Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकदिंडीसाठी रथाचे आज लोकार्पण

दिंडीसाठी रथाचे आज लोकार्पण

सिन्नर । प्रतिनिधी

आयुष्यातील शेवटच्या क्षणापर्यंत धार्मिक कार्यात स्वत:ला वाहून घेतलेल्या वडीलांच्या स्मृति जपण्यासाठी थेट निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीसाठी अत्याधुनिक असा रथ देण्याचा संकल्प तालुक्यातील कुंदेवाडी येथील पोटे परिवाराने प्रत्यक्षात उतरवला असून आज  (दि.२४) वडीलांच्या प्रथम पूण्यस्मरण दिनी या रथाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

- Advertisement -

मुसळगाव येथील सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीचे व्यवस्थापक कमलाकर पोटे यांचे वडील कै. बलराम गणपत पोटे पहिल्यापासून धार्मिक प्रवृत्तीचे. सकाळी उठल्यानंतर पहाटेच गावातील दत्त मंदिरात जाऊन साफ-सफाईपासून पूजेपर्यंत सर्व कामे स्वत:च पार पाडायचे. महिण्यातील प्रत्येक एकादशीला त्यांची त्र्यंबक वारी कधी चुकली नाही. दरवर्षी न चुकता त्र्यंबकेश्वर, पंढरपूर आणि आळंदीच्या वारीला ते हमखास जायचे.

वारकरी संप्रदायात महत्वाचे स्थान असणारे एकनाथ महाराज गोळेसर हेदेखील कुंदेवाडीचेच. पोटे कुटुंबाशी त्यांचे घरोब्याचे संबध. निवृत्तीनाथांची दिंडी आळंदीला जाते, तेव्हा याच कुंदेवाडीत या दिंडीचे वारकर्‍यांचे जोरदार स्वागत करण्याची परंपरा आजही सुरु आहे. कै. बलराम पोटे हेदेखील त्यात आघाडीवर असायचे. या दिंडीमध्ये कुंदेवाडी व परिसरातून मोठ्या प्रमाणावर भाविक सहभागी होत असतात. त्यांच्या सोयीसाठी गावाचाही एक रथ असावा अशी एकनाथ महाराजांची इच्छा होती. कै. पोटे यांच्यासह अनेकांकडे त्यासाठी ३-४ वर्षांपासून पाठपुरावा करीत होते. कै. पोटे यांनी दिड-दोन वर्षांपूर्वीच असा रथ बनवून देण्यासाठी कमलाकर, नातू अविनाश यांच्यासह कुटूंबातील इतरांनाही गळ घातली होती.

वडील जिवंत असेपर्यंत कुठल्या ना कुठल्या कारणाने रथ बनवण्याचे टळत होते. मात्र, वडीलांच्या निधनानंतर त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा संकल्प पोटे कुटुंबाने केला आणि आज  (दि.२४) ज्वालामाता लॉन्सवर सकाळी ११ वाजता वडीलांच्या पहिल्या स्मृतिदिनी हा रथ एकनाथ महाराज गोळेसर यांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.

पावणे दोन लाखांचा खर्च
संपूर्ण स्टेनलेस स्टील बनावटीचा हा रथ मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील गोकूळ इंडस्ट्रिज या कारखान्यात तयार करण्यात आला आहे. सुमारे पावणे दोन लाख रुपयांचा खर्च त्यासाठी झाला असून हा रथ तयार करण्यासाठी १५ दिवस लागले. कुंदेवाडी येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्याचे प्रमुख एकनाथ महाराज गोळेसर यांच्या स्वाधीन हा रथ करण्यात येणार आहे.

वडील पहिल्यापासून धार्मिक वृत्तीचे होते. त्र्यंबकेश्वर, पंढरपूर, आळंदीची वारी त्यांची कधी चुकली नाही. गावातून दिंडीत जाणार्‍या वारकर्‍यांसाठी रथ बनवून देण्याचे त्यांचे स्वप्न होते. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरते आहे. त्यांच्या हयातीत हे स्वप्न पूर्ण झाले असते तर अधिक आनंद झाला असता. ज्या वारकर्‍यांमध्ये ‘आण्णा’ नेहमीच रमले, त्र्यंबकेश्वर, आळंदी, पंढरपूरच्या वारीला गेले. त्याच वारीला या रथाच्या माध्यमातून ते यापूढेही जात राहतील. त्यांच्या स्मृति रथाच्या माध्यमातून ते यापूढेही जात राहतील. त्यांच्या स्मृति चिरंतन जतन करण्यासाठीच आम्ही रथासाठी पुढाकार घेतला आहे.
कमलाकर पोटे, व्यवस्थापक, स्टाईस

- Advertisment -

ताज्या बातम्या