान केंद्रापर्यंत आणण्यात व्यस्त राहिले. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मतदान केंद्रावर लागलेल्या रांगा या प्रत्येकासाठी धडकी भरविणार्‍या ठरल्या.

त्यामुळे गुरुवार दि.२४ रोजी होणार्‍या मतमोजणीकडे अवघ्या तालुक्याच्या नजरा लागल्या असून या निकालावर निफाडच्या राजकारणाची पुढील गणिते अवलंबून असल्याने येथे प्रत्येकाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!