Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

करोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी दिंडोरी तालुक्यात जनजागृती

Share

 

जानोरी । वार्ताहर

करोना व्हायरसने सध्या जगभरात थैमान माजवले असून सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. या करोनाचा नायनाट व्हावा व त्याची व्याप्ती पसरू नये, यासाठी सर्व स्तरातून खबरदारी घेतली जात आहे.याच अनुषंगाने दिंडोरी तालुका ही करोनाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. आवश्यक ते उपाय योजना करण्यास सुरुवात झाली आहे. करोनाची व्याप्ती पसरू नये व त्याचा समूळ नायनाट व्हावा अशी अपेक्षा सर्वच स्तरातून व्यक्त केली जात आहे.

सध्या जगभरात कोरोना वायरस या आजाराविषयी सर्वसामान्यांच्या मनात भीती तयार झाली आहे. परंतु ह्या जीवघेणा आजारामुळे होणार्‍या दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. करोनाविषयी आवश्यक माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचल्यामुळे यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे याची संपूर्ण माहिती नागरिकांना दिली गेल्याने विशेष खबरदारी नागरिक घेत आहेत.

नाशिक विमानतळ हे जानोरी येथे आहे. या विमानतळावर येणार्‍या प्रवाशांचीही योग्य ती तपासणी केली जात असून करोना व्हायरसचा प्रसार होऊ नये यासाठी आरोग्य विभागाकडून आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. करोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठे नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. करोनाविषयी जनजागृती करण्याची जबाबदारी आरोग्य विभाग, शिक्षक यांना दिले असल्यामुळे तेही जोमाने जनजागृतीचे काम करताना दिसत आहे. नगरपंचायत व  ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिंडोरी शहरात अथवा इतर गावात लोकांचा समुदाय एकत्र येऊ नये यासाठी बाजारपेठा देखील बंद केले जात आहेत.

दिंडोरी नगरपंचायतीने आठवडे  बाजारही बंद करण्याचा निर्णय घेतला असून याबाबत सर्व सूचनाही दिल्या जात आहेत. लोकांना मास्क लावणे, गरज नसतांना बाहेर न पडणे,आजाराची काही लक्षणे दिसत असतील तर तात्काळ दवाखान्यात जाऊन त्याबाबत आवश्यक तो इलाज करून घेणे याविषयी जनजागृती केली जात आहे. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होणार नाही याविषयी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. कोरोनाला घाबरून जाण्यापेक्षा त्याचा प्रतिकार करणे हाच उपाय असून कोरोनाचा शिरकाव दिंडोरी तालुक्यात होऊ द्यायचा नाही असाच चंग दिंडोरीकरांनी बांधला असून त्याविषयी कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी अवघा तालुका सज्ज झाला आहे.

दिंडोरी नगरपंचायतीच्या माध्यमातून करोनाविषयी जनजागृतीवर अधिक भर देण्यात आले आहे. याच पार्श्‍वभूमीवर दिंडोरीचा आठवडे बाजार देखील बंद करण्याचा निर्णय नगरपंचायतीने घेतला आहे. त्याविषयी शहरामध्ये सूचना दिली जात आहे. दिंडोरी नगरपंचायत आवश्यक ते उपाय योजना करण्यासाठी सज्ज झाले आहे. नागरिकांनीही यास सहकार्य करणे अपेक्षित आहे. आवश्यक ती खबरदारी प्रत्येक नागरिकांनी घेतली तर या कोरोनाचा आपण समूळ नायनाट करू शकतो. कोरोनाला घाबरून न जाता त्याचा प्रतिकार करणे हाच एक उपाय असून त्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे.    सचिन देशमुख, नगरसेवक

नगरपंचायतीच्यावतीने शासन आदेशानुसार सर्व नागरिकांना मास्कचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला असून जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होणार नाही याचीही खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनीही गरज असेल तरच घराच्या बाहेर पडावे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी हे आवश्यक ती खबरदारी उपायोजना करून गर्दी होईल कार्यक्रमांना बंदी आणावी. सर्वांनी एकजुटीने एकञ येवून या कोरोनोला हद्दपार करू. शैला उफाडे, आरोग्य सभापती

आरोग्य सेवक -सेविका, आशा, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करावी यासाठी तालुक्यातील सर्वांना आदेश दिले आहेत. संशयित रुग्ण आढळल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. यवतमाळ, पुणे, अहमदनगर, ठाणे आदी जोखमीच्या जिल्ह्यातून या तालुक्यात कोणी वास्तव्याला आले असल्यास त्यांचेही पूर्ण चौकशी  करून त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे आरोग्य विभाग, ग्रामपंचायत तसेच नगरपंचायतीने संयुक्तपणे कामाला सुरुवात केली आहे. बस डेपोमध्ये ही जोखमीच्या जिल्ह्यातून येणार्‍या प्रवाशांची यादी मिळणे अपेक्षित असून त्याविषयी त्यांना पत्र व्यवहार केले आहे. आरोग्य विभाग संपूर्ण ताकदीने या करोनाचा प्रतिकार करण्यासाठी सज्ज झाला आहे.
-डॉ. सुजित कोशिरे, तालुका वैद्यकीय अधिकारी

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!