Saturday, April 27, 2024
Homeनाशिकएकलहरे औष्णिक केंद्राला येणार ‘अच्छे दिन’?

एकलहरे औष्णिक केंद्राला येणार ‘अच्छे दिन’?

नाशिक । योगेश मानकर

विविध अडचणींवर मात करत उच्चांकी वीजनिर्मिती करत अनेक पुरस्कार प्राप्त असलेले, तसेच राज्याला अडचणीच्या काळात सक्षमपणे वीजपुरवठा करणारे एकलहरे औष्णिक वीज केंद्र सध्या अंतिम घटका मोजत आहे. या केंद्राचे काही युनिट दुसरीकडे हलविण्याचे प्रयत्न झाल्याने प्रकल्प बचाव संघर्ष समितीचे गेल्या ५-६ वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. वीज केंद्रासाठी लागणारी जागा, पाणी, कोळसा वहन यंत्रणा व राख बंधारा हे महत्त्वाचे असणारे घटक उपलब्ध असताना केंद्राची क्षमता कमी करत ‘नाशिककरांना बुरे दिन’ आणल्याने आता नाशिककरांच्या महाविकास आघाडीच्या सरकारकडून अपेक्षा वाढल्या असून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यात लक्ष घालावेत, अशी मागणी पुढे आली आहे.

- Advertisement -

एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राने आत्तापर्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. पहिल्या टप्प्यातील दोन आणि नंतर दुसर्‍या टप्प्यातील तीन असे एकूण पाच संच कार्यरत झाले होते. मात्र आता मागील शासनाकडून यातील काही संच बंद करण्याचा निर्णय घेऊन यात पहिल्या टप्पा क्रमांक १ मधील सुमारे ५० एकरवर उभारणी करण्यात आलेले दोन संच काही महिन्यांपूर्वी तोडून जागा मोकळी करण्याचे काम सुरू आहे. हे संच विदर्भातील केंद्राकडे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आले आहे. यामुळेच या दहा वर्षांपासून रखडलेला प्रकल्पासाठी प्रकल्प बचाव संघर्ष समितीचे गेल्या ५-६ वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. परंतु येथे प्रकल्प होतो की नाही, याबाबत कामगारांमध्ये साशंकता आहे.

प्रस्तावित बदली संच हा टप्पा १ व वसाहतीचा काही भाग तोडून बनविण्यात येण्याचे नियोजित होते. कामगार, अधिकारी, अभियंते यांच्यासाठी नव्याने इमारती व बाजार संकुल उभारण्यात येणार होते. परंतु वास्तवात काय पण कागदोपत्रीही गेल्या ५ वर्षांत पुढे सरकले नाही. समिती पदाधिकार्‍यांकडून मोठा पाठपुरावा झाल्यानंतरही प्रकल्पाचे काम तसूभरही पुढे सरकले नाही. आता महाविकास आघाडीचे सरकार व पालकमंत्रिपदी छगन भुजबळ यांच्यासारख्या मातब्बर नेत्याची निवड झाल्याने व मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आल्याने पुन्हा एकलहरेवासियांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

गेल्या पाच वर्षांत शिवसेनेचे खा. हेमंत गोडसे यांनी प्रकल्पासाठी चिमणीच्या उंचीचा प्रश्न केंद्रात सोडविण्याचा प्रयत्न केला, मात्र मागील सरकारने त्यांच्या प्रयत्नांवर पाणी फिरवले. माजी आमदार योगेश घोलप यांनीही खूप पत्रव्यवहार केला, त्यांच्याही प्रयत्नांना यश आले नाही. तसेच जिल्हा परिषद सदस्य शंकर धनवटे, नगरसेवक विशाल संगमनेरे, असोसिएशनचे अध्यक्ष निवृत्ती चाफळकर, सरपंच सागर जाधव यांनीही मागील सरकारच्या काळात वेळोवेळी संबंधित कार्यालयांना पत्रव्यवहार केले. मात्र यांचाही प्रयत्नांना यश आले नाही.

प्रकल्प बचाव संघर्ष समितीनेही खूप आंदोलने केली, पंतप्रधानांना शालेय विद्यार्थ्यांनी पत्र लिहिली, मात्र याचाही काही फायदा झाला नाही. यामुळे एकलहरेवासीय आता मेटाकुटीला आले आहे. केंद्राची संच स्थलांतरामुळे परिसररातील जवळपास ५ हजार लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तरी आता नाशिक येथील एकलहरे प्रकल्पाबाबत महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पुढाकारातून एकलहरेचा औष्णिक वीजनिर्मिती केंद्राचा ६६० मेगावॅटचा प्रकल्प मार्गी लागला जाईल, अशी अपेक्षा नाशिककरांची आहे.

एकलहरे प्रकल्प केंद्रासंदर्भातील घडामोडी
* नाशिक औष्णिक वीज केंद्राची राख बंधारा धरून ६३६ हेक्टर जागा
* स्टेज १तोडून प्रस्तावित संचासाठी २० एकर जागा होणार उपलब्ध
* प्रस्तावित बदली संचसाठी २०१३ मध्ये जनसुनावणी
* प्रकल्पासाठी लागणारा नियोजित खर्च अंदाजे ४३०० कोटी
* प्रकल्पासाठी लागणारे पाणी गंगापूर धरणात आरक्षित.
* लागणारा कोळसा विदर्भातील महाजनवाडी येथील कोळसा आवंठित करण्यात आले आहे.

नाशिककरांना आणले ‘बुरे दिन’
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, निर्मिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक यांच्यासोबत प्रकल्प बचाव समितीची बैठका होऊनही आश्वासने सोडून नाशिककरांच्या पदरात काहीही पडले नाही. आता महाविकास आघाडी सरकार नाशिक औष्णिक वीज केंद्रातील प्रस्तावित प्रकल्पाबाबत काय भूमिका घेते, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

एकलहरे प्रकल्पामुळे शेतकरी जगणार
प्रकल्पाबाबत ठोस निर्णय न घेता पाच वर्षे भाजप सरकारने आशेचे गाजर दाखवून नाशिककरांना झुलवत ठेवले. महाविकास आघाडीने शासकीय प्रकल्प जिवंत ठेवावेत, जेणेकरून शेतकरीही जिवंत राहील. खासगीचे आक्रमण जर वीजक्षेत्रात वाढले तर वीज दर व वाढीव बिलांमुळे शेतकरी पुन्हा आत्महत्येस प्रवृत्त होतील. त्यामुळे सार्वजनिक उपक्रम जिवंत राहणे गरजेचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या