Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

दीपावलीच्या तेजाने उजळला बाजार; इलेक्ट्रॉनिक्स, कपडा मार्केट, सोन्यामध्ये मोठी उलाढाल

Share

नाशिक । प्रतिनिधी

सर्वत्र लखलखाट करणारी दिवाळी इलेक्ट्रॉनिक्ससह कापड बाजारपेठ, सराफा क्षेत्रासाठी देखील चमकदार ठरल्याचे चित्र शनिवारी पाहायला मिळाले. शहरात दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळे मुख्य बाजारपेठेतले रस्ते फुलून गेले होते. मंदीच्या सुगाव्यामुळे पडलेले व्यापार्‍यांचे चेहरे सध्या खुलून गेले असून, दिवाळीच्या तेजाने शहरातील बाजार उजळून गेल्याचे आशादायक चित्र पाहायला मिळाले.

दिवाळीने सध्या अच्छे दिन आणले असून कामगारांच्या हाती आलेला बोनस, अनेकांना मिळालेली अग्रीम यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात पैसा आला आहे. विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाही बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून येत होती. तेच चित्र धनत्रयोदशीला पाहण्यास मिळाले.

सराफा बाजार, मेनरोड, शालिमार, दहीपूल, सिडको, रविवार कारंजा परिसरासह शहरातील विविध मॉलमध्येही ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. धनत्रयोदशीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून रेडिमेड कपडे, साड्या, लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस खरेदीसाठीही कापडा बाजारात आणि मेनरोडवरील दुकानांत झालेल्या गर्दीमुळे अनेक दुकानात ग्राहकांना बराच वेळ ताटकळत थांबावे लागल्याचे पाहायला मिळले.

बाजारात आली तेजी
एलईडी, एलसीडी टीव्ही, फ्रीज, याच्यासह अन्य गृहोपयोगी वस्तूंना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. रेडिमेड फराळ, मिठाई आदी खाद्यपदार्थांसह भेट म्हणून चॉकेलट, ड्रायफूड आदींना मोठी मागणी आहे. वाहन बाजार, रिअल इस्टेट क्षेत्रातही चैतन्य पसरले आहे.

वाहतुकीचा पुरता फज्जा
दिवाळीची खरेदी करण्यासाठी आलेल्या नाशिककरांमुळे शहरातील रस्ते फुलून गेले होते. मात्र याचवेळी शालिमार, एमजी रोड, मेनरोड, रविवार कारंजा व अशोकस्तंभ येथे वाहतुकीचा फज्जा उडाला होता. यामुळे पादचार्‍यांनाही वाट काढण्यास मोठा अडसर निर्माण झाला होता. वाहतूक पोलिसांनी केलेले नियोजन कोलमडल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली.

झेंडूने सजले रस्ते
आज  (दि. 27) लक्ष्मीपूजन असल्याने लागणार्‍या फूलमाळा व फुलांचे तोरण घेण्यासाठी गर्दी होती. एमजी रोड, रविवार कारंजा येथे गिरणारे, देवगाव, मखमलाबाद आणि दरीसह अन्य भागातून विक्रेत्यांनी तसेच शेतकर्‍यांनी झेंडूची फुले आणि माळा विक्रीस आणल्या होत्या. रस्त्यांच्या कडेलाचा विक्रेत्यांनी झेंडूच्या माळा ठेवल्या होत्या. त्यातून फुलांमुळे रस्ते सजून गेले होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!