सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शैक्षणिक शुल्कात वाढ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शैक्षणिक शुल्कात वाढ

दहा हजार रुपयांपर्यंत भरावे लागणार शुल्क

नाशिक । प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालयांच्या शैक्षणिक शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, २०२०-२१ शैक्षणिक वर्षापासून सुधारित शुल्क लागू होणार आहे. यामध्ये अभ्यासक्रमानुसार एक-दोन हजारपासून ते १० हजारांच्या पुढे ही शुल्कवाढ करण्यात आली आहे.

२०१६ च्या सुधारित महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमांचे शुल्क निश्चित करण्यासाठी माजी कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी, अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार पुणे विद्यापीठाने माजी कुलगुरू डॉ. आर. एस. माळी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने त्यांचा अहवाल नुकताच कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना सादर केला.

हा अहवाल स्वीकारून नवीन वर्षासाठी विद्यापीठाने शुल्कनिश्चिती केली आहे. विद्यापीठाने नुकतेच उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत आणि पुनर्मूल्यांकन यांच्यात ५० रुपयांनी वाढ केल्याने त्यावरून वाद निर्माण झालेला आहे. हा वाद शांत होतो न होतो तोच आता नवीन शुल्करचनेतून विद्यार्थ्यांवर शुल्कवाढीचा भार टाकला आहे.

ही शुल्कवाढ विद्यापीठाचे सर्व विभाग, संलग्न महाविद्यालये, परिसंस्था, अनुदानित किंवा विनाअनुदानित तत्त्वावरील पदवी, पदव्युत्तर, पदविका, प्रमाणपत्र, एमफिल, पीएचडी. यासह सर्व अभ्यासक्रमांना लागू केली आहे, असे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी (दि.२८ ) रोजी काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com