Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकपंतगोत्सवात नायलॉन ऐवजी वापरा पारंपरिक मांजा

पंतगोत्सवात नायलॉन ऐवजी वापरा पारंपरिक मांजा

नाशिक । प्रतिनिधी

मकर संक्रांतीसाठी बाजारपेठ सजली असून नानाविविध पंतगी बाजारपेठत दाखल झाल्या आहेत. समाजातून सर्व स्तरातून होणार्‍या जनजागृतीमुळे यंदा पंतगप्रेमी पारंपरिक मांज्याला प्राधान्य देत आहे. मात्र, तरी देखील काही ठिकाणी चोरटया पध्दतीने नायलॉन मांजा विक्री सुुरु आहे. या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजा विक्रेते व खरेदी करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, असा सूर उमटत आहे. पक्ष्यांसाठी घातक असलेला नायलॉन मांजा वापरणे टाळावे, असे आवाहन केले जात आहे.

- Advertisement -

संक्रातीचा सण बुधवारी (दि.१५) साजरा होणार आहे. संक्रांत आणि पंतगोत्सव हे समीकरण असून तरुणाई त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र, दरवर्षी जिल्हा प्रशासनाकडून नायलॉन मांजा विक्री व वापरावर बंदी घातली जाते. यंदा देखील प्रशासनाने त्याबाबत परिपत्रक काढून नायलॉन मांजावर बंदी घातली आहे. तसेच, समाजसेवी संस्था व प्राणी प्रेमींकडून नायलॉनचा वापर टाळावा अशी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरु आहे. त्यास काही प्रमाणात यश देखील मिळत आहे. असे असले तरी संक्रातीचा तोंडावर शहरातील भद्रकाली, रविवार कारंजा व उपनगरीय बाजारपेठेत छुप्प्या पध्दतीने नायलॉन मांजा विक्री केली जात आहे. . नायलॉन मांजामुळे दरवर्षी अनेक पक्षी जखमी होतात. तर, वेळेवर उपचाराअभावी अनेकांना प्राण गमवावा लागल्याच्या घटना दरवर्षी घडतात. नायलॉनमुळे वाहनचालकांचा गळा चिरणे अशा दुर्घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व पोलिसं यत्रणेने नायलॉन मांजा विक्रेत्यांवर नुसते गुन्हे दाखल न करता कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच, पारंपारिक मांजाचा वापर करुन संक्रातीचा सण साजरा करा, असे आवाहन केले जात आहे.

नायलॉन मांजा हा पर्यावरणाला अतिशय घातक आहे. नायलॉनमुळे अनेक पक्षांना जीव गमवावा लागतो. मनुष्यासाठी देखील हा मांजा घातक आहे. त्यामुळे पंतग उडविण्यासाठी नायलॉन ऐवजी पारपंरिक मांजाचा वापर करावा.
– बंबूल खैरे, अध्यक्ष , मध्य नाशिक ब्लॉक काँग्रेस

नायलॉन मांजा विक्रेत्यांवर दिखाव्या पुरती कारवाई नको. शहरात अनेक ठिकाणी छुप्या पध्दतीने नायलॉन मांजा विक्री सुरु आहे. प्रशासनाने विक्रेते व वापरणारे दोघांवर कारवाई करावी.
-अजिंक्य गिते, अध्यक्ष,युवांकुर प्रतिष्ठान

यंत्रणेच्या संगनमतामुळे दरवर्षी नायलॉन मांजा बंदी हा नावापुरती ठरते. नायलॉन मांजा विक्रेत्यांवर अजामिनपात्र गुन्हे दाखल करावे. तरुणाईने देखील नायलॉनचा मोह टाळून पारंपरिक मांजाला प्राधान्य दयावे.
– वसंत ठाकूर, शहराध्यक्ष, काँग्रेस सेवादल

नायलॉन मांजा कोठे विकत मिळतो ते लहान मुलांना माहिती आहे. मात्र, पोलिसांना त्याची माहिती मिळत नाही. निदान संक्रातीच्या तोंडावर तरी पोलिसांनी नायलॉन विक्रेत्यांवर कारवाई करावी. जेणेकरुन पक्षांवर संक्रांत येणार नाही.
– गौरव क्षत्रिय, संस्थापक प्राणिमित्र संघटना

- Advertisment -

ताज्या बातम्या