Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

विधानसभा निवडणूक २०१९ : पुरोगामी राज्यात निवडणुकीत जातीय समीकरणे धोकादायक

Share

नाशिक । सुधाकर शिंदे

महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज यांनी बहुजन विकास या उद्देशाचे नवे विचार महाराष्ट्राला दिल्यानंतर राज्य हे पुरोगामी विचाराने पुढे आले आहे. यात जातीयतेला मूठमाती देऊन महाराष्ट्र पुढे आला आहे. असे असताना अलीकडच्या दोन-अडीच वर्षांत राज्यातील निवडणुकांत काही मंडळी जातीय समीकरणातून निवडणूक लढविण्याचे काम करीत आहे. पुरोगामी म्हणून ओळख निर्माण करणार्‍या महाराष्ट्रात आता निवडणुकीतील जातीय समीकरणे धोकादायक बनत आहे.

देशात सामाजिक व राजकीय चळवळीत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील स्वराज्य स्थापनेत सर्व जाती धर्माचा सहभाग होता. ब्रिटिशांच्या राजवटीत इग्रंजांच्या विरोधात उठाव करण्यात महाराष्ट्रातील क्रांतीकारक अग्रभागी होते. स्वातंत्र्यानंतर देशांचा गाडा हाकताना महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा होता. अशाप्रकारे देशाच्या संरक्षणासाठी हा सह्याद्री नेहमीच धावून गेला आहे.

‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या ब्रिद वाक्यानुसार स्वराज्याचा कारभार छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्यानंतर याच विचाराने प्रेरित होऊन महाराष्ट्रातील राष्ट्रपुरुषांनी हेच विचार येेणार्‍या पिढीला देऊन जातीय व्यवस्था नष्ट करण्याचे काम केले. यात महात्मा छत्रपती शाहू महाराज, ज्योतिराव फुले, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबडेकर, कर्मवीर भाऊराव पाटील या राष्ट्रपुरुषांनी बहुजनांचे हित जोपासले. अशाप्रकारे जातीय व्यवस्थेला तिलांजली देऊन एक नवा पुरोगामी महाराष्ट्र घडविण्याचे काम झाले आहे.

असे असताना, आता अलीकडच्या काही वर्षांत पुन्हा एकदा जातीच्या न्याय हक्कासाठी काही मंडळी जातींच्या हक्कासाठी पुढे येऊन याचा वापर राजकारणासाठी करित असल्याचे समोर आले आहे. यात अगदी सवर्ण देखील जातीला आरक्षण मिळावेत म्हणून एकत्र आले आणि या वर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना काहीअंशी न्याय मिळाला. हेच पाहून इतर मागासवर्गीय घटकातील काही वर्ग पुन्हा समाजाच्या न्यायासाठी पुढे आली. असाच प्रकार अनुसूचित जाती – जमाती घटकात देखील सुरू झाला आहे.

एकूण पुन्हा समाजातून काहीअंशी हद्दपार झालेली जातीय व्यवस्था वर डोके काढू लागले असून ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला साजेशी नाही. एकीकडे माणसाने अंधश्रद्धेच्या विरोधात कायदे करीत विज्ञानाच्या जोरावर ग्रहावरील स्वारी फत्ते केली. असे असताना आता राजकारणातील काही मंडळींनी आपल्या जातीला एकत्र करून पुन्हा जातीयता पसरविण्याचे काम सुरू केले असून हे लोकशाहीला घातक असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहे.

सध्या राज्यात सुरू असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काही मतदारसंघात दुरंगी, तिरंगी व चौरंगी लढत होत असल्याने यातील काही मंडळी जातीच्या मतांची आकडेवारी दाखवत विजयाचा दावा करीत आहे. स्वातंत्र्यानंतर एक विचार घेऊन पुढे आलेले काही पक्षांना बाजूला सारत जातीयवादी प्रचार करून एकोप्यावर अप्रत्यक्ष हल्ला करीत आहे. निवडणुकीच्या मैदानात असलेले दोन, तीन उमेदवार दोन वेगळ्या जातीचे असल्याने आपलाच जातीचा उमेदवाराला मते द्या, असे विखारी प्रचार केले जात असल्याची चर्चा राज्यात सुरू आहे.

पक्षाचे नेते पक्षाचे विचार व मुद्दे मांडत असताना खालच्या पातळीवर जातीयवादी प्रचार केला जात आहे. एकीकडे केंद्र व राज्य शासन हे जातीयता नष्ट होण्यासाठी विविध कायदे करून आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देत आहे. तसेच अगदी शेवटच्या घटकातील व्यक्तीला सत्तास्थानात मानाचे स्थान देत असताना पुन्हा एकदा निवडणुकीच्या निमित्ताने जातीयता वर डोके काढत आहे. तेव्हा जागृत नागरिकांनी अशा जातीयवादी विचार पोसणार्‍या उमेदवाराला मत न देता, त्याने केलेले काम, त्याचे विकासाची दूरदृष्टी व जनतेचे प्रश्‍न पुढे घेऊन जाणार्‍या उमेदवारावर विश्‍वास टाकला पाहिजे. पुरोगामी महाराष्ट्राला राजकारणात आलेली जातीय विचार शोभेसे नसून हा प्रकार लोकशाहीला घातक आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!