संत निवृत्तिनाथ यात्रा : गर्दीनियंत्रण, सुरक्षेसाठी सीसीटीव्हीची नजर

नाशिक । प्रतिनिधी

संत निवृत्तिनाथ यात्रेसाठी त्र्यंबक नगरी वारकरी व भाविकांनी फुलली आहे.या ठिकाणी यात्रेवेळी गर्दी व्यवस्थापन व सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासनाकडून २० सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत.तसेच, जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर शुक्रवारी (दि.१७) यात्रा मार्गावरील अतिक्रमणे हटवण्यात आली.

संत निवृत्तिनाथ यात्रेसाठी साधारणत: एक ते दीड लाख भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्र्यंबक शहरात गर्दी होणार आहे. त्यामुळे अपघात होण्याची तसेच साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने आता महसूल, पोलीस आणि नगरपालिका, आरोग्य विभागांच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले आहे.

प्रथमच सिंहस्थाच्या धर्तीवर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहे. त्याद्वारे संपूर्ण शहराला लाऊड स्पीकरद्वारे सूचना देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शिवाय  पालिकेचे १० आणि पोलीस-प्रांताधिकार्‍यांकडून १०असे २० सीसीटीव्ही लावले जाणार असल्याने त्यांचे संपूर्ण कनेक्शन हे याच नियंत्रण कक्षात असेल .

श्री निवृत्तिनाथ मंदिर, महादेव मंदिर, कुशावर्त, राहाट पाळणे, शहरातील गर्दीच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. चार अ‍ॅम्ब्युलन्स ठेवण्यात येणार आहेत. त्यातील दोन अत्याधुनिक सुविधांसह सज्ज, २ सेमी कार्डियाक, १०८ च्या काही रुग्णवाहिकांची उपलब्धी तेथे असेल. मंदिर परिसर तसेच जेथे अपघात घडण्याची शक्यता आहे; अशा ठिकाणी या रुग्णवाहिका असतील. अग्निशमन यंत्रणाही तेथे असेल. निर्मल वारी अंतर्गत या ठिकाणी १२०० खासगी शौचालये उभारण्यात येणार आहे. शिवाय नगरपालिकेचे स्वच्छतागृह, आखाड्यांनाही स्वच्छतागृह उघडे ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *