Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

मतमोजणी केंद्रांसाठी वाहतुकीत बदल; आजपासून बंधने लागू, ५ ठिकाणी नो व्हेईकल झोन

Share

नाशिक । प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी शहरात ५ विधानसभा मतदारसंघाच्या केंद्रांची उभारणी करण्यात आली आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव या केंद्रांजवळून होणारी वाहतूक इतरत्र वळवण्यात येणार असून याची रविवार (दि.२०) पासून अंमलबजावणी होणार आहे.

शहरात नाशिक पूर्व मतदार संघासाठी नवीन आडगाव नाका येथील विभागीय क्रीडा संकुल, नाशिक मध्य मतदारसंघासाठी भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, नाशिक पश्‍चिम मतदारसंघासाठी नवीन नाशिक येथील छत्रपती संभाजी स्टेडियम, देवळाली मतदारसंघासाठी नाशिकरोड येथील महापालिकेचे विभागीय कार्यालय आणि इगतपुरी मतदार संघासाठी सीबीएस येथील शासकीय कन्या विद्यालय अशी मतमोजणी केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे.

या ठिकाणी मतदान झाल्यानंतर मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. मतमोजणी केंद्रात नागरिकांची गर्दी होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता असल्याने वाहतूक मार्गात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार रविवारी (दि.२०) सकाळी ८ ते दुपारी ३, सोमवारी (दि.२१) सायंकाळी ६ते रात्री १२ आणि गुरुवारी (दि.२४) सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत मतमोजणी केंद्राजवळील मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.

येथील सुरक्षेच्या कारणास्तव या केंद्राजवळील परिसर नो व्हेईकल झोन असणे आवश्यक असल्याने वाहतूक शाखेने या पाचही केंद्राजवळून होणार्‍या वाहतुकीत बदल केले आहेत. या भागातून जाणार्‍या चालकांना पर्यायी मार्गाची वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी काढलेल्या अधिसुचनेनुसार २०, २१ आणि २४ ऑक्टोबरला या भागातील वाहतूक मार्गात बदल राहतील.

असे बदल, पर्यायी मार्ग

* विभागीय क्रीडा संकुल : विभागीय क्रीडा संकुलसमोरील सर्व्हिस रोड हिरावाडी टी पॉइंट ते के. के. वाघ कॉलेज चौफुलीपर्यंत तसेच हिरावाडी टी पॉइंट ते पाटापर्यंतच्या मार्गावर वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील पर्यायी वाहतूक हिरावाडीकडून सर्व्हिसरोडने मुंबई-आग्रा रोडवरून येणारी वाहतूक हिरावाडी काट्यामारुती चौक व स्वामी नारायण चौकाकडून इतरत्र जाईल.

* कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह : किनारा हॉटेल ते वडाळा रोड पुलापर्यंत तसेच भाभानगरकडून गायकवाड सभागृहाकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक नागजी सिग्नल भाभानगरमार्गे मुंबई नाक्याहून इतरत्र जाऊ शकेल. तसेच मुंबई नाक्याहून नागजी पुलाकडे येणारी वाहतूक भाभानगरमार्गे नागजी सिग्नलकडून वडाळा गाव व इतरत्र जाऊ शकेल. इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक मार्गे साईनाथ चौफुलीकडून इतरत्र जाऊ शकेल.

* छत्रपती संभाजी स्टेडियम : सिडको रुग्णालय ते अंबड लिंकरोड, महाले पेट्रोल पंप ते मायको हॉल व आयडीयल कॉर्नर ते हॉटेल एक्सलेन्सी मार्गावरील वाहतूक संपूर्ण बंद करण्यात आली आहे. या मार्गाऐवजी डीजीपीनगर, अंबड गाव-माऊली लॉन्स या मार्गाचा तसेच पाथर्डी फाटा, राणेनगर, लेखानगर या मार्गांवरून इतरत्र वाहतूक जाऊ शकेल.

.* महापालिका विभागीय कार्यालय : मुक्तिधाम चौक ते सत्कार पॉइंट या मार्गावरील दुहेरी वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी वाहन चालकांनी बिटको चौकाकडून सत्कार पाँइट जावे, तसेच नाशिकरोड रेल्वेस्टेशन, रिपोर्ट कॉर्नर ते सत्कार पॉइंट कडून देवळाली कॅम्प, भगूरच्या दिशेने जाऊ शकतील.
*छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम : सीबीएस सिग्नल ते मेहेर सिग्नल दुतर्फा वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी वाहनचालकांनी सीबीएसकडून अशोकस्तंभ रविवार कारंजा, पंचवटीकडे जाणारी वाहतूक टिळकवाडी सिग्नल मार्गे जाईल.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!