Friday, April 26, 2024
Homeनाशिकमालेगावला ‘कृषी विज्ञान संकुल’ निर्मितीची घोषणा

मालेगावला ‘कृषी विज्ञान संकुल’ निर्मितीची घोषणा

मालेगाव । प्रतिनिधी

मालेगाव येथे राहुरी कृषी विद्यापीठांतर्गत ‘कृषी विज्ञान संकुल’ निर्माण करुन त्यात शासकीय कृषी महाविद्यालय, कृषी उद्यानविद्या महाविद्यालय व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत केली. या निर्णयामुळे मालेगाव तालुक्याच्या कृषी विकासात मोलाची भर पडणार असून परिसरातील विद्यार्थ्यांना कृषी शिक्षण घेण्याची संधी तालुक्यातच उपलब्ध होणार आहे. त्यासाठी कृषिमंत्री या नात्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याची प्रतिक्रिया राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

कृषिमंत्री पदाचा पदभार स्विकारल्यापासून राज्याच्या कृषी विभागाला चालना देण्याचे काम ना. भुसे यांच्या माध्यमातून केले जात आहे. पदभार स्विकारल्यानंतर पहिल्याच बैठकीत त्यांनी मालेगाव येथे कृषी संकुल उभारण्याबाबत निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला मंजुरी देत राज्याच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये समावेश करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. मालेगाव तालुक्याच्या विकासात भर घालणार्‍या या निर्णयाबद्दल कृषिमंत्री भुसे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे तालुक्यातील जनतेच्या वतीने आभार मानले आहेत.

ना. भुसे यांच्याकडे माजी सैनिक कल्याण विभागाचा देखील पदभार असून या विभागाच्या पहिल्याच आढावा बैठकीत त्यांनी माजी सैनिक व सैनिकांच्या विधवांना मालमत्ता करातून सूट देण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यानुसार बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व सैनिकांच्या विधवा पत्नींना मालमत्ता करात सूट योजना लागू करण्याचा निर्णयही वित्तमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत जाहीर केला.

या निर्णयानुसार शहरी व ग्रामीण भागातील सुमारे २ लाख ५० हजार माजी सैनिक व सैनिकांच्या विधवा पत्नींना मालमत्ता करात सूट मिळणार आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास व ग्रामविकासमंत्र्यांचेही ना. भुसे यांनी आभार मानले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या