Saturday, April 27, 2024
Homeनाशिकदिव्यांगांना जवळच्या रुग्णालयात प्रमाणपत्र; विविध ४ शासकीय रुग्णालयांत व्यवस्था

दिव्यांगांना जवळच्या रुग्णालयात प्रमाणपत्र; विविध ४ शासकीय रुग्णालयांत व्यवस्था

नाशिक । प्रतिनिधी

दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र सहज उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने त्यांना तालुक्यांच्या ठिकाणच्या तसेच शहरातील प्रत्येकी दोन अशा चार रुग्णालयात प्रमाणपत्र वितरणाची व्यवस्था करून दिली आहे. यामुळे दिव्यांगांचे हाल कमी होण्यास मदत होणार आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणच्या दिव्यांग व्यक्तीस प्रमाणपत्र घेण्यासाठी नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हजर राहावे लागत आहे. आठवड्यातील बुधवार व शुक्रवार या ठरलेल्या दोन वारी मोठ्या प्रमाणात प्रमाणपत्रासाठी दिव्यांग बांधव जिल्हा रुग्णालयात येत असल्याने होणार्‍या गर्दीने त्यांचे हाल होते होते. अनेकांना प्रमाणपत्रासाठी दिवसभर ताटकळत बसावे लागत असते किंवा अनेकदा रुग्णालयात यावे लागते. त्यामुळे प्रमाणपत्र वाटपातील त्रुटींवर अनेकांनी नाराजी दर्शवली होती.

शहरातील मनपा हद्दीतील दिव्यांग व्यक्तींसाठी जेडीसी बिटको व डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात प्रमाणपत्र वितरित करण्याची सुविधा उपलब्ध असतानाही शहरातील दिव्यांग व्यक्ती जिल्हा रुग्णालयात जातात. तसेच संपूर्ण जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती जिल्हा रुग्णालयातच येत असल्याने जिल्हा रुग्णालयावर प्रमाणपत्र वितरणाचा ताण येत आहे. त्यामुळे दिव्यांग व्यक्ती व त्यांचे नातलग दिवसभर रुग्णालयात ताटकळत बसतात. यातून अनेकदा रुग्णालय प्रशासन व रुग्णांमध्ये वादविवादाचे प्रसंग झाले. ही बाब ओळखून जिल्हा रुग्णालय प्रशासनाने प्रमाणपत्र वितरणात सुलभता यावी, यासाठी तालुकानिहाय रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आता दिव्यांग व्यक्तींना त्यांच्याजवळील रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्राचे वितरण केले जाणार आहे.

दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबन कार्ड ऑनलाईन नोंद प्रमाणपत्र मिळाले आहे, त्यांना दिव्यांग ओळखपत्र (युडीआयडी कार्ड) निवासी पत्त्यावर पाठवले जाते. युडीआयडी कार्डसाठी नोंदणी केल्यास कायमस्वरुपी व त्रिस्तरीय दिव्यांग प्रमाणपत्र घेत आहे, त्यांनी www.swavalamancard.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी. त्यानंतर प्रमाणपत्राची पडताळणी केल्यानंतर संबंधीत दिव्यांग व्यक्तीस त्याच्या निवासी पत्त्यावर युडीआयडी कार्ड पाठवण्यात येईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी स्पष्ट केले आहे.

या ठिकाणी मिळणार प्रमाणपत्र
शहर  :- जेडीसी बिटको व डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय : या रुग्णालयांमध्ये प्रत्येक गुरुवारी नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांगाना प्रमाणपत्र वितरित केले जातील.

ग्रामीण  :- जिल्हा रुग्णालय : त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, निफाड, येवला, सिन्नर येथील दिव्यांगांना प्रत्येक बुधवारी व शुक्रवारी दिव्यांग प्रमाणपत्र मिळतील.

मालेगाव सामान्य रुग्णालय :- मालेगाव शहर व ग्रामीण तसेच कळवण, सटाणा, देवळा, चांदवड, नांदगाव येथील दिव्यांगांना प्रत्येक बुधवारी प्रमाणपत्र मिळतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या