Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

विधानसभा निवडणूक २०१९ : जनतेच्या आग्रहामुळे निवडणूक लढवण्याचा निर्णय – दातीर

Share

नाशिक | प्रतिनिधी 

प्रश्न – आपला राजकीय प्रवास कसा झाला?
उत्तर – लहानपणापासूनच हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या मतांचा पगडा असल्याने १९९५ मध्ये शिवसेनेचे सक्रीय सदस्य पद स्वीकारून अनेक वर्षे विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून काम केले. २००७ साली आमचे दाजी सुभाष गायधनी यांना तीन अपत्य असल्याने निवडणूक लढवता येणार नव्हती व त्यामुळे गावातील ज्येष्ठांसह तरुणांनी एक मताने मला नगरसेवक पदाच्या निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतला व मोठ्या मताधिक्याने निवडून आलो.२०१३ साली पक्षांतर्गत बंडाळीमुळे तिकीट कापले गेले व अपक्ष उभे राहावे लागले. तेथे निसटता पराभव झाला, पण जनतेने मला अपक्ष असूनही भरपूर प्रेम देऊन मतदान केले, त्यामुळे अनधिकृत भंगार बाजारावरील कारवाईमुळे जनतेचा अधिक विश्वासू बनलो. त्याचे प्रतीक म्हणून मला त्यांनी २०१८सालच्या निवडणुकीत कक्षामार्फत प्रभाग बदलून उमेदवारी देऊन पुन्हा निवडणुकीत निवडून दिले आणि आता जनतेच्या आग्रहामुळे विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रश्न – जनहितासाठी केलेली महत्त्वाची कामे कोणती?
उत्तर – नगरसेवकाच्या माध्यमातूनही विविध विकासकामे केली. हे कामे करताना गंगापूर रोडसारखाच मतदारसंघ करण्याचा माझा मानस होता आणि त्यामुळे एकाच वर्षात मनपाच्या माध्यमातून ५० कोटींची विकासकामे प्रभागात करून दाखवली.

प्रश्न – शिवसेना सोडल्याचे वाईट वाटले नाही का?
उत्तर– मी शिवसेनेत भरपूर वर्षे निष्ठेने काम केले. खासदारकीला सर्वाधिक मताधिक्य माझ्या प्रभागातून दिले. माझ्यासह प्रभागातील नगरसेवक शिवसेनेचे निवडून आणले, पण ते लवकर त्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. पश्चिम मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार असताना मला डावलले जात होते, त्यामुळे अंतर्गत राजकारणाला कंटाळून मनसेनेत प्रवेश केला. माननीय राज ठाकरे यांच्या मतांचा प्रचंड पगडा माझ्या मनावर होताच आणि आता त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळणार असल्याने खूप आनंदी आहे.

प्रश्न – नगरसेवक पद सोडण्याचे दुःख जाणवते का?
उत्तर – मुळात मायबाप जाणता ही उमेदवारांनी केलेल्या कामांच्या जोरावर तसेच आपले काम बघून मला आत्मविश्वासाने मतदान करतील, मला मिळालेले नगरसेवक पद माझ्या याच कामाचे फळ होते, माणूस हा पदाने नाही तर त्याच्या कामाने ओळखला जातो. मी पदापेक्षा जनसेवेला जास्त मानतो. त्यामुळे कोणतेही दुःख माझ्या मनामध्ये येत नाही.

प्रश्न – शहरातील धार्मिक स्थळांबाबत कसा लढा दिला?
उत्तर – मुळात धार्मिक स्थळे आमची भक्तिस्थळे नसून शक्तिस्थळे आहे, असे मी मानतो. त्यात महानगरपालिकेकडून न्यायालयाचे आदेशाची कारण देत कारवाई सुरू केली. सदर कारवाई विरोधात मी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ काढून मनपा कारवाई करते, हे उच्च न्यायालयाला पटवून दिले. उच्च न्यायालयाने तत्काळ सदर कारवाईची स्थगिती देत कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करा, असा मनपाविरुद्ध निर्णय दिला. त्यामुळे धार्मिक स्थळावर आलेले गडांतर थांबले, पण पुढे जाऊन या विषयात काही ठोस तरतूद असावी, यासाठी महासभेत लक्षवेधी मांडून मंजूर अभिन्यासाच्या खुल्या जागेत धार्मिक स्थळे स्थलांतरित करून कायम करावे, असा प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात येऊन कलम 37 अन्वये शासनास दोन वर्षांपूर्वी मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला आहे. मात्र स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे या सरकारने त्यावर अद्याप कोणताही ठोस असा निर्णय घेतलेला नाही.

