Type to search

Breaking News Featured दिवाळी - निमित्त दिवाळी - विशेष लेख नाशिक मुख्य बातम्या

दीपावली २०१९ : आली आली दिवाळी; शॉपिंगला जायची वेळ झाली

Share

नाशिक | नील कुलकर्णी 

यंदा नवरात्रोत्सवानंतर बाजारपेठेत खरेदीसाठी मोठा उत्साह दिसून आला. दुचाकी, चारचाकी वाहनांसह, फ्रीज, वॉशिंग मशीन, मोबाईल, टीव्ही खरेदीसाठी ग्राहकांनी खरेदीचा उत्साह दाखवला. दिवाळी आनंदाचा सण. यानिमित्त नवकोट नारायणापासून ते चंद्रमौळी घरात राहणारे खरेदी हमखास करतात.. यंदाही बाजारात दीपोत्सवानिमित्त चैतन्य अन् उत्साहाचा प्रकाश उमटत आहे.
उटण्याचा सुवास, आप्तेष्टांचा हवाहवासा सहवास
मिष्टान्नांचा गोड वास, दीपांचा झगमगाट
दीपावली शुभेच्छांचा दीप तेवत राहो मनामनांत….
अशा शुभेच्छा देत चैतन्यमय वातावरणात प्रकाशपर्वाला प्रारंभ होतो. तत्पूर्वी महिनाभर आधी बाजारपेठ चैतन्याने फुलून येते…

दीपोत्सव म्हणजे प्रकाशाचा, रंगांचा, चैतन्याचा, सुवासाचा अन् खरेदीचा सण. गरिबांपासून ते नवकोेटनारायणापर्यंत सारेच जण प्रकाशोत्सव आपल्या ऐपतीप्रमाणे आणि पद्धतीने साजरा करतात. हजारो वॅटच्या दिव्यांच्या माळांत न्हावून निघालेल्या गगनचुंंबी इमारतींपासून ते चंद्रमोैळी झोपडतील अबालवृद्ध या सणात शब्दश: अर्थाने या सणाच्या आनंदात न्हावून निघतात. हा सण व्यक्तीच्या मनावर चैतन्य, उत्साह आणि प्रकाशाचे गाणे गाऊ लागतो तसेच बाजारपेठेतही सर्वच घटकांवर या सणाची झळाळी दिसून येते.

अगदी कुंभाराच्या किमयागार हातांनी तयार केेलेल्या कलात्मक पणत्यांपासून ते उंची कपड्यांपर्यंत, विविध वस्तू, सोन्याचे अलंकार, कपडे, भेटवस्तू, फर्निचर, गृहसजावटीच्या, जीवनशैलीच्या वस्तू, गॅझेटस्, मोबाईल, खाद्यपदार्थ, मिठाई, सुकामेवा, वाहन खरेदी, घरकुलांची बुकिंग अशा सर्वच बाजारपेठेमध्ये चैतन्य दिसून येते.

सण-उत्सवाला नवीन कपडे खरेदी अगदी अग्रभागी असते. बच्चे कंपनीचा नवीन कपडे खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. चित्रपटातील आपल्या आवडत्या अभिनेत्यापासून ते अस्सल भारतीय पोषाख म्हणून ओळखला जाणारा कुर्ता पायजामा, इंडो-वर्स्टन पद्धतीची शेरवानी, कुर्ता याला हल्ली खूपच मागणी आहे. कारण दसरा-दिवाळीला असे भरजरी आणि पारंपरिक पोशाख अधिक साजेसे ठरतात. पुरुषांच्या कपड्यांमध्ये ट्राऊजर्स आणि शर्ट याला फारसे पर्याय नसले तरी सणासाठी म्हणून उंची कलाकुसर केलेले पार्टीवेअर, शेरवानी, कुर्ता-पायजामा घेण्याकडे अधिक कल दिसून येतो.

लिलन किंवा खादीचे ‘मोदी जॅकेट’ कुर्तावर घालण्याची फॅशन गेल्या दोन वर्षांपासून चांगलीच रुळल्याचे दिसून येत आहे. मंगलकार्य आणि उत्सवाव्यतिरिक्त असे पारंपरिक वस्त्र प्रावरणे घेण्याकडे हल्ली पुरुष मंडळींचा कल वाढलेला दिसून येतो. केवळ पारंपरिक वस्त्रेच नव्हेत तर त्यावर कलात्मक एम्ब्रॉयडरी केलेली ओढणी (शेला), मोजडीही हल्ली सणासाठी आवर्जून वापरल्या जातात.

