Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

विधानसभा निवडणूक २०१९ : नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात कमी मतदान; घटलेले मतदान कोणाच्या पथ्यावर?

Share

नाशिक । प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात सर्वात कमी मतदान  शहरातील आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत दीड ते साडेचार टक्क्यांची ही घट आहे. हे घटलेले मतदान नेमके कोणाला मारक व कोणाला तारक ठरते याच्या जोरदार चर्चा झडत आहेत.या विधानसभा पंचवार्षिक निवडणुकीत राज्यभरच मतदानाची टक्केवारी घसरली आहे.

जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत ४ टक्क्यांनी कमी मतदान झाले आहे. जिल्ह्यातील १५ मतदारसंघापैकी सर्वात कमी मतदान ४८.४० टक्के हे नाशिक मध्य मतदारसंघात झाले तर त्या पेक्षा थोडे अधिक ५०.६६ टक्के मतदान नाशिक पूर्व मतदारसंघात झाले आहे. तर पश्‍चिम मतदार संघात ५४.३४ टक्के मतदान झाले आहे.

मागील २०१४ च्या निवडणुकीतही सर्वात कमी परंतु यंदाच्या तुलनेत जास्त असे ५१.७३ टक्के मतदान नाशिक मध्य मतदारसंघात झाले होते. यंदा यामध्ये तब्बल ४.३३ टक्केंची घट झाली आहे. तसेच नाशिक पूर्व मतदारसंघात मागील निवडणुकीत ५५.३८ टक्के मतदान झाले होते. यामध्ये यंदा सुमारे दोन टक्क्यांनी घट झाली आहे.

नाशिक पश्‍चिम मतदारसंघात मागील निवडणुकीत ५५.८१ टक्के मतदान झाले होते. यंदा यामध्ये दीड टक्क्यांनी घट झाली आहे. तर देवाळाली मतदारसंघात २०१४ ला ५४.८१ टक्के मतदान झाले होते. यात किंचित वाढ झाली आहे.
शहरातील तीनही मतदारसंघात भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

यामधील निकाल हे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी निगडीत असल्याने याला सर्वाधिक महत्त्व दिले जात आहे. प्रामुख्याने नाशिक पूर्व मतदारसंघात विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांना डच्चू देऊन त्यांच्याऐवजी राहुल ढिकले यांना महाजन यांनी संधी दिल्याने सानपांनी राष्ट्रवादीजवळ करत महाजनांंनाच शह दिल्याची चर्चा आहे.

येथील भाजपचा पराजय हा महाजनांचा असेल असे मानले जात आहे. परंतु येथील घटलेले मतदान हे सत्ताधारी भाजपच्या विरोधात की, विद्यमान आ. बाळासाहेब सानपांच्या विरोधात याचे गणित मात्र २४ ऑक्टोबरलाच सुटणार आहे.

त्या बरोबरच नाशिक पश्‍चिम मतदारसंघात भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांच्या विरोधात युतीतील शिवसेनेच्या नगरसेवकांनी बंडखोरी करत विलास शिंदे यांना पूर्ण ताकद दिली. शिवसेनाप्रमुख तसेच राऊत यांनीही त्यांना छुपा पाठिंबाच दिल्याने या लढती चुरशीच्या होणार आहेत.

तर, नाशिक मध्य मध्ये विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांना मनसेनेचे नितीन भोसले व कॉग्रेसच्या हेमलता पाटील यांनी कडवे आव्हान दिल्याने त्यांची दमछाक झाली. अशातच या मतदारसंघात मतदान घटणेे हे फरांदे यांना धोक्याचा इशारा मानला जात आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!