Friday, April 26, 2024
Homeनाशिकअंगणवाडी सेविका व मदतनीसांची जिल्ह्यात १०३४ पदे रिक्त; लवकरच निम्म्या जागांची होणार...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांची जिल्ह्यात १०३४ पदे रिक्त; लवकरच निम्म्या जागांची होणार भरती

नाशिक । अजित देसाई

एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत राज्यभर रिक्त असणार्‍या अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका तसेच मदतनिसांच्या रिक्त असणार्‍या जागा भरण्याचे आदेश राज्याच्या महिला व बालविकास मंत्र्यांनी आदेश दिले आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील रिक्त असणार्‍या १०३४ पैकी निम्म्या पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

- Advertisement -

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ९६६ तर महापालिका व नगरपालिका क्षेत्रातील ६८ पदे आजघडीला रिक्त असून शासनाच्या आदेशाने तीन वर्षांपासून रिक्त असणार्‍या या पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या राज्यभर रिक्त असणार्‍या जवळपास साडेसहा हजार पदांमुळे महिला व बालविकास विभागाला अडचणींना सामोरे जावे लागत होते.

विशेषतः ग्रामीण भागात रिक्त पदांची संख्या अधिक असल्याने कुपोषण या विषयावर काम करताना तोकड्या मनुष्यबळामुळे हा विभाग टीकेचे कारण ठरला होता. मात्र, राज्याच्या नवनिर्वाचित महिला आणि बालकल्याण मंत्री यशोदा ठाकूर यांनी रिक्त पदांच्या भरतीवरील निर्बंध काही अंशी उठवत त्यात्या विभागात निम्मी रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे.

याशिवाय यापूर्वी मान्यता दिलेल्या परंतु अद्याप कार्यान्वित न झालेल्या ९८ अंगणवाडी तसेच ७४५ मिनी अंगणवाड्या देखील आवश्यकतेप्रमाणे सुरु करण्यात येणार आहेत. सोबतच या अंगणवाड्यासाठी नवीन पदांची निर्मिती करून हि पदे देखील भरण्यात येणार आहेत.नाशिक जिल्ह्याचा विचार करता शहरी व ग्रामीण असे प्रकल्प सुरु आहेत. त्यात नाशिक शहरी विभागात दोन तर मालेगावात एक प्रकल्प असून महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रांचा या प्रकल्पात समावेश आहे. उर्वरित जिल्ह्यासाठी जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे.

नाशिक प्रकल्प -१ मध्ये नाशिक महापालिका क्षेत्रासह इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर या नगरपालिका तर नाशिक -२ मध्ये महापालिका क्षेत्रासह भगूर, येवला व मनमाड या पालिकांचा समावेश करण्यात आला आहे. तर उर्वरित ग्रामीण जिल्ह्याचे व्यवस्थापन जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाकडे आहे.

जिल्यातील अंगणवाडी सेविकांच्या मंजूर व रिक्त पदांचा विचार करता नाशिक प्रकल्प १ मध्ये २० तर प्रकल्प -२ मध्ये ३ पद रिक्त असून मालेगाव विभागात ४५ पदे रिक्त आहेत. ग्रामीण जिल्हयात रिक्त पदांचा आकडा ९६६ इतका असून त्यात अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा समावेश आहे. यातील निम्मी पदे महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली भरण्यात येणार असून नाशिकचा विचार केल्यास ५१७ पदांची भरती आगामी काळात केली जाणार आहे.

१२ प्रकल्प अधिकार्‍यांची गरज
जिल्हा परिषद अखत्यारीतील २६ पैकी १२ बाल विकास प्रकल्प अधिकार्‍यांची पदे रिक्त असून अनेक ठिकाणी पर्यवेक्षिकांवर या पदाची तात्पुरती जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या सोबतच पर्यवेक्षिकांची १९१ पैकी ३६ पदे जिल्ह्यात रिक्त आहेत. तर १३ पैकी ३ विस्तार अधिकारी पदे रिकामी आहेत. प्रकल्पस्तर कर्मचारी ८ तर वाहनचालकपदाची ३ पदे जिल्ह्यात रिक्त असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास अधिकारी चाटे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या