लॉकडाऊनवर राज्य शासनाच्या सवलतीनंतर महापालिका क्षेत्रातील भाजीबाजार-मटन चिकन शॉपची वेळ जैसे थे

लॉकडाऊनवर राज्य शासनाच्या सवलतीनंतर महापालिका क्षेत्रातील भाजीबाजार-मटन चिकन शॉपची वेळ जैसे थे

नाशिक । प्रतिनिधी

करोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने लागू केलेल्या दुसर्‍या टप्प्यातील लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा वाढविल्यानंतर राज्य शासनाने लॉकडाऊन शिथील करीत अत्यावश्यक सेवांसह इतर काही दुकाने – सेवेत सवलती जाहीर केल्या आहे. यामुळे बाजारात आता काहीशी गजबज दिसुन येणार असली तरी महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक वस्तू – सेवेतील भाजीबाजार, मटन – चिकन व अंडी यांच्यासाठी पुर्वी असलेली म्हणजे सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यत ही वेळ जैसे थे ठेवली आहे.

आज महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी भाजीबाजारासंदर्भाती आदेश जारी केला आहे. या आजच्या आदेशानुसार महापालिकेने ठरवून दिलेल्या भाजीबाजारात, मटन चिकन अंडी विक्रेत्यांना पुर्वी प्रमाणेच केवळ सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यतच विक्रेत्याला भाजीपाला विकता येणार आहे. महापालिकेने ठरवून दिलेल्या भाजीबाजार व ठिकाणा व्यतिरीक्त इतरत्र अनाधिकृतपक्षे बसणार्‍या विक्रेत्यांचा भाजीपाला व इतर माल अतिक्रमण विभागाकडुन तात्काळ जप्त केला जाणार आहे. तसेच दुकानदारांकडुन सामाजिक अंतराचे पालन होत नसल्याचे दिसल्यास पोलीसांच्या मदतीने दुकानदारावर कारवाई करुन हे दुकान बंद करण्यात येणार आहे. अशाप्रकारे करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी हा आदेश काढण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यात करोना रुग्णांचा आकडा ३६३ झाला असुन यात नाशिक शहरातील रुग्णांची संख्या १७ झाली आहे. शहरात प्रतिबंधक क्षेत्राची संख्या १० झाली असुन यात आज पुन्हा एकने वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे शहरात नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे करोनाचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी नागरिकांना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. यादृष्टीने महापालिका प्रशासनाने पाऊले उचलली असुन आयुक्तांनी भाजी विक्रेते व अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने यांच्यासाठी आचारसंहिता लागू केली आहे.

भाजी बाजारात विक्रेत्यांनी दोन दुकानातील अंतर ५ मीटर इतके ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच विक्रेता व ग्राहक यांच्यात १ मीटर अंतर राहील अशी व्यवस्था करणे बंधनकारक आहे. तसेच किराणा, डेअरी, बेकरी, मेडीकल या दुकानांना देखील सामाजिक अंतराचे नियम लागु आहे. शहरात भरणारे भाजीे बाजार, किराणा, मेडीकल दुकानात सामाजिक अंतर न ठेवता नियमांचे उल्लंघन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आयुक्तांनी आज दोन आदेश काढले असुन याद्वारे आता भाजी विक्रेते व दुकानावर थेट पोलीस कारवाई केली जाणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com