Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मला मान-सन्मान; पदे देणा-या पक्ष आणि कुटूंब प्रमुखा विरोधात जाणार नाही : अजित पवार

Share

मुंबई  | प्रतिनिधी 

ज्या पक्षाने मला मान-सन्मान पदे दिली त्या पक्षाविरोधात आणि कुटूंब प्रमुखा विरोधात काही करण्याचा विचारही करू शकत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण दिले. तसेच राष्ट्रवादीला सोडण्याच्या किंवा अन्य शक्यता त्यांनी फेटाळून लावल्या. शरद पवार यांचे नाव शिखर बँक घोटाळा प्रकरणात आल्याने अस्वस्थ होऊन मी राजीनामा दिला असे पत्रकार परिषदेत सांगताना त्यांचा गळा दाटून आला आणि अश्रू अनावर झालेले अजित पवारही पाहायला मिळाले.

काल अजित पवारानी राजीनामा दिल्यानंतर राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले होते. शरद पवार यांनीही काल संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार हे सध्याच्या राजकारणाला वैतागले असल्याचे सूचित केले होते. अजित पवार यांनी आपले चिरंजीव पार्थ यांच्याकडे राजकारण सोडून शेती, उद्योग करण्याबाबत चर्चा केल्याचे शरद पवार यांनी सांगितले होते त्यावरही अजीत पवार यांनी आज खुलासा केला.

या पत्रकारपरिषदेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पवार व छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील हे नेते उपस्थित होते. अजित पवार यावेळी म्हणाले की, माझ्या अचानक राजीनाम्याने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना वेदना झाल्या. मी कुणालाही कल्पना दिली असती तर त्यांनी राजीनामा द्यायला नाहीच म्हटले असते. मात्र, त्यांच्या मनाला दुखावल्याने मी पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना कल्पना दिली होती. काही दिवसांपूर्वीपासून हे विचार माझ्या मनात येत होते, मात्र निवडणुकीच्या काळात पक्षाला अडचणीत टाकावे का, असेही वाटत होते असे ते म्हणाले. आम्ही सारे सहकारी बँकांवर काम करत होतो. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि अन्य पक्षातले लोकही सहकारी क्षेत्रात काम करत होते. या प्रकरणावर चौकशी होत असताना सहकार मंत्र्यांनी १हजार कोटी रूपयांची इतर अनियमितता झाल्याचे म्हटले. एकूण २५ हजार कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला. मात्र, १० हजार कोटीच्या ठेवी असलेल्या बँकेत २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार कसा होईल? असा प्रश्नही अजित पवारांनी उपस्थित केला.

बँक अस्तित्वात आल्यापासून धनंजयराव गाडगीळ, वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख असे नेते तसेच गोयल, श्रीवास्तव असे अधिकारी यांनीही यावर काम केले आहे. ही शिखर बँक आहे. चांदा ते बांदा लोक येथे प्रतिनिधीत्व करतात. दुष्काळ पडला, काही अडचणी आल्या तर, ‘आऊट ऑफ वे’ जाऊन मदत करावी लागते. धनंजय महाडिक, विनय कोरे, कल्याणराव काळे यांच्या कारखान्यांना ‘आऊट ऑफ वे’ जाऊनच सरकारने मदत केली. हा सरकारचा अधिकार आहे. कारखाने अडचणीत आल्यास नाबार्ड, सरकार कर्ज देते, शून्य टक्याने कर्ज देते. कर्ज फिटले आहे. राज्य सरकारची थकहमी आहे. यंदा ही बँक २८५ कोटी नफ्यामध्ये आहे. असा खुलासा त्यानी केला.

पवार म्हणाले की, १०० कोटींपेक्षा जास्त रकमेचे असल्याने हे प्रकरण ईडीकडे गेले असे सांगण्यात येते तर त्यानी चौकशी पूर्ण करून निकाल द्यावा पंरतू गेल्या सात वर्षापासून चौकशीचा घोळ घालून बदनामी करण्याचे राजकारण का केले जात आहे. शरद पवारांचा कोणताही संबंध नाही, ते संचालक नाहीत, काही ठिकाणी सभासद आहेत, असे असताना पवार साहेबांचे नाव बातम्यात आले. मी मनाला विचारले की साहेबांचे नाव का? अजित पवार-शरद पवार यांच्यातल्या नात्यांमुळे त्यांचे नाव आले का? मी विचार करत होतो की आपण राजीनामा दिला पाहिजे, आपल्यामुळे साहेबांना बदनामी सहन करावी लागतेय. म्हणून मी कुणालाही न सांगता राजीनामा दिला. मी माझा फोन बंद केला. मुंबईत एका नातेवाईकांकडे थांबलो. साहेबांची या वयात बदनामी झाली यामुळे अस्वस्थ होतो. हे प्रकरण २०१९मध्येच कसे बाहेर आले? या प्रश्नाचे उत्तर शोधताना आपण उद्विग्न व अस्वस्थ होऊन राजीनामा दिला असे ते म्हणाले.

त्यांनी सांगितले की, विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी मला विचारलं की कशाला राजीनामा देता, पण आपण त्यांना त्यांना व्यक्तिगत कारणांमुळे राजीनामा दिल्याचे सांगितले असे अजीत पवार म्हणाले. ईडीच्या प्रकरणात मी पवारांबरोबर का नव्हतो. कारण, मी बारामतीमध्ये पूरस्थिती पाहत होतो. मदत कार्यात होतो. रात्री निघायचे होते, मात्र पुण्यातून निघालो तर वाटेत पवारांच्या ईडी भेटीला पाठिंबा देणाऱ्यांची खूप गर्दी होती. म्हणून येता आले नाही. मग, चित्र रंगवले गेले की अजित पवार आले नाहीत.

ज्या पक्षानं अनेक मान-सन्मान मान दिले, त्या पक्षाच्या विरोधात काहीही करणार नाही. आम्ही पवार कुटुंबिय अनेक वर्ष एकत्र काम करतोय. आजदेखील पवार साहेब सांगतील तसंच आम्ही करतो. मात्र, गृहकलह असे का पसरवले जातं? असा सवाल करत ते म्हणाले की, आधी माझ्यावेळी, मग सुप्रिया, पार्थ आणि आता रोहितच्या वेळीही असे रंगवले जाते. काल पवार म्हणाले तेच खरे आहे.

आमचे घर मोठे आहे. ज्येष्ठ व्यक्ती जे सांगतात तसे घडते. पवारसाहेबांशी बोललो. मी म्हणालो की मी पुण्याला येतो. मात्र, तेच म्हणाले की मीच मुंबईला येतो. त्यांना भेटलो, भूमिका सांगितली. त्यांनीही मला जे सांगायचे ते सांगितले. त्यांनीच मला सांगितले की पत्रकार परिषद घेऊन काय ते सांग.
अजीत पवार म्हणाले की, मागीलवेळी सिंचन घोटाळ्याबाबतही असेच आरोप झाले. ७० हजार कोटी रूपये म्हणे! पण, खात्याकडे पैसा किती आला, पगारासाठी, भूसंपादनासाठी, कामासाठी किती खर्च झाला याचा विचार का झाला नाही? त्यावेळीही नाराज होतो. त्या प्रकरणाची चौकशी किती वर्ष चाललीये? आता काय तर २५ हजार कोटींचा घोटाळा, एखाद्याला वाटेल की अजितचे हजारशिवाय चालतच नाही की काय. या ठिकाणी अजित पवारांचा संयमाचा बांध फुटला आणि त्यांना अश्रू अनावर झाले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!