न्यायालयातील अनावश्यक गर्दी टाळा- प्रधान न्यायाधीश वाघवसे यांचे आवाहन

न्यायालयातील अनावश्यक गर्दी टाळा- प्रधान न्यायाधीश वाघवसे यांचे आवाहन

नाशिक ।प्रतिनिधी

कामकाजाच्या वेळेत बदल करूनही न्यायालयात होणार्‍या गर्दीची दखल घेत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांनी पुन्हा वेळेत बदल करून न्यायालयातील गर्दी टाळण्यासाठी वकिलांनी दुपारीच कार्यालये बंद करावीत तसेच पक्षकारांनाही गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील सर्वच न्यायालयांच्या कामकाजात बदल केले आहेत. या बदलाची अंमलबजावणी नाशिक न्यायालयात १७ मार्चपासून सुरू झाली. मात्र, न्यायालयाच्या वेळेनंतरही अनेक पक्षकार तसेच वकिलांची गर्दी कायम असते. जिल्हा न्यायालयातील सर्वच न्यायाधिशांनी अतीतातडीच्या बाबींनाच प्राधन्य देण्याचे आदेश आहेत. यात जामीन अर्ज, अटकपूर्व जामीन, मनाई हुकूम, तातडीचे अर्ज आदींचा समावेश आहे. इतर सुनावणी व कामे मात्र पुढे ढकलण्यात आली आहेत.

न्यायालयातील गर्दी टाळण्यासाठी ५० टक्के कर्मचार्‍यांचा वापर अदलाबदल करून घेण्यात आला आहे. सुरूवातीला प्रशासनासह वकिलांनीही पुढाकार घेत गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही वर्दळ काहीअंशी कायम असल्याचे चित्रे आहे. या पार्श्वभूमीवर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांनी ही बाब गांभीर्याने घेतली आहे. न्यायालयाच्या न्यायालयीन कामकाजाची वेळ सकाळी ११ ते २ तर कार्यालयीन कामकाजाची वेळ सकाळी साडेदहा ते दुपारी अडीच अशी ठेवण्यात आली आहे.

कामकाजाची वेळ संपल्यानंतरही अनेक वकील व पक्षकार आवारात थांबून असतात. अनेक पक्षकार चेंबर्समध्येही पोहचतात. वकीलांनी पुढाकार घेऊन आपले चेंबर्स दुपारी अडीच वाजता बंद करावेत आणि पक्षकारांना त्यासाठी प्रवृत्त करावे, अशी सूचना न्यायाधीश वाघवसे यांनी केली आहे. दुपारी अडीचवाजेनंतर न्यायालय परिसर रिकामा व्हायलाच हवा, अशी सुचनाच न्या. वाघवसे यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com