Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

मालेगाव बाह्य मतदारसंघ – विधानसभा निवडणूक २०१९ : दोघांमध्ये ‘दादा’ कोण? उत्सुकता शिगेला

Share

मालेगाव । हेमंत शुक्‍ला

‘राजकीय’दृष्ट्या जिल्ह्यात संवेदनशील अशी ओळख ठेवून असलेल्या मालेगाव बाह्य मतदारसंघात विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राजकीय वातावरण ‘ऑक्टोबर हिट’ प्रमाणेच तापले आहे. शिवसेनेचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे हे जनसंपर्क व विकासाच्या जोरावर विजयाचा चौकार मारण्यास सज्ज झाले असतानाच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे डॉ. तुषार शेवाळे यांनीही सर्व भुसे विरोधकांची मोट बांधत भुसेंचा चौकार रोखण्यासाठी मोठ्या चतुराईने क्षेत्ररक्षण लावले आहे.

आ. भुसे राबवलेल्या योजना व विकासाचा मुद्दा प्रभावीपणे मांडत आहेत तर टक्केवारीच्या लाभापायी झालेली निकृष्ट दर्जाची विकासकामे डॉ. शेवाळे जनतेसमोर मांडत त्यास प्रत्त्युतर देत आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या भडीमारामुळे हा दुरंगी सामना अंतिम टप्प्यात कमालीचा रंगला असल्याने जनतेत निकालाबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मतदारसंघ पुनर्रचनेत ‘दाभाडी’ मतदारसंघ मालेगाव बाह्य या नवीन मतदारसंघाच्या निर्मितीमुळे अस्तित्वहीन झालाच, परंतु या परिवर्तनाबरोबर गत चार दशकांपासून या मतदारसंघावर हिरे घराण्याचे असलेले वर्चस्वदेखील संपुष्टात आले. हिरे विरोधकांना विकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र करत आ. भुसे यांनी २००४ ची निवडणूक जिंकून इतिहास घडविला होता.

जनतेच्या मनाचा कल समजलेल्या आ. भुसे यांनी जनसंपर्क वाढवत त्यास विविध विकासकामांची जोड दिल्याने विजयाची हॅट्ट्रिकही पूर्ण केली. सेना-भाजप महायुती तसेच कट्टर विरोधक भाजप गटनेते सुनील गायकवाड यांची मिळालेली साथ ‘डॅमेज’ कंट्रोलसाठी पथ्यावर पाडत जनसंपर्क व विकासाच्या मुद्यावरच आ. भुसे पुन्हा विजयाचा चौकार मारण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

तालुक्याला आ. भुसेंच्या रूपाने मंत्रिपद लाभले. तब्बल पाच वर्षे मंत्रिपदावर राहण्याची संधी मिळाल्याने भुसे यांनी ग्रामविकासाच्या माध्यमातून योजना व निधी आणत विविध विकासकामांना चालना दिली. गिरणा-मोसम नदींवरील बंधारे असो की नदीजोड प्रकल्प, महिला बाल रुग्णालय, पश्‍चिम औद्योगिक वसाहत, क्रीडा संकुल, वीज उपकेंद्र, आरोग्य केंद्रे, मुख्य रस्त्यांचे सुशोभिकरण, उद्यान, तळवाडे तलाव साठवण क्षमतेत वाढ, अभ्यासिका इमारत, अतिक्रमित घरांचे नियमनाकूल, भूमिगत गटार, रस्ते आदी शेकडो कोटींची विकासकामे त्यांनी मार्गी लावली.

प्रचारसभांच्या माध्यमातून ही सर्व विकासकामे जनतेसमोर मांडताना निवडणुका येताच सक्रिय होणार्‍या विरोधकांना जाब विचारण्याचे आवाहन ते करत आहेत. जनतेच्या सुख-दु:खात आपण सामील होतो, हे राजेशाही थाटात राहणार्‍या विरोधकांना पसंत नसले तरी आपण जनतेशी जुळलेली नाळ कधीही तोडणार नाही, अशी ग्वाही देत आ. भुसे प्रचारसभा गाजवत आहेत.

गत पंचवार्षिक निवडणुकीत हिरे कुटुंबिय सक्रिय झाले नव्हते. आ. भुसेंच्या विरोधात उभे असलेल्या पवन ठाकरे, सुनील गायकवाड व संदीप पाटील या तिघा उमेदवारांना मिळालेली मते भुसेंपेक्षा ९ हजारांनी जास्त होती. भुसेंविरोधी मतांचे हे गणित लक्षात घेत अद्वय हिरे, राजेंद्र भोसले, प्रसाद हिरे, डॉ. तुषार शेवाळे, शांताराम लाठर, डॉ. जयंत पवार, गुलाबराव चव्हाण आदी नेत्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मविप्र संस्थेचे अध्यक्ष तसेच जलसंधारणाची ठिकठिकाणी कामे करत ‘जलदूत’ म्हणून ओळख निर्माण केलेल्या डॉ. तुषार शेवाळे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले गेले.

२००४ मध्ये झालेला प्रयोग सर्व विरोधकांना एकत्र करत कोअर कमेटीने यशस्वी केला. सुसंस्कृत प्रतिमा असलेल्या व गत दहा वर्षांपासून जनतेच्या सुख-दु:खात सामील होण्यासह स्वखर्चातून जलसंधारणाची कामे करत अनेक गावांची पाणीटंचाई दूर करणार्‍या डॉ. शेवाळे तालुक्यातील निकृष्ट दर्जाच्या कामांकडे जनतेचे लक्ष वेधत आ. भुसेंवर टीकेची झोड उठवत आहेत. डॉ. शेवाळे यांनी टक्केवारीच्या लाभासाठी निकृष्ट दर्जाची विकासकामे करत शहर व तालुका खड्ड्यात टाकण्याचे कर्तृत्व दाखविणार्‍यांना मते देणार का? असा सवाल करत सभा गाजवण्यास प्रारंभ केला असल्याने एक महिन्यापूर्वी आ. भुसेंविरोधी प्रबळ उमेदवार नसल्याची होत असलेली चर्चा निष्फळ ठरवत निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे.

आघाडीने संपूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीत कमबॅक केल्याचे दिसून येत असले तरी आ. भुसेंच्या नियोजन यंत्रणेचे अस्त्र भेदण्यास आघाडी किती यशस्वी ठरते; यावरच या लढतीचे यश अवलंबून राहणार असल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!