Thursday, April 25, 2024
Homeनाशिककरोनाचा उद्योग जगतावर होणार परिणाम

करोनाचा उद्योग जगतावर होणार परिणाम

सातपूर । रवींद्र केडीया

करोनाच्या प्रादुर्भावाने जगाला वेढले असून महाराष्ट्राने महामारी म्हणून घोषणा केली आहे. त्याचा बराच परिणाम उद्योग जगतावर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आजच्या स्थितीत उद्योग सुरळीत असेल तरी आजाराचा प्रादुर्भाव असाच वाढत राहिला तर येणार्‍या काळात छोट्या व मध्यम उद्योगांना गंभीर संकटाला सामोरे जावे लागेल असे चित्र आहे.

- Advertisement -

आधुनिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पुरवठादार उद्योगांची संख्या जास्त आहे. ज्यांना व्हेंडर या नावाने संबोधले जाते. मोठ्या उद्योगांना लागणारे छोटे सुट्टे भाग या उद्योगाद्वारे निर्माण केले जातात. बहुतांश उद्योगांना लागणार्‍या इलेक्ट्रॉनिक वस्तू चायनातून आयात केल्या जातात. चायनातून आवक बंद झाल्याने येणार्‍या काळात उद्योगांना संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. बहुतांश छोट्या व मध्यम उद्योगांकडे काही प्रमाणात मागवलेले सुटे भाग मोठ्या पुरवठादारांच्या गोदामात उपलब्ध असतात. त्यामुळे सद्यस्थितीत उत्पादन प्रक्रिया सुरळीत दिसत असली तरी स्टॉक संपल्यानंतर मात्र गंभीर परिस्थिती ओढवण्याची शक्यता आहे.

करोना आजाराबाबत सर्वदूर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली असतानाही उद्योग क्षेत्रात उत्पादन प्रक्रिया सुरळीत असल्याचे चित्र आहे. कामगारांमध्ये काही अंशी भीती असली तरी उपस्थिती मात्र शतप्रतिशत आहे. त्याचवेळी काळजी घेतली जात असल्याचे दिसून येत आहे. छोट्या उद्योगांप्रमाणेच मोठे उद्योगही गरजेप्रमाणे सुटे भाग स्टॉकमध्ये ठेवत असल्याने आजच्या स्थितीत तरी सुट्या भागांचा तुटवडा अत्यल्प आहे. मात्र हीच परिस्थिती महिनाभर राहिल्यास उद्योगांनाही उत्पादन प्रक्रिया थांबवावी लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

भारतीय उत्पादनाला संधी
गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय बनावटीच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. चायना उत्पादन हे सर्वच बाबतीत भारती उत्पादनापेक्षा स्वस्त दिले जाते. आज चायनाचा मालच उपलब्ध होत नसताना भारतीय उत्पादकांना बाजारपेठेत पाय रोवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यामुळे आजची अत्यावश्यक गरज कक्षात घेऊन भारतीय उत्पादक कंपनांना संधी प्राप्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
निखिल पांचाल

येणार्‍या काळात बँक करप्सी
मार्च अखेर शासकीय कागदपत्रांची पूर्तता करण्या सोबतच आर्थिक गणिते जुळवण्यात गुरफटलेल्या उद्योगाला सुट्या भागांच्या शॉर्टेजचा फटका बसण्याची शक्यता आहे. हा प्रादुर्भाव असाच राहिला तर येणार्‍या काळात बँक करप्सीमुळे मोठ्या प्रमाणात उद्योगांना संकटांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
उन्मेष कुलकर्णी

कोणावर होणार परिणाम
देशातील बहुतांश उद्योग हे निर्यातक्षम झाले आहेत. त्यांची उत्पादनेही जगभरात विक्री केली जातात तर काही उद्योग परदेशातून आयात केल्या जाणार्‍या सुट्या भागांवर अवलंबून आहेत. अशा क्षेत्रातील सुमारे ५० टक्के उद्योगांवर या जागतिक महामारीचा परिणाम होणार आहे. आजच्या घडीला स्थिती सामान्य दिसत असली तरी येणार्‍या काळात हा प्रश्न गंभीर होणार आहे.
आशिष नहार

- Advertisment -

ताज्या बातम्या