प्रश्न – शेतकर्‍यांच्या हितासाठी काय लढा द्याल?
उत्तर – मनपा क्षेत्रामध्ये बहुतांशी शेतकर्‍यांच्या जागेवर आरक्षण टाकले आहेत. आरक्षणाची जागा रोख मोबदला अथवा टीडीआर या माध्यमातून ताब्यात घेतली जाते, मात्र मनपाची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने टीडीआरच्या माध्यमातून जागा ताब्यात घेतल्या जात आहे. मध्यंतरी शासनाने कुठलाही विचार न करता प्रीमियम एफएसआय विकून पैसे कमविण्याचे नियमबाह्य धोरण स्वीकारले. त्यामुळे शेतकर्‍यांच्या जमिनी टीडीआरच्या दर 66 टक्केने कमी झाला. ही बाब मनपाच्या लक्षात आणून देणेकामी प्रथम महासभेत मी लक्षवेधी मांडली. तत्कालीन आयुक्तांनी याचे गांभीर्य दाखवत या बाबतीत प्रस्ताव शासनास मंजुरीसाठी पाठवला. शासन त्वरित मंजूर करत नसल्याने मी मुख्यमंत्र्यांची शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळासह चार वेळा भेट घेतली, तरी मुख्यमंत्री आम्हास दुय्यम स्थान देत त्यांच्या लाडक्या नागपूर व पुण्यासाठी टीडीआर प्रथम वापरण्याचा प्रस्ताव मंजूर करून दत्तक नाशिकला वार्‍यावर सोडले. त्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेल्या असून शासनास न्यायालयाने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.

प्रश्न – सिडकोचा दौर्‍यात नागरिकांच्या काय मागणी आहे?
उत्तर – सिडकोचा दौरा करताना चौकाचौकात नागरिक भेटत होते. विशेषतः महिलांनी यात सक्रिय सहभाग नोंदवला. येथील महिला एवढ्या जागरूक आहेत की, ते पाहून फार आनंदी झालो. सिडकोतील वाढीव घरांचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणावर असून सर्व अधिकार शासनास जरी असले तरी भविष्यात विधानसभेत आवाज उठवून हा विषय मार्गी लावण्याचा माझा मानस आहे.

प्रश्न – भंगार बाजारावर कारवाई थांबवण्यासाठी पैशांची ऑफर झाली होती का?
उत्तर – हो, सुरुवातीला उच्च न्यायालयाचा निर्णय जेव्हा माझ्या बाजूने लागला तेव्हा तेथील एक शिष्टमंडळ माझ्याकडे आले. कारवाई थांबविण्यासाठी एका मोठ्या स्वरूपाच्या रकमेची ऑफर दिली होती, पण पैसे घेऊन नागरिकांचे आरोग्य व शांतता मला धोक्यात टाकायची नव्हती. त्यामुळे मी त्या लोकांना परत जाण्यास सांगितले. मी नाही घेतले म्हणून त्यांनी इतर लोकांना पैसे देऊन माझा लढा कमकुवत करण्याचा प्रयत्न केला, पण मी कयास बांधलेला होता, तो लढा मी यशस्वीरीत्या पूर्ण केला. याचा मला आनंद आहे, सार्थ अभिमान आहे.

प्रश्न – कोणत्या प्रतिस्पर्धीचे काम चांगले आहे असे वाटते?
उत्तर – तुमचा प्रश्न फार विनोदी आहे. माझे प्रतिस्पर्ध्यांमध्ये एक निष्क्रिय आमदार आहेत, एक गडगंज संस्थानिक आहे, त्यामुळे ते जनतेचे कामे करत नाहीत म्हणून मी विधानसभेत उभे रहावे असे वाटते. नाहीतर मी आज त्यांचा प्रचार करत नसतो का?

प्रश्न – आज जे पैसे वाटपाच्या बातम्या येत आहेत, त्यामुळे असे वाटते का धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा पराभव होतो आहे?
उत्तर – आज सोशल मीडियाच्या माध्यमातून काही गोष्टी कानावर आल्या. आजची निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशीच आहे. नाशिकचे मतदार हे सुशिक्षित व सुसंस्कृत आहे. त्यामुळे तो पाचशे किंवा पाच हजार रुपयांत स्वतःला विकणार नाहीत, याची मला खात्री आहे. मात्र, शिक्षकासारखे ज्ञानदान करणारे लोक यात असल्याचे समजल्याने खूप दुःख होते व वाईट वाटते.

प्रश्न – आमदार झाल्यानंतर मतदारसंघासाठी आपला काय मानस आहे?
उत्तर – सदर विधानसभा मतदारसंघात प्रामुख्याने कामगार व शेतकर्‍यांचे वास्तव्य आहे. त्यामुळे बंद पडलेले कारखाने पूर्ववत सुरू करण्यासाठी सरकारमार्फत जी काही मदतीची गरज आहे, ती करण्यासाठी काम करायचे आहे. तसेच नवीन आयटी पार्क नाशिकमध्ये आणून रोजगारनिर्मिती करायची आहे. शेतकर्‍यांच्या मालाला हमीभाव मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करायचे आहेत. सिडकोवासियांचेे घरे फ्री होल्ड करून त्यांचे अतिरिक्त बहुमजली स्वरूपाचे बांधकाम अतिरिक्त एफएसआय, क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून नियमित करायचे आहे. विजेच्या तारा भूमिगत करायच्या आहेत, एक भव्य नाट्यमंदिर व अभ्यासिका उभी करायची आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!