Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक ‘मध्य’ची घसरलेली टक्केवारी कोणाला तारणार?; विजयाचे गणित जुळविण्यास प्रारंभ

Share

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात बहुतांशी मतदार हा जुने नाशिक व गावठाण भागात राहत असून या मतदारांचा कौल उमेदवाराला विजयाकडे नेतो. यामुळेच सर्वच उमेदवारांनी जुने नाशिक गावठाणांकडे लक्ष केंद्रित केले होते. मात्र या भागात अपेक्षित मतदान झालेले नसून एकुणच मतदान ४८ टक्क्यांपर्यत गेले आहे. गावठाण भागातील मतदारांचा निरुत्साह आणि कमी झालेले मतदान कोणाला तारणार आणि कोणाला बाजुला सारणार? हे निकालातून स्पष्ट होणार आहे. तरीही भाजपा, मनसेना आणि काँग्रेस उमेदवारांकडून झालेल्या मतदानाची आकडेमोड करीत विजयाचे गणित जुळविण्यास प्रारंभ केला आहे.

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात सन २००९ मधील निवडणुकीत ४६.५१ टक्के आणि सन २०१४ मध्ये ५१.७३ टक्के असे मतदान झाले होते. या दोन निवडणुकांच्या तुलनेत यावेळी सुमारे ४ टक्के मतदान कमी झाले असून आता सुमारे ४८ टक्के मतदान झाले आहे. यावरून याठिकाणी गेल्या पाच दहा वर्षात मतदारांचा टक्का वाढत असतांना त्या तुलनेत आणि मागील दोन निवडणुकीच्या तुलनेत मतदान झालेले आहे. नाशिक महापालिकेच्या नाशिक पूर्व व नाशिक पश्‍चिम प्रभागांनी व्यापलेल्या या मतदारसंघात अल्पसंख्याक मतदारांचा मोठा भरणा आहे.

याठिकाणी प्रभाग सभापती भाजपा व काँग्रेस पक्षाचा आहे. तर यात जुने नाशिक गावठाण विभागात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मनसेना यांना मानणार्‍या मतदारांचा मोठा भरणा आहे. याच भागावर भाजपाकडून लक्ष केंद्रित करण्यात येऊन प्रचारावर भर देण्यात आला होता. तर मनसेनेकडून देखील जुने नाशिक व गंगापूररोड भागावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. त्याचबरोबर काँग्रेसनेदेखील विशेषत: जुने नाशिक भागातील मुस्लीम बहुल भागासह झोपडपट्टी भागात लक्ष देऊन प्रचारावर भर दिला होता. यावरुन भाजपा, मनसेना व काँग्रेसने आपल्या विजयाचे गणित मांडले होते.

नाशिक मध्य विधानसभा मतदार संघात एकूण ३ लाख १९ हजार ४६० इतके मतदार आहे. यापैकी केवळ ८५ हजार ०५९ पुरुष आणि ६९ हजार ५६४ अशा एकुण १ लाख  ५४ हजार ६२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या संघातील गावठाण, जुने नाशिक व झोपडपट्टी भागावर प्रचारावर लक्ष देऊनही याठिकाणांहून अपेक्षित मतदान झालेले नाही. गेल्या दोन तीन महापालिका निवडणुकांत याभागात लक्ष्मी दर्शनानंतर मतदान जास्त होत असल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरुन दिसून आलेले आहे.

या भागात विद्यमान आ. देवयानी फरांदे यांनी केलेल्या विकास कामांवर भर देतांना त्यांनी जुने नाशिक भागात काही कार्यकर्त्यांची फळी तयार केली होती. यामुळे त्यांना मुस्लीम समाजातून चांगले मतदान मिळेल अशी चर्चा आहे. तर सुशिक्षित व युवा मतदारांनी देखील भाजपाला साथ दिल्याने भाजपाकडून विजयाची आकडेमोड सुरू करण्यात आली आहे.

याठिकाणी मनसेनेकडून भाजपासमोर तगडे आव्हान उभे करीत मतदारांपर्यत पोहचण्याचे काम केले होते. याठिकाणी कोथरुड पॅटर्न नुसार मनसेनेला राष्ट्रवादी कॉग्रेसने पाठिंबा दिला होता. तसेच मागील निवडणुकीतील कॉग्रेस उमेदवार शाहू खैरे यांनी आपले नातलग असलेले मनसेनेचे माजी आ. नितीन भोसले यांच्यासाठी उमेदवारी मागे घेतली होती. तर काँग्रेस पक्षाला याठिकाणी मागील निवडणुकीत तिसर्‍या क्रमांकाची मते मिळाली होती. यामुळे याठिकाणी काँग्रेसकडून खैरे यांच्यानंतर डॉ. हेमलता पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. अशाप्रकारे या मतदार संघात तिरंगी लढत दिसून आली होती. मात्र प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात भाजपा, काँग्रेस व मनसेनेकडून विजयाचा दावा करण्यात आला आहे.

या मतदार संघात दहा वर्षानंतरही मतदानाचा टक्का घसरला असून यामुळे कमी झालेल्या टक्केवारीचा नक्की कोणाला फायदा होणार? यासंदर्भात तिन्ही पक्ष दावे करीत आहे. मुस्लीम, दलित व अल्पसंख्याकाकडून फारसे मतदान झालेले नसल्याचे सांगण्यात येत आहे. तर याभागातील मुख्य बाजारपेठेसह गंगापूररोड, द्वारका परिसर,इंदिरानगर परिसर याभागात सुशिक्षित व युवा मतदारांकडून मतदान झालेले आहे. याभागात भाजपचा भरणा जास्त असल्याने भाजपकडून झालेल्या आकडेवारीवरुन विजयाचे गणित मांडले जात आहे.

तर मनसेनेकडून भाजप वगळता सर्वच मोठ्या राजकीय पक्षांकडून आपल्या मतदान मिळाल्याने विजय आपलाच असल्याचे सांगितले जात आहे. कॉग्रेसकडून मागील निवडणुकीत मिळालेले मते आणि चार वर्षात वाढलेले कॉग्रेसची मते यातून कॉग्रेसने विजयाचा दावा केला आहे. अशाप्रकारे भाजपा, मनसेना व कॉग्रेसकडून विजयाचा दावा केला जात असला तरी कमी मतदानाचा फायदा नेमका कोणाला होणार आणि कोण विजयाचा मानकरी ठराणार? याचे उत्तर गुरुवारी मतमोजणीतून मिळणार आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!