Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

दीपावली २०१९ : आज धनत्रयोदशी | धनत्रयोदशी कशी साजरी केली जाते?

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नत्रयोदशी हा दिवाळीचा पहिला दिवस. उत्तर भारतात याला धनतेरस म्हणतात. या दिवशी काही ना काही खरेदी केली जाते. कारण त्यामुळे उन्नती होते, अशी समजूत आहे. धन याचा अर्थ केवळ पैसा नाही. आपल्या प्राचीन ग्रंथांत पृथ्वी, जल, वायू, अग्नी, सूर्य यांना धन म्हणूनच संबोधले आहे. धनत्रयोदशी दिवशी आयुर्वेदाचे जनक म्हणून ओळखल्या जाणार्‍या धन्वंतरींची जयंती साजरी केली जाते.

कार्तिक वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी असते. दिवाळीचा हा पहिला दिवस असतो. याच दिवशी आयुर्वेदाचे जनक म्हणून ओळखल्या जाणार्‍या भगवान धन्वंतरींची जयंती साजरी केली जाते. असे म्हणतात की, हातात अमृताने भरलेला सुवर्ण कलश घेऊन धन्वंतरी समुद्रमंथनातून वर आले होते. त्यामुळे धन्वंतरी हे दीर्घायुष्य आणि अमरत्व देणारे देव आहेत, असे मानले जाते. भागवत पुराणात (२.७.२१) धन्वंतरीलाच देव मानले आहे. रोगराई दूर करणारा आणि या जगाला दीर्घायुष्याचे ज्ञान देणारा म्हणजेच आयुर्वेद देणारा देव म्हणजे धन्वंतरी! आपल्या प्राचीन इतिहासात धन्वंतरीचे अनोखे महत्त्व आहे.

धन्वंतरी हा आयुर्वेदाचा जनक आहे, असे अनेक जण मानतात. धन्वंतरी या देवाचा इतिहासही तितकाच रंजक आणि उद्बोधक आहे. चार वेदांपैकी कोणत्याही वेदात धन्वंतरीचा उल्लेख आढळत नाही. वेदांमध्ये अश्‍वनीकुमार (देवांचे वैद्य), काशिराज दिवोदास यांचे उल्लेख आहेत. पण धन्वंतरीचा नाही. धन्वंतरी हा वैद्यकशास्त्राचा देव म्हणून आपण मानतो. आणखी एक धन्वंतरी हा सुश्रुताचा गुरू होता. पुराणांचा अभ्यास केला तर असे दिसून येते की, देव धन्वंतरीबरोबरच आणखी तीन धन्वंतरी आपल्या देशात होते. त्यातील पहिला धन्वंतरी हा भास्कराच्या १६ शिष्यांपैकी एक होता.

दुसरा धन्वंतरी म्हणजे काशिराज दिवोदास, त्याचे आडनाव धन्वंतरी होते आणि याला प्रत्यक्ष विष्णूचा आवतार मानले जाते आणि तिसरा धन्वंतरी हा सम्राट विक्रमादित्याच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होता. या तिसर्‍या धन्वंतरीने ‘धन्वंतरीनिघन्तु’ नावाचा औषधांचा कोश लिहिला होता. धन्वंतरीचा इतिहास तसा गुंतागुंतीचा आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणून आपण धनत्रयोदशी साजरी करतो. हा दिवस ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ म्हणूनही साजरा केला जातो.

भारत कोशात म्हटल्याप्रमाणे धन्वंतरी इसवी सनाच्या १० हजार वर्षाांपूर्वी होऊन गेले. ते काशीचा राजा धन्वचे पुत्र होते. त्यांनी शल्यशास्त्रात विशेष संशोधन केले होते. धन्वंतरीच्या जीवनातील सर्वात मोठा वैज्ञानिक प्रयोग म्हणजे अमृत. अमृत कसे तयार करायचे हे धन्वंतरीने सांगितले असे म्हणतात. त्याने हा प्रयोग सोन्याच्या पात्रातच केला होता. त्याने मृत्यूवर संशोधन केले होते. त्याच्या संप्रदायात शंभर प्रकारचे मृत्यू सांगितले आहेत. त्यात केवळ एकच काल मृत्यू आहे. उर्वरित अकाल मृत्यू रोखण्यासाठी त्याने निदान आणि चिकित्सा दिली आहे. आयुष्याच्या चढउताराचे एकेक लक्षण धन्वंतरीने सांगितले आहे. आपल्या देशात दिवाळी थाटात साजरी केली जाते. दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते. या दिवशी विविध वस्तूंची खरेदी करण्याला महत्त्व आहे.

धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्याही या सणाचे महत्त्व आहे. असे म्हणतात, या दिवशी यमराजाला दीपदान केले असता अकाली मृत्यू येत नाही. घराघरांत दिवाळीची सजावटही आजपासूनच केली जाते. घर स्वच्छ करून, रंग लावून, दारापुढे रांगोळी काढून संध्याकाळच्या वेळी दीप प्रज्वलित करून लक्ष्मीचे आवाहन केले जाते. या दिवशी जुनी भांडी बदलणे आणि नवी भांडी विकत घेण्याला शुभ मानले जाते. या दिवशी चांदीच्या वस्तू खरेदी करणे विशेष लाभकारक असते, असे मानले जाते.

धनत्रयोदशी कशी साजरी केली जाते?
धनत्रयोदशीच्या निमित्ताने लोक आपल्या घराची दुरुस्ती करतात. रंगरगोटी करतात. पणत्या लावतात. रांगोळी काढतात. लक्ष्मीचे आवाहन करतात. सूर्यास्तानंतर लक्ष्मी आणि गणपतीची गुलाब आणि झेंडूच्या फुलांचे हार, मिठाई, तुपाचे दिवे, धूप-दीप, अगरबत्ती, कापूर अर्पण करून समृद्धी, बुद्धिमत्ता आणि संपन्नतेसाठी पूजा केली जाते.

पौराणिक कथा
धनत्रयोदशीच्या अनेक पौराणिक कथा आहेत. त्यातील एक कथा राजा हिम याच्या १६ वर्षांच्या मुलाची आहे. त्याच्याबाबतीत भविष्यवाणी करण्यात आली होती की, त्याचा मृत्यू त्याच्या लग्नानंतर चौथ्या दिवशी साप चावल्याने होईल. त्याचा विवाह झाला. त्याची पत्नी हुशार होती. तिने आपल्या पतीचे प्राण वाचवण्याचा उपाय शोधून काढला. तिने चौथ्या दिवशी पतीला झोपूच दिले नाही. आपले सोन्या-चांदीचे सर्व दागिने आणि मोहरा एकत्र करून शयनकक्षाच्या दरवाजाबाहेर ढीग उभा केला आणि खोलीत प्रत्येक ठिकाणी दिवे लावले.

पतीला जागे ठेवण्यासाठी त्याला ती वेगवेगळ्या गोष्टी सांगत होती. मृत्यूचे देवता यमराज सापाचे रूप घेऊन तेेथे पोहोचला तेव्हा दागिने आणि दिव्यांच्या लखलखाटाने त्याचे डोळे दिपले. त्याला खोलीत जाता येईना. मग त्याने मोहरांच्या ढिगावरून उडी मारून आत जाण्याचे ठरवले. पण त्या ढिगावर गेल्यावर राजपुत्राच्या पत्नीचे गायन ऐकत तिथेच थांबला. संपूर्ण रात्र तिथे थांबला आणि सकाळ झाल्यावर राजपुत्राचे प्राण न घेताच तिथून निघून गेला.

अशा तर्‍हेने राजपुत्राचे अकाली मरण त्याच्या पत्नीमुळे टळले आणि मग त्या दिवसापासून धनत्रयोदशी साजरी करण्यात येऊ लागली. धनत्रयोदशी दिवशी धन्वंतरीची पूजा होते. तशीच लक्ष्मीचीही पूजा केली जाते. काही ठिकाणी सात प्रकारच्या धान्याची पूजा केली जाते. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व आहे. धनत्रयोदशी हा पहिला दिवस. धन्वंतरीचे स्मरण तर या दिवशी होतेच पण अनेक संशोधन केंद्रांची स्थापनाही या दिवशी केली जाते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!