Friday, April 26, 2024
Homeनाशिकशहरात अनेक भागात दुकानदारांत संभ्रम; दुकाने उघडण्याच्या पहिल्या दिवशी ठराविक भागात गर्दी

शहरात अनेक भागात दुकानदारांत संभ्रम; दुकाने उघडण्याच्या पहिल्या दिवशी ठराविक भागात गर्दी

नाशिक । प्रतिनिधी

करोनाचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर दोन टप्प्यातील लॉकडाऊन संपल्यानंतर केंद्र सरकारने रेड, ऑरेंज व ग्रिन झोन मध्ये दिलेल्या सवलतीत विना अत्यावश्यक सेवा व दुकाने सुरू करण्यात परवानगी दिली होती. या निर्णयाचा आधार घेत राज्य शासनाने विना अत्यावश्यक सेवा दुकाने सुरू करण्यात मंगळवारी ( दि ५ )  परवानगी दिली. यानुसार जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सामाजिक अंतराची आणि मास्कचे बंधन या अटीनुसार जिल्ह्यातील दुकानाना परवानगी दिली.

- Advertisement -

आज नाशिक शहरात अनेक उपनगरात सर्व प्रकारची दुकाने सुरू झाली असुन शहरातील मुख्यबाजारपेठ असलेल्या काही भागात नागरिकांची गर्दी बघायला मिळाली. शासनाच्या निर्णयामुळे अजुनही संभ्रम आहे असल्याचे दिसून आले . मंगळवारी जिल्हाधिकार्‍यांनी सामाजिक अंतराच्या अटीसह जाहीर केलेल्या निर्णयानुसार तब्बल दीड महिन्यानंतर सर्व प्रकारची ठराविक दुकाने शहरात उघडण्यात आली. यामुळे नागरिकांना समाधान व्यक्त केले. शासनाच्या निर्णयानुसार नाशिक महापालिकेत ठराविक गल्ल्यात पाच दुकानापर्यतच दुकाने सुरू असल्याचे दिसुन आले. शहरातील उपनगरे, नव्या वसाहती, मोकळ्या भागात सर्व प्रकारची दुकाने उघडण्यात आल्याचे दिसुन आले. शहराला जोडलेल्या २३ खेड्यात दुकाने उघडल्याने नागरिकांना अत्यावश्यक बाबी खरेेदी केली.

शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा भागात गेली अनेक दिवस किराणा, मेडीकल व भाजीपाला खरेदीसाठी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यत काहीसी वर्दळ होती. आज मात्र याठिकाणी सर्वच प्रकारची दुकाने उघडल्याने नागरिकांची व वाहनांची गर्दी दिसुन आली. अनेक ठिकाणी शेतीची मशिनरी व वस्तु खरेदीसाठी शेतकर्‍यांनी गर्दी केली होती. त्याचबरोबर मुसलीम बांधवाचा सण सुरू असल्याने काही कपड्याच्या दुकानात नियम पाळत नागरिकांनी खरेदी केली. तसेच पुस्तकांच्या दुकानात विद्यार्थी दिसुन आले. अशाप्रकारे शहरात वर्दळीचे चित्र दिसले. तसेच दुसरीकडे किती दुकाने उघडायची ? यासंदर्भात संभ्रम असल्याने शहरात मेनरोड, शालीमार याभागात दुकाने बंदच असल्याचे शुकशुकाट दिसुन आला.

जगभरात करोना विषाणूने थैमान घातल्यानंतर याचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी केंद्र शासनाने २२ मार्च रोजी जनता कर्फ्यु आणि नंतर २३ मार्चपासुन १४ एप्रिलपर्यत लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्राने हा लॉकडाऊन पुन्हा ३ मे पर्यत वाढविला. नंतर देशातील स्थितीत सुधारणा न झाल्याने आता लॉकडाऊन १७ मे पर्यत वाढविण्यात आला आहे. अशाप्रकारे तीन टप्प्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये भाजीपाला, डेअरी, बेकरी, किराणा, दवाखाने व मेडीकल दुकाने अशा अत्यावश्यक सेवांनाच ठराविक तासांसाठी परवानगी देण्यात आली होती.

या लॉकडाऊनमध्ये अडकुन पडलेल्या नागरिकांना तीन झोन नुसार आणि सामाजिक अंतर व खबरदारीच्या अटीवर केंद्र शासनाने विना अत्याश्यक सेवा दुकानांना परवानगी दिली होती. मात्र यानुसार परवानगी दिल्यानंतर नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येत असल्याचे वा सामाजिक अंतराचे पालन केले जात नसल्याचे समोर आल्यानंतर स्थानिक प्राधिकरणाने यावर पुन्हा बंदी आणली होती. मात्र देश व राज्याचे थांबलेले अर्थचक्र सुरू करण्यासाठी आता विना अत्यावश्यक सेवा – दुकाने, खाजगी कार्यालये, उद्योग सुरू करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे.

यानुसार आता राज्य शासनाने देखील आता दुकाने उघडण्यास परवानगी दिली असुन अटी शर्तीचे पालन न केल्यास पुन्हा बंदी घालण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकरणाकडे राखुन आहे. यामुळे आता दुकाने सुरू ठेवण्यासाठी नागरिकांना सामाजिक अंतराचे पालन करावे लागणार असुन अन्यता या सेवा बंद करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या