Type to search

Breaking News Featured maharashtra नाशिक मुख्य बातम्या

‘सामाजिक भान’ उपक्रम लोक चळवळ व्हावी – ना. भुजबळ

Share
‘सामाजिक भान’ उपक्रम लोक चळवळ व्हावी - ना. भुजबळ; Bhujbal lauds civic sense campaign by deshdoot

नाशिक । प्रतिनिधी

विकासासोबतच आरोग्य, प्रकृती व हवेच्या सक्षमतेसाठी प्रयत्नशील राहण्यासाठी ‘देशदूत’ने हाती घेतलेला ‘सामाजिक भान’ उपक्रम जनसामान्यांची चळवळ होणे गरजेचे आहे. तसे झाले तरच सरकारचे विविध उपक्रम यशस्वी होऊ शकतील. या प्रयत्नांच्या अभावी चायनासारखा बलाढ्य देश सामाजिक भान नसल्याने आज मोठ्या समस्येच्या गर्तेत अडकला आहे. आपणही यातून धडा घेणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. पालकमंत्री ना. भुजबळ यांनी         काल  दै. देशदूत कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी आयोजित ‘सामाजिक भान’ या विषयावरील विशेष संवाद कट्ट्यात  ते बोलत होते.

यावेळी देशदूत वृत्तसमुहाचे चेअरमन विक्रम सारडा,कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी ना. भुजबळ यांनी विविध विषयांचा आढावा घेतांना आपल्या पहिल्या कार्यकाळात नियोजित केलेल्या परंतू रखडलेल्या उपक्रमांना पुन्हा कार्यरत करण्याचा मनोदय व्यक्त केला. शहरात धूर ओकणारे उद्योग आणण्यापेक्षा सामाजिक बांधिलकी व आर्थिक प्रगती जपणार्‍या पर्यटनाला प्रोत्साहन देण्यावर भर देण्याची इच्छा व्यक्त केली.

नाशिकचे बलस्थान हे शुध्द हवा, पाणी हे आहे. त्यामुळे शहरातील पर्यटनाला चालना देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरणाचे जतन करुन इगतपुरी भागात ‘हिल स्टेशन ’ उभारणीला गती देण्यात आलेली आहे. आपले पहिले काम हे शुध्द पाणी देणे, शहर स्वच्छ ठेवणे व आरोग्यदायी वातावरण देणे हे आहे. त्यानंतर रस्ते, शाळा इमारती यांच्या बांधणीचा क्रम लागतो. हे सर्व करायला जन सहभागाची गरज आहे. नदीच्या तीरावरुन गटारीतील मलमूत्र वाहताना दिसते. पाणी प्रक्रिया प्रकल्पातूनही फेसाळलेले पाणी बाहेर फेकले जाते. या सर्व समस्या स्मार्ट सिटीअंतर्गत प्रगत तंत्रज्ञानाद्वारे सोडवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. भाविकांना गोदावरीतून खराब पाणी देणे हे मोठे पाप असल्याचे सांगून, आपल्या पालकमंत्री पदांच्या कार्यकाळात यावर प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे ना. भुजबळ यांनी सांगितले.

शहरात उद्योगांचे जाळे तयार करणे शक्य आहे. शेती उत्पादनांवर प्रक्रिया उद्योगांना मोठी संधी आहे. वाईन पार्कमध्ये पडलेल्या जागा फूड पार्कसाठी खुल्या केल्या आहेत.बाळासाहेब ठाकरेंना पर्यावरणाचे प्रेम होते. त्यांप्रमाणेच त्यांचा नातू या खात्याचा मंत्री असल्याने त्यांनाही यात गोडी राहीलच,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या सोबतच शहर परिसरात पर्यटनाला मोठे प्रोत्साहन दिले पाहिजे. शहरात धार्मिक पर्यटन, मेडीकल ट्यूरीझम, एज्युकेशन हब, शेती उद्योग, वायनरी प्रकल्प यांच्या माध्यमातून रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिकच्या बोटक्लबचे डिझाईन जगात पहिले आले होते. प्रदूषण मुक्त  असा प्रकल्प पर्यटनाला प्रोत्साहनच देणार होता. धरणाशी करार केलेला होता. मोठा खर्च केला, मेहनत घेतली होती. मात्र त्याच बोटी दुसरीकडे व्यवस्थित चालू आहेत. पर्यटनातून खूप पैसा शहराला मिळू शकेल. सोबतच रोजगाराच्या संधी ही निमाण होतील. शहरात विचारवंत अभ्यासू लोक आहेत. त्यांच्या माध्यमातून शहराच्या विकासात काय फायद्याचे याचे शांतपणे नियोजन करणे गरजेचे आहे.

शहर बससेवेबद्दल बोलताना त्यांनी सार्वजनिक पर्यटनसेवा जगभरात तोट्यातच असल्याचे सांगून,शहराला काय पाहिजे कसे पाहिजे याचा निर्णय आपणच केला पाहिजे असे त्यांनी सांगितले. मुख्यत: शहर हे स्वच्छ-सुंदर असावे. सोबतच नागरिकांवर कराचा बोजाही पडू नये याचा विचार करुन नियोजन करणे गरजेचे असल्याचे पालकमत्री ना. भुजबळ यांनी सांगितले.

शुध्द हवा व मुबलक पाणी तसेच निसर्गरम्य वातावरण ही शहराची बलस्थाने आहेत. त्यासांठी आपणही सामाजिक भान जपत स्वच्छतेबद्दल जागरुक राहीले पाहीजे. देशदूतने सिव्हीक सेन्स या उपक्रमाच्या माध्यमातून जनसामान्यांना प्रबोधनाचे चांगले काम हाती घेतले आहे. यात लोकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शहर विकासाच्या कार्यात सहभागी व्हावे.
ना. छगन  भुजबळ (पालकमंत्री)

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!