Type to search

Breaking News Featured maharashtra नाशिक मुख्य बातम्या

कोरोना : नागरिकांनी भिती न बाळगता काळजी घ्यावी : मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Share
कोरोना : नागरिकांनी भिती न बाळगता काळजी घ्यावी : मुख्यमंत्र्यांचे आवाहन; Corona : Citizens should care without fear: Chief Minister

कोरोना प्रतिबंधासाठी राज्यशासन सज्ज

मुंबई | प्रतिनिधी 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने पुरेशी खबरदारी घेतली आहे. नागरिकांनी भय‍भीत होवू नये. असे आश्वस्त करतानाच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नका, होळी साजरी करताना तिचे स्वरुप मर्यादित ठेवा. मुंबई पाठोपाठ पुणे, नागपूर येथील विमानतळांवर थर्मल स्कॅनिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये येणाऱ्या परदेशी नागरिकांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभेत औचित्याच्या मुद्यावर कोरोनासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, कोरोनाबाबत नागरिकांमध्ये जी भिती पसरली आहे ती दूर करण्यासाठी राज्यशासनाने पावले उचलावीत. जनजागृती मोहिम हाती घ्यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना हा जगाच्या चिंतेचा विषय बनला आहे. राज्याच्या जनतेला धीर देण्याचे काम सर्वांनी मिळून करणे आवश्यक आहे. या संदर्भात गेल्या महिन्याभरापासून आरोग्य विभागाच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाच्या माध्यमातून पुरेशी खबरदारी घेण्यात येत आहे.

कोरोनाबाबात नमुने तपासण्याची सुविधा पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत केली आहे. त्यासोबतच मुंबई आणि नागपूर येथेही याची सोय करण्यात आली आहे. राज्यात आवश्यक त्या मास्कचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. प्रसंगी खासगी रुग्णालयांची देखील मदत घेण्यात येत आहे.

ज्या विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमाने येतात तेथे तपासणीची सोय करण्यात आली आहे. विमानाची साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पुरेशी खबरदारी बाळगण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. राज्यात येणाऱ्या होळीच्या उत्सवावर कोरोनाचा सावट असून या होळीमध्ये कोरोनाच संकट जळून खाक व्हावे अशी भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी. होळीचा सण साजरा करताना त्याचे स्वरुप मर्यादित ठेवावे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

कोरोनाबाबतच्या जाणीव जागृतीसाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेण्यात आली असून शाळा, सार्वजनिक ठिकाणे, रेल्वे व बसस्थानक या ठिकाणी पोस्टर्स, बॅनर्स लावण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधींसाठी जाणीव जागृतीचे चर्चासत्र घेण्यात येणार असून त्यानंतर आपल्या भागातील नागरिकांचे लोकप्रतिनिधींनी प्रबोधन करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. महाराष्ट्रात कोरोनाचा एकही रुग्ण नाही त्यामुळे नागरिकांनी काळजी करु नये तर काळजी घ्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, नितेश राणे, रविंद्र वायकर, सुनील प्रभू, प्रताप सरनाईक, रवी राणा, राम कदम यांनी चर्चेत सहभाग घेतला.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!