Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशकातही ‘कडकनाथ’चा घोटाळा; फसवणुकीचा गुन्हा दाखल

Share

नाशिक । प्रतिनिधी

राज्यभरात गाजत असलेल्या कडकनाथ कोंबडी घोटाळ्याचे लोन नाशिकमध्येही पोहचले असून या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी आणखी ३०  ते ३५  तक्रारदार शेतकरी समोर आले असून, एकुण कोट्यवधी रूपयांचा घोटाळा समोर येण्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली आहे. सांगली, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये संबंधीत कंपनीविरोधात यापूर्वीच कोट्यवधीच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.

या प्रकरणी नाशिक तालुक्यातील सैय्यद प्रिंपी येथील शिदास भिकाजी साळुंखे यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार संशयित कंपनीचे संचालक सुधीर शंकर मोहिते, हनुमंत शंकर जगदाळे, विजय शेंडे, संदिप सुभाष मोहिते (सर्व रा. इस्मालपूर, जि. सांगली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यातआला आहे. त्यांनी मिळून महारयत अ‍ॅग्रो इंडिया प्रा. लि. कंपनी स्थापन केली होती. तसेच या कंपनीचे कार्यालय नाशिक शहरात कॅनडा कॉर्नर येथील विराज टॉवर्स येथे सुरू करण्यात आले होते.

शिवदास साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहरात झालेल्या एका कृषी प्रदर्शनात महारयत अ‍ॅग्रो कंपनीबद्दल माहिती मिळाली. कडकनाथ कोंबड्यांचे पालन करून त्यांची विक्री केल्यास तिप्पट फायदा मिळत असल्याचे आमीष कंपनीच्या लोकांनी शेतकऱ्यांना  दाखवले. वरील संशयितांनी कडकनाथ कोंबड्याचे पालन पोषण करण्याची जबाबदारी शेतकर्‍याकडे दिलेली होती. फिर्यादी साळुंखे यांनी यासाठी कंपनीला १० लाख रूपये दिले होते.

या पैशांच्या आधारे कंपनीने साळुंखे यांना काही दिवस वयाची तब्बल पाच हजार कडकनाथ कोंबडीचे पिल्ले दिली. साळुंखे यांनी तीन महिने कोंबड्याचे पालन पोषण केले. नियमानुसार पूर्ण वाढ झालेली कोंबडी पुन्हा कंपनीच घेणार होती. या बदल्यात कंपनी पैसेही अदा करणार होती. साळुंखे यांच्याकडील पाच हजार पिल्लांपैकी तीन हजार ७००  पिल्लांची वाढ झाली. ठरल्यानुसार कंपनीने सर्व कोंबड्या घेतल्या. मात्र, त्याबदल्यात तीन लाख ७० हजार रूपये दिलेच नाही. अनेक दिवस पाठपुरवा करूनही पैसे मिळत नसल्याने साळुंखे यांनी सरकारवाडा पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. साळुंखे यांच्याकडून सुरूवातीस घेतलेले दहा लाख आणि नंतर कोंबड्याचे पैसे असे मिळून संशयितांनी तब्बल १३ लाख ९०  हजार रूपयांची फसवणूक केली.

साळुंखे यांनी इतर शेतकर्‍यांशी संपर्क साधून विचारपूस केली असता त्यांचीही फसवणूक झाल्याचे उघड झाले. त्यामुळे सुमारे ३०  ते ४०  शेतकर्यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे गाठून कंपनीचे प्रतिनिधी सुधीर शंकर मोहिते, हनुमंत शंकर जगदाळे, विजय शेंडे व संदीप सुभाष मोहिते (सर्व रा. इस्लामपुर, जिल्हा सांगली) यांच्याविरोधात फसवणूकीची फिर्याद दाखल केली आहे. साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची १३  लाख ९०  हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. तर इतर शेतकर्यांनी केलेल्या तक्रारीनुसार त्या सर्वांची मिळून १ कोटी ५ लाख रुपयांहून अधिकची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे. या घटनेचा अधिक तपास पीएसआय बैरागी करीत आहेत.

जिल्ह्यात आकडा वाढणार
महारयत अ‍ॅग्रो इंडिया कंपनीच्या माध्यमातून संशयितांनी राज्यभरातील लाखो शेतकर्‍यांना कुकुट पालनाच्या नावाखाली कोट्यवधी रूपयांना गंडवले आहे. त्यांच्याविरोधात पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगलीत गुन्हे दाखल आहेत. त्यांनी शेतकरर्‍यांची सुमारे ७००  ते ८००  कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा अंदाज आहे. नाशिकमध्येही फसवणूकीचा आकडा वाढण्याची शक्यता असून या कंपनीने फसवणुक केलेल्यांनी तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन नाशिक पोलीसांनी केले आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!