Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

अटल आरोग्य वाहिनीने वाचवले चंद्रभागाचे प्राण

Share
अटल आरोग्य वाहिनीने वाचवले चंद्रभागाचे प्राण; chandrabhaga's life saved by Atal Aaaroygaya vahini yojna

मुंबईत गुंतागुंतीची ह्रदय शस्रक्रिया यशस्वी; आदिवासी विकासकडून तीन लाखांची मदत

 

नाशिक ।प्रतिनिधी

आदिवासी विद्यार्थ्यांना होणाऱ्या विविध आजारांचे निदान करून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली वेळेवर उपचार करण्यासाठी शासनाने ‘अटल आरोग्य वाहिनी-आदिवासी जीवनदायिनी’ ही योजना सुरु केली आहे. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून कळवण प्रकल्पांतर्गत चालविण्यात येणाऱ्या गोपाळवाडी शासकीय आश्रमशाळेच्या नववीत शिकणाऱ्या चंद्रभागा मोहन चौरे या विद्यार्थींनीवर याच योजनेतून मुंबईत ह्रदय शस्रक्रिया नुकतीच करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी आदिवासी विकास विभागाकडून आश्रमशाळेच्या विकासासाठी देण्यात येणाऱ्या शाळा व्यवस्थापन निधीतून सुमारे तीन लाख रुपये रुपये या शस्त्रक्रियेसाठी उपलब्ध करून देण्यात आले.

केंद्र सरकारच्या सहाय्यातून राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी वाहण्यासाठी रुग्णवाहिका आणि डॉक्टरांचे पथक, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची नियमित काळजी घेणे, विद्यार्थी, शिक्षक, व आदिवासी पाड्यातील स्थानिक नागरिकांना आरोग्य शिक्षण देणे, प्रत्येक विद्यार्थ्यांचे आरोग्य कार्ड तयार करणे असे आरोग्यविषयक उपक्रम आदिवासी विकास विभागाच्या अटल आरोग्य वाहिनी या योजनेतून सुरु आहेत. दीड वर्षांपूर्वी अटल आरोग्य वाहिनी मार्फत करण्यात आलेल्या तपासणीत कळवण तालुक्यातील चंद्रभागा हिस हृदयाचा आजार असल्याचे निष्पन्न झाले होते.

तिच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिनीमध्ये अडथळा निर्माण होऊन ती दबली असल्याचे निदान करण्यात आले होते. परिणामी हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा होत नसल्याने तीला श्वास घेण्यात त्रास सहन करावा लागत होता. त्यावेळी अटल आरोग्य वाहिनीच्या माध्यमातून चंद्रभागाला जिल्ह्यातील वेगवेगळ्या नामांकित रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु गंभीर शस्रक्रिया करावी लागणार असल्याने तिच्या पालकांकडून नकार देण्यात येत होता. मात्र अटल वाहिनीच्या शाळा आरोग्य सहाय्यक व्यवस्थापक डॉ. किरण केदार यांनी त्यांचे समुपदेशन करून शस्त्रक्रियेसाठी तयार केले.

पालकांची संमती मिळवल्यावर चंद्रभागा हिस मुंबईच्या केईएम रुग्णालयात गेल्या २६डिसेंबरला दाखल करण्यात आले होते. तिच्या वेगवेगळ्या तपासण्या करून १० फेब्रुवारीला अँजिओग्राफी करण्यात आलीय. मात्र तिचे वय अवघे १५ वर्षे असल्याने हि शस्रक्रिया अतिशय अवघड होती. मात्र डॉक्टरांनी जोखीम पत्करून हि शस्रक्रिया यशस्वी केली. त्यानंतर दि. २० फेब्रुवारीला पुन्हा एकदा तीन तासांची अत्यंत गुंतागुंतीची शस्रक्रिया करून तिची जीवघेण्या संकटातून सुटका करण्यात डॉक्टरांना यश मिळाले. या शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च आदिवासी विकास विभागाकडून शाळा समितीला देण्यात येणाऱ्या अनुदानातून करण्यात आला.

१ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांना लाभ
आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि पोषणाची ही अभिनव योजना नोव्हेंबर २०१८ मध्ये कार्यान्वित झाली आहे. राज्यातील अतिदुर्गम भागातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (कळवण, तळोदा, धुळे, यावल, नंदुरबार, राजूर, किनवट, पांढरकवडा, धारणी, कळमनुरी, नागपूर, गडचिरोली, अहेरी, भामरागड ) अधिनस्त असलेल्या ३०९ शासकीय आश्रमशाळा, 8 एकलव्य मॉडेल निवासी आश्रमशाळा व इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील १ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांसाठी विशेष केंद्रीय सहाय्यातून रुग्णवाहिका व आयुष डॉक्टरांची सुविधा देण्यात येत आहे. १४ अतिदुर्गम भागात कार्यरत असलेले ७३ डॉक्टर, ८ व्यवस्थापक, ४८ रुग्णवाहिका यासोबत विद्यार्थ्यांच्या आजाराचे निदान करणारे पुण्यातील कमांड सेंटर या व्यवस्थेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांचा गंभीर आजारापासून बचाव करणे शक्य झाले आहे.
मनिषा वर्मा, प्रधान सचिव (आदिवासी विकास विभाग)

शाळेतील शिक्षकाची रुग्णालयात सोबत
गोपाळखडी शासकीय आश्रमशाळेतील गणिताचे शिक्षक रोशन शेळके यांची चंद्रभागाला या उपचारादरम्यान मोठी साथ मिळाली. आईवडील अशिक्षित असल्याने तिला उपचारासाठी मुंबईत आणण्याची जबाबदारी शेळके यांनी स्वीकारली होती. केईएम रुग्णालयात आपल्या या विद्यार्थींनीसाठी ते सलग १५ दिवस उपस्थित होते. शस्रक्रियीयेसाठी रक्ताची उपलब्धता करून देणे, उपचाराच्या खर्चाची व कागदपत्रांची पूर्तता करणे आदी जबाबदाऱ्या शेळके यांनी पार पाडल्या. त्यांच्या या सोबतीमुळे चंद्रभागाची प्रकृती स्थिर झाली असून ती पुन्हा शाळेत येऊन मित्र-मैत्रिणींना भेटण्यास आणि पुढचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी उत्सुक आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!