बारावी उत्तरपत्रिका तपासणीवर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा बहिष्कार

jalgaon-digital
2 Min Read

वेतन मागणीसाठी आंदोलन शिक्षकांचे, फटका विद्यार्थ्यांना, निकाल लांबणार

नाशिक । प्रतिनिधी

शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर पुन्हा बहिष्कारास्त्र उगारण्यात आले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक/कमवी शाळा कृती संघटनेन घेतला आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बोलावलेल्या नियामकांच्या सभेवर उत्तरपत्रिकांची तपासणी करणारे परीक्षकही विभागीय मंडळाशी असहकार आंदोलन करणार असल्याचे राज्याध्यक्ष प्रा.दीपक कुलकर्णी,राज्य कार्याध्यक्ष प्रा.संतोष वाघ,राज्य सचिव प्रा.अनिल परदेशी औरंगाबाद विभाग अध्यक्ष प्रा.संघपाल सोनोने यांनी स्पष्ट केले आहे.

अनुदानास पात्र ठरलेल्या १४६ व १६५६ विना अनुदानित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाना आर्थिक तरतूद झाली पाहिजे, प्राथमिक माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळांना प्रचलित धोरणानुसार पूर्वीचा अनुदान टप्पा सुरु केला पाहिजे. अघोषित उच्च माध्यमिक शाळांना तत्काळ घोषित करून त्यांनाही अनुदान मंजूर करावे,आदी प्रमुख मागण्यांसाठी संघटना सातत्याने लढा देत आहेत.

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी संघटनेच्या मागणीनुसार शंभर टक्के निकालाची व इतर जाचक अटी रद्द केल्या तसेच येणार्‍या अर्थ संकल्पीय अधिवेशनात २० टक्के आर्थिक तरतूद केली जाईल,असे ठोस आश्वासन दिल्यानंतर संघटनेने १२ वी प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेवरील पुकारलेला बहिष्कार मागे घेऊन लेखी परीक्षेवरील बहिष्कार आर्थिक तरतूद होत नाही तोपर्यंत कायम ठेवला होता.

परंतु,मंत्रालयीन पाठपुराव्याअंती २० टक्के आर्थिक तरतुदींबाबतीत ठोस कार्यवाही होत असताना दिसत नाही. त्यामुळे तत्काळ२० टक्के निधीची अनुदान तरतूद करून न्याय द्यावा,या मुख्य मागणीसाठी शिक्षकांनी ऐन परीक्षेच्या कालावधीत असहकार आंदोलन पुकारल्यामुळे बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी आणि गुणपत्रिका मूल्यमापन कामावर थेट परिणाम होणार आहे.

शासनाने आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यास आमचे आंदोलन मागे घेतले जाणार नाही,असा इशाराही संघटनेचे नाशिक विभागाचे कार्याध्यक्ष कर्तारसिंग ठाकूर,निलेश गांगुर्डे(जिल्हा प्रमुख नाशिक),वर्षा कुलथे(विभाग महिला प्रमुख नाशिक),विशाल आव्हाड(नाशिक तालुका प्रमुख),प्रमोद रुपवते,सीमा इनामदार,अमित साळवे, मुसर्रत पटेल,सैय्यद बुशरा आदींनी दिला आहे.

१४ लाख विद्यार्थी ९१लाख उत्तरपत्रिका

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास या असहकार आंदोलनाचा परिणाम राज्यातील १४ लाख विद्यार्थ्यांच्या ९१ लाखांपेक्षा अधिक उत्तरपत्रिका तपासणीच्या कामावर परिणाम होणार असल्याचेही शिक्षक संघटनेने म्हटले आहे. राज्यात सुमारे २४ लाख उत्तर पत्रिकांची तपासणी विनाअनुदान महाविद्यालयातील शिक्षकांकडून केली जाते. या पेपर तपासणीस अद्याप सुरुवात झाली नसल्याने अन्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे.
कर्तारसिंग ठाकूर, कार्याध्यक्ष नाशिक विभाग

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *