Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

सोनसाखळी चोर टोळीवर मोक्‍का; शहर पोलिसांनी आवळले फास

Share

नाशिक । प्रतिनिधी

महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून पळण्याचे प्रमाण शहरात वाढले असून याला आळा घालण्यासाठी शहर पोलिसांनी या चोरट्यांभोवती फास आवळले आहेत. सोनसाखळी चोरणार्‍या टोळीतील तिघांवर शहर पोलिसांनी मोक्‍काअंतर्गत कारवाई केली आहे.

सोमनाथ हिरामण बर्वे (३०, रा. मातोरी), नितीन निवृत्ती पारधी (२५, रा. फुलेनगर) आणि अनिल भाऊराव पवार (२३, रा. सय्यद पिंप्री) अशी मोक्‍कानुसार कारवाई केलेल्या संशयितांची नावे आहेत. या टोळीचा प्रमुख नितीन पारधी हा सोनसाखळी ओरबाडण्यासाठी स्पोर्टस् बाईकचा वापर करीत होता.

संघटितपणे गुन्हे करून हे महिलांकडील सोने चोरत होते. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांनी तिघांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार मोक्‍का प्रस्तावित केला. त्यास मंजुरी मिळाली आहे.

औरंगाबादरोडवरील लक्ष्मी नारायण लॉन्ससमोर २३ एप्रिल रोजी दुचाकीस्वार दोघा संशयितांनी स्वाती विजय परमेश्‍वर (रा. पुणे) यांच्या गळ्यातील साडेचार तोळे वजनाचे ७२ हजार रुपयांचे दागिने ओरबाडून नेले होते. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने तपास करून पेठ फाटा परिसरातून सोमनाथ बर्वे आणि नितीन पारधी यांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून त्यांनी शहरासह ग्रामीण भागात त्यांचा जोडीदार अनिल भाऊराव पवार याच्यासह मिळून ९ जबरी चोरी केल्याची कबुली दिली.

तसेच त्यांच्याविरोधात यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी तपास करून संशयितांकडून ७ लाख ४७ हजार ५०० रुपयांच्या सोन्याच्या ७ लगड जप्त केल्या आहेत.

सोनसाखळी चोरणार्‍या टोळीवर पहिल्यांदाच मोक्‍कान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु यामुळे इतर टोळ्यांनाही झटका बसला असून यातून सोनसाखळीचोरीचे गुन्हे आटोक्यात येतील, असा विश्‍वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!