Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

‘नन्ही कली’ गुणगौरव सोहळा : नीतिमूल्य बाळगत ध्येयाकडे वाटचाल करा – डॉ. वैशाली बालाजीवाले

Share

नाशिक । प्रतिनिधी

दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन जीवनाच्या नव्या टप्प्यावर तुमची वाटचाल सुरू झाली आहे. या काळात तुम्ही शैक्षणिक, मानसिक, शारीरिक अशा विविध स्थित्यंतरांना सामोरे गेले आहात. पुढील प्रवासात अनेक अडचणी येतील. मात्र, नीतिमूल्य बाळगत ध्येयाकडे वाटचाल करा, असे प्रतिपादन ‘देशदूत’च्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी केले.

गंगापूररोड येथील तारांगण सभागृहात ‘नन्ही कली’ उपक्रमांतर्गत मंगळवारी (दि.१२) २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात दहावी उत्तीर्ण विद्यार्थिनींचा गुणगौरव करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. व्यासपीठावर सायबर तज्ज्ञ तन्मय दिक्षीत, राज्य महिला आयोग सदस्य रोहिणी नायडू आदी उपस्थित होते.

डॉ. बालाजीवाले म्हणाल्या, दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर शिक्षणाचे नवीन दरवाजे तुमच्यासाठी उघडले आहेत. तुमचे ध्येय तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. आयुष्याच्या या वाटेवर मी कोण आहे? हा प्रश्‍न तुम्हाला पडत असतो. स्वत:ची ओळख निर्माण करण्याची ही वेळ आहे.

मोबाईल, टीव्ही यात वेळ घालवण्याऐवजी आयुष्याचे ध्येय निश्‍चित करा. ही वाट अधिक सुंदर होण्यासाठी वाचन व इतर छंद जोपासा. दहावीपर्यंतचा टप्पा तुम्ही यशस्वीपणे पूर्ण केला. यापुढे देखील शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द बाळगत स्वत:च्या पायावर उभे रहा, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. शिक्षण पूर्ण करत असताना एक चांगला माणूस होण्यासाठी प्रयत्न करा. पैशाच्या मागे धाऊ नका. यश आले की, पैसा आपोआप येतो, असे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी सायबर तज्ज्ञ तन्मय दिक्षीत यांनी ‘सायबर जागृती व सुरक्षित जीवन’ विषयावर मार्गदर्शन केले. अर्चना मारगोनवार यांनी ‘टॅग’चा अहवाल सादर करून प्रास्ताविक केले. ‘नन्ही कली’ या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थींनीना शिक्षणाचा मूळ प्रवाहात आणले जाते.

‘नन्ही कलीं’चा सत्कार
नन्ही कली उपक्रमात ८१२ मुलींनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी ५३४ मुली उत्तीर्ण झाल्या. त्यापैकी १४० विद्यार्थिनींनी ७० ते ८९ टक्के गुण मिळवत यश संपादन केले. मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गुणगौरव करून पाठीवर शाब्बासकीची थाप देण्यात आली.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!