महिलांमध्ये विविध प्रकारच्या काठापदराच्या साड्यांना सणासाठी अधिक मागणी असते. त्यामध्ये पारंपरिक राजवस्त्र पैठणीसह इरकली, कांजीवरम, नारायणपेठ, मोठ्या काठपदराच्या तलम साड्या, गढवाल सिल्क याला अधिक मागणी असते. त्यामुळे साडी-कपड बाजारात मोठी उलढाल होत असते.

इलेक्ट्रॉनिक वस्तूंची गरज हल्ली वाढलेली दिसते. सरकारी सेवक, चाकरमाने, कंपन्यांचे कामगार, आस्थापनांचे सेवक यांना दिवाळीचा बोनस मिळलेला आहे. यंदा पाऊसही समाधानकार पडला आहे. त्यामुळे शेतकरीवर्गातही आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे यंदा नवरात्रीच्या नवमीनंंतर बाजाराला चैतन्यमयी सातावरण दिसले. ते दिवाळीपयर्र्ंत सुरूच आहे.

सुखवस्तू जीवनाकडे सर्वांचाच कल असल्याने हल्ली घरात इलेक्ट्रॉनिक वस्तू, गॅझेट जीवनाचा अविभाज्य अंंंग झाले आहेत. दरवर्षी एकतरी इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करून जीवनमान आरामदायी करण्याकडे कल वाढताना दिसून येत आहे. त्यामध्ये वॉशिंग मशीन, एलईडी टीव्ही, डबल डोअर फ्रीज, ग्राईंडर, सॅण्डवीच मेकर, टोस्टर, मायक्रोव्हेव ओव्हन, पीठाची घरगुती गिरणी अशा वस्तू घेण्यार्‍यांच्या संंख्याही हल्ली वाढली आहे.

मुलांसाठी संगणक, टॅब, होमथिएटर्स यासह छंद, मनोरंजन म्हणून घरीच गाण्यांची आवड पूर्ण करणार्‍या करावके म्युझिक सिस्टीमचा पर्याय उपलब्ध झाल्याने या वस्तूंची खरेदी दिवाळीला वाढलेली दिसून येते. मोबाईलचे नवनवीन आणि अत्याधुनिक प्रकार दररोज येत आहेत.

त्यामुळे वर्षभर मोबाईलचे मार्केट दिवाळीला अधिकच चैतन्यशील होते. मोबाईल विक्री करणार्‍या आस्थापना सणासाठी म्हणून ‘शून्य रुपयांमध्ये मोबाईल घरी घेऊन जा, बाकी सुलभ हफ्त्यात’ अशा योजना जाहीर करत असतात. साहजिक ग्राहक दिवाळीत 20 हजारांपासून ते अगदी 40 हजार रुपयांच्या मोबाईलची खरेदी करतात. अर्थपुरवठा करण्यार्‍या बँकांमुळे हल्ली महागडे मोबाईल, गॅझेट घेणे मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात आले आहे.

सोने खरेदी ही हौस आणि भविष्यातील गुंतवणूक म्हणून पाहिली जाते. यंदा सोन्याच्या भावाने चाळीस हजारापर्यंत उसळी मारली. पुढेही लग्नसराईत सोन्याचे भाव चाळिशीपार जाणार असल्याने यंदा सोने खरेदीसाठी ग्राहकांचा उत्साह दिसला. सोन्याचे भाव कधी फार कमी होत नाहीत, शिवाय सोन्याचे दागिने प्रतिष्ठेचे प्रतीक आणि सणाला समृद्धीचा साज देते. त्यामुळे दिवाळीत सराफी पेढ्या ग्राहकांसाठी खास योजना जाहीर करतात.

राष्ट्रीय स्तरावरील कॉर्पोरेट सोन्याची दालने हिरे आणि सोन्याच्या दागिन्यांच्या ठराविक खरेदीवर घडणावळीत मोठी सूट देतात. इतकेच नव्हे तर काही सराफी पेढ्यांनी जुन्या सोन्याच्या बदल्यात तितक्याच किमतीचे नवीन सोन्याचे दागिने अल्प घडणावळ चार्जेससह ग्राहकांसाठी देण्याच्या योजनाही देऊ केल्या आहेत. सराफा बाजारात खास दिवाळीसाठी दागिन्यांची विस्तृत श्रेणी आली आहे.

