Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

दिवाळीच्या खरेदीची लगबग सुरू; रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त

Share

नाशिक । प्रतिनिधी

राजकीय पक्षांची शहरात प्रचारफेर्‍यांची लगबग सुरू असताना बहुतेक नाशिककरांनी मात्र रविवारच्या सुट्टीचा वेळ खरेदीसाठी राखीव ठेवून दिवाळीसाठी लागणार्‍या साहित्याची खरेदी केली.
गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिल्याने नागरिकांनी दुपारपासून मेनरोड व शालिमार येथे दिवाळीच्या खरेदीसाठी गर्दी केली. सायंकाळी बाजारपेठांमध्ये गर्दी वाढल्याने ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. दिवाळी सुरू होण्यास अजून दोन आठवडे असले, तरी काहींचा ऑक्टोबरचा पगार झाल्यामुळे त्यांनी खरेदीचा मुहूर्त साधला.

बहुतांश कुटुंबे मुलांच्या सहामाही परीक्षा संपल्यानंतर खरेदीसाठी जातात; पण ऐन वेळी बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी, आवडीचे कपडे, वस्तू मिळण्यासाठी कमी वेळ मिळत असल्याने ग्राहकांनी अलीकडे दसरा संपला, की लगेच दिवाळीची खरेदी करण्याचा नवीन पर्याय निवडला आहे. या वर्षी देखील पंधरा दिवस आधीच दुकानांमध्ये गर्दी बघायला मिळते आहे. गेल्या आठवडाभर सायंकाळी कोसळणारा पावसाचा अनुभव आणि सुट्टी असल्याने नागरीक सकाळीच घराबाहेर पडले.

दुपारपर्यंत मेनरोड, रविवार कारंजा, सराफ बाजार, वंदे मातरम चौक यासह बाजारपेठांमध्ये उत्साही ग्राहकांनी गर्दी केली होती. दिवाळीसाठी दुकानांबाहेर केलेली रोषणाई, विविध आकर्षक योजनांचे फलक लावल्यामुळे बाजारपेठांत उत्सवाचे वातावरण बघायला मिळत असून सजलेल्या दुकानांकडे बघत पालकांबरोबर फिरणारी लहान मुलेही नवीन काहीतरी मिळणार या आनंदाने खूष होती.

पणत्या, रांगोळ्या, भेटवस्तूंच्या छोटेखानी स्टॉलबरोबरच कपड्यांच्या दुकानांतही गर्दी बघायला मिळाली. आनंदोत्सवाच्या मालिकेतील सर्वांत मोठा असा हा दिवाळी सण आता काही दिवसांवर आला असल्याची चाहूल प्रकर्षाने बाजारपेठेत जाणवत आहे.

बाजार पेठेत मंदीचे सावट पाहायला मिळत आहे. मात्र, दिवाळी सणामुळे बाजारातील नैराश्याची जळमटे दूर सारून चैतन्य संचारेल ही अपेक्षा दुकानदार आणि व्यावसायिकांना आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!