Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

विधानसभा निवडणूक २०१९ : प्रांतवाद ठरतोय कळीचा मुद्दा; जिल्ह्यात ३ मतदारसंघांत निर्णायक लढत

Share

नाशिक । खंडू जगताप

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी हातघाईवर आली आहे. विकास, व्यक्ती, पक्ष या सर्वच मुद्यांबरोबरच जिल्ह्यात प्रांतवाद हा कळीचा मुद्दा ठरत आहे. इगतपुरी- त्र्यंबक, पेठ-दिंडोरी, देवळा- चांदवड या मतदारसंघांत याची तीव्रता अधिक असून इतर तालुक्यांमध्ये थोड्या-अधिक प्रमाणात महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्येच प्रांतवाद प्रमुख मुद्दा ठरणार आहे.

जिल्ह्यातील शहरे व १५ तालुके मिळून लोकसंख्येनुसार १५ विधानसभा मतदारसंघ निर्माण झाले आहेत. परंतु लोकसंख्या कमी असल्याने जिल्ह्यातील आदिवासीबहूल तालुक्यांमध्ये इगतपुरी-त्र्यंबकेश्वर, दिंडोरी-पेठ, चांदवड-देवळा अशा दोन दोन तालुक्यांचा मिळून एक मतदारसंघ आहे. वास्तविक प्रत्येक तालुक्याची प्रशासकीय कार्यालये वेगळी आहेत. न्यायालये ही त्या त्या तालुक्यातील प्रमुख शहरात आहेत. परंतु विधानसभा मतदारसंघ दोन्ही मिळून एक असल्याने उमेदवार तसेच नागरिकांचीही गोची होत आहे. आमदार हा आपल्याच भागातील तसेच आपल्याच तालुक्याचा असावा, अशी अपेक्षा त्या त्या तालुक्यातून व्यक्त होणे साहजिक आहे.

वरील तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये आतापर्यंत एकदा सत्ताकेंद्र एका (मतदार जास्त असलेल्या) तालुक्यात आले की नंतर आमदारकीची परंपरा त्याच तालुक्यात सुरू राहिल्याचा इतिहास आहे. तर दुसर्‍या तालुक्यावर कायम अन्याय झाल्याची भावना आहे. यामुळे या निवडणुकीत आमदार आमच्याच तालुक्याचा असावा या मागणीचा जोर वाढू लागला असून यातून प्रांतवादही वाढीस लागला आहे. तर सध्या विद्यमान आमदारांविरोधात उभे राहिलेले तितक्याच ताकदीचे उमेदवार हे नेमके दुसर्‍या तालुक्यातील असल्याने प्रांतवादाला अधिकच खतपाणी दिल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित या इगतपुरी तालुक्यातील वावी हर्ष गावच्या आहेत. त्या काँग्रेसमधून भाजपत गेल्याने नाराज झालेल्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून काँग्रेसमधून हिरामण खोसकर यांना उमदेवारी दिली आहे. खोसकर हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणपाडा गावचे आहेत.

राष्ट्रवादीचे दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ हे दिंडोरी तालुक्यातील वनारे गावचे राहणारे आहेत. तर त्यांच्याविरोधात शिवसेनेने उमेदवारी दिलेले भास्कर गावित हे पेठ तालुक्यातील राजभारे गावचे सुपुत्र आहेत. चांदवड तालुक्याचे भाजपचे विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर हे देवळा तालुक्याचे आहेत, तर त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे काँग्रेसचे शिरीष कोतवाल हे चांदवड येथील राहणारे आहेत.
या तीनही मतदारसंघांत मोठे असलेल्या चांदवड, इगतपुरी व दिंडोरी तालुक्यांमध्ये एकूण मतदानाच्या पाऊण टक्के मतदान आहे. यामुळे त्या त्या तालुक्यातील उमेदवार अधिक मतदान घेण्याची शक्यता आहे.

आयात उमेदवारांवरही नाराजी
जिल्ह्यात प्रांतवादाबरोबरच आयात उमेदवारांबाबत सर्वच पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. प्रामुख्याने नाशिक पूर्व, देवळाली, सिन्नर या मतदार संघांत आयात उमेदवार झाले आहेत. तर युती अगर आघाडीत दुसर्‍या पक्षाला जागा गेल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांचीही मोठी आकडेवारी असून याचा फटका उमेदवारांना बसत आहे.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!