त्यामध्ये अत्यंत सुरेख धाटणीचे पारंपरिक दागिने, पाटल्या, बांगड्या, नक्ष, कानातले, रिंग्जस्, पोहेहार, चपलाहार, गोठ, तोडे, मोहनमाळ, ठुशी, लक्ष्मीहार, पाटल्या, नेकलेस असे ‘एक्सक्युुसिव्ह’ प्रकार आले आहेत. पेशवाई पद्धतीच्या पारंपरिक दागिन्यांना नव्या पिढीतील महिलांची पसंती मिळत आहे. एकूणच भविष्यासाठी गुंतवणूक आणि प्रतिष्ठा, हौस यामुळे सोने, प्लॅटिनम, हिर्‍यांचे दागिने खरेदीला चैतन्य प्राप्त झाले आहे.

दिवाळीचा पाडवा (बलिप्रतिपदा) म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त. यावेळी नवीन घरांची बुकिंग आणि बांधून तयार झालेल्या घरातील गृहप्रवेश अत्यंत लाभदायी मानला जातो. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनीही ग्राहकांसाठी दिवाळी विशेष योजना देऊ केल्या आहेत.

यंदा रिझर्व्ह बँकेने रेपो दर कमी केल्याने दसर्‍यापूर्वी गृहकर्जावरील व्याजदरही कमी झाले. परिणामी अनेकांनी घर खरेदीसाठी उत्साह दाखवला. दिवाळीतही हा उत्साह कायम राहील.

बांधकाम व्यवसायात यंदा चांगले वातावरण आहे. द्वारकासारख्या परिसरात एका बांधकाम व्यावसायिकाने केवळ १२ लाखांत दुकान योजना आणली. साहजिकच मध्यम आणि लघु व्यवसायिकांसाठी ही पर्वणी ठरली आणि पहिल्या दिवशी काही तासातच त्या प्रकलामधील सर्वच सर्व दुकाने बुक झाली.

इतकेच नव्हे तर शेवटच्या काही मिनिटांत १०० ग्राहकांमधून सोडत काढून इच्छुकांनी दुकानांसाठी बुकिंग केली. हा एक नवा प्रकार पाहता कमी दरातील दुकानांची गरज आणि व्यावसायिक प्रकल्पालाही ग्राहक उत्तम प्रतिसाद देतात, हे अधोरेखित झाले.यासह घर खरेदीसाठी नवनवीन प्रकल्प सुरू आहेत.

विकासकांनी ग्राहकांना १ ते १५ लाख रुपयांंपर्यंत सूट दिली. गंगापूररोड, त्र्यंबकरोड, पेठरोड, दिंडोरीरोडसह नवीन आडगाव नाका, नाशिकरोड, जेलरोड, पाथर्डी फाटा, इंदिरानगर, सायखेडा रोड, नवीन नाशिक, अंबड, सातपूर, औरंगाबाद रोडवर नवीन गृहप्रकल्पांची उभारणी सुरू आहे. त्याच्या बुकिंगचा मुहूर्त ग्राहक साधत असल्याने रिअल इस्टेट व्यवसायात तेजी दिसून येत आहे. रेरा आणि महारेरा यामुळे पारदर्शी व्यवहाराने बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहक यांच्यामध्ये अत्यंत विश्‍वास आणि सौहार्दपूर्ण वातावरण तयार झाले आहे. त्याचे चांगले परिणाम यंदाच्या दिवाळीत अधोरेखित होत आहेत.

.वाहन खरेदीने व्यक्तीच्या आयुष्याला गती आणि नवीन दिशा मिळते. दिवाळी, दसर्‍याला वाहन खरेदीचा उच्चांक पाहायला मिळतो. विजयादशमीला नाशिककरांनी अडीच हजाराहून अधिक बाईक आणि ७०० हून अधिक चारचाकींची खरेदी केली. दिवाळीतही वाहन उद्योगात हेच चैतन्य कायम राहण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली.

रिनॉल्टच्या नवीन कारने चांगली ओपनिंग केली असून दिवाळीच्या मुहूर्तावर हजारो नाशिककर आपल्या नव्या कारसह दीपोत्सव साजरा करणार आहेत. दुचाकी वाहन खरेदीचा उत्साह यंदाच्या दिवाळी कायम राहणार आहे. त्यामध्ये हिरो, बजाज, यामाहा, रॉयल इनफिल्ड, कायनाटिक, व्हेस्पा, होंडा या वाहन उत्पादक कंपन्यांच्या दुचाकींची मागणी राहणार आहे.

एकूणच ‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ हे समीकरण ग्राहकांची खरेदी पाहता यंदाही अधोरेखित होत आहे. नाशिककर उत्सवप्रिय तितकाच नवनवीन खरेदीसाठी नेहमीच उत्साही असतो. यंदाही या सणाच्या राजाचा आनंद विविध खरेदीने सालाबादाप्रमाणे मौजमजेसह साजरा करतील, यात शंका नाही.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!