एकाच दिवशी ३ सोनसाखळ्या हिसकावल्या; शहरात चैनस्नॅचर पुन्हा सक्रीय
Share

नाशिक । प्रतिनिधी
शहरात सोनसाखळी चोर पुन्हा सक्रिय झाले असून एकाच दिवशी विविध ठिकाणी तीन सोनसाखळ्या हिसकवल्याच्या घटना शहरात घडल्या. या प्रकरणी म्हसरूळ व उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करणत आले आहेत.
उपनगरच्या नारायणबापू नगरमध्ये गुरुवारी रात्री पावणे नऊच्याच सुमारास सोनसाखळी चोरीची घटना घडली. या प्रकरणी अनिता भूषण गवळी (रा. रामनगर, जेलरोड) यांनी तक्रार दिली असून त्यानुसार, रात्री जेवन झाल्यानंतर त्या गवळी या अभिनव शाळेच्या पुढे पायी फिरत असताना, काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने ओढून वेगात पोबारा केला. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक लोंढे हे तपास करीत आहेत.
म्हसरुळ परिसरात गुरुवारी (ता.१०) सोनसाखळी ओढून नेल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. ही घटना दिंडोरी रोडवर सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. मधुकर पवार (रा. नर्मदा बंगला, श्री हरिकृपा सोसायटी, मेरी, दिंडोरीरोड) हे 72 वर्षीय वृध्द त्यांच्या बंगल्याच्या गेटसमोर त्यांची कार पुसत होते. त्यावेळी काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून दोघे संशयित आले. एकाने पवार यांच्याकडे पत्ता विचारण्याचा बहाणा केला आणि नेमकी संधी साधून त्यांच्या गळ्यातील २३ ग्रॅमची सोन्याची चैन बळजबरीने ओढून पोबारा केला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एन. भडीकर हे करीत आहेत.
म्हसरुळ परिसरातील गीतानगरमध्ये रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास घडली. मंजूषा मिलिंद देवकुटे (रा. धनेश्वर सोसायटी, जुन्या पेट्रोल पंपामागे, दिंडोरीरोड, म्हसरुळ) यांच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (ता.१०) रात्री पावणे नऊच्या सुमारास त्या त्यांच्या मुलीसमवेत गितानगरमधील सागर सुपर मार्केट येथे कपडे लॉन्ड्रीला देण्यासाठी पायी जात होत्या. त्यावेळी समोरून काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकी जोरात आली आणि त्यावरील दोघांपैकी एका संशयिताने त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने ओढून वेगात पोबारा केला. गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक माळी करीत असून दोन्ही गुन्हे म्हसरुळ पोलीसात दाखल करण्यात आले आहेत.