Type to search

Breaking News Deshdoot Times Featured

दारणाकाठ भयभीत; पंधरा दिवसांत बिबट्याचा तिसर्‍यांदा हल्ला

Share

देवळाली कॅम्प । वार्ताहर

शनिवारी पहाटे राहुरी-विंचुरी शिवारातील पंढरीनाथ शेळके यांच्या वस्तीवरील बकरीवर नर-मादी बिबट्याच्या जोडीने हल्ला चढविला. शेळके कुटुंबियांनी प्रति हल्ला चढवत बिबट्याच्या जोडीला पळवून लावले. मात्र हल्ल्यात बकरी जखमी झाली असून पंधरा दिवसात तिसर्‍यांदा या बिबट्याने हल्ला केला आहे.

राहुरी, दोनवडे, विंचुरी दळवी या परिसरात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्यांना वास्तव्यासाठी मोठे कुरण मिळाले आहे. गेल्या पाच वर्षात या भागात बिबट्याने अनेकदा हल्ला करून अनेक जनावरांचा फडशा पाडला आहे. गेल्या पंधरा दिवसापासून बिबट्याची जोडी या भागात धुमाकूळ घालीत आहे.

शनिवारी पहाटेच्या सुमारास पंढरीनाथ शिवराम शेळके यांच्या वस्तीवरील शेड मधील बकरीवर बिबट्याच्या जोडीने हल्ला करताच पाळीव कुत्र्यांनी घरच्या दरवाजाला धडका देत मालकाला जागे केले. शेळके व त्यांच्या कुटुंबीयांनी ट्रॅक्टरच्या प्रकाशझोतात गोठ्याकडे बघितले असता बिबट्याची जोडी दिसून आली. शेजारच्यांना आवाज देत चौघा युवकांनी हाती बांबू घेत बिबट्याच्या जोडीवर हल्ला करत पिटाळून लावले.

दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात बकरीला मोठ्या जखमा झाल्या आहेत. तीन दिवसांपूर्वी सागर भवार यांच्या पोल्ट्री फार्म वरील कोंबड्यांचा फडशा पाडणार्‍या या बिबट्याच्या जोडीने पंधरा दिवसांपूर्वी सदाशिव निरभवणे यांच्या जनावरांवरही हल्ला चढवला होता. बिबट्याच्या वास्तव्यामुळे परिसर भयभीत झाला असून वनविभागाने या ठिकाणी तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.

वन विभागाने काळजी घ्यावी
गेल्या दहा वर्षात बिबट्याने राहुरी, दोनवाडे, भगूर, विंचुरी दळवी, लहवित, वंजारवाडी, लोहशिंगवे, नानेगाव, शेवगे दारणा व पळसे या दारणाकाठच्या गावांत दहशत माजवली असून अनेक जनावरे व बालके बिबट्याच्या भक्ष्यस्थानी राहिले आहे. वन्यप्राणी वाचावे यासाठी शासनाची मोहिम आहे. देवळालीच्या साऊथ एअरफोर्स जंगलात बिबटे सोडले जातात. मात्र त्यांना अन्न व पाण्याची कमतरता भासल्यानंतर ते नागरी वस्तीकडे कूच करतात. त्यामुळे गेल्या काही वर्षात अनेक अप्रिय घटना घडल्या. वन विभागाने याबाबत बोध घेऊन बिबट्यांसाठी जंगलातच त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.

मळे विभागातील नागरिकांसाठी गेल्या काही वर्षांपासून बिबट्याचा त्रास होत आहे. जनावरांसह माणसांवर हल्ले होत असल्याने वनविभागाने याकडे जाणीवपुर्वक लक्ष देऊन कायमस्वरूपी बंदोबस्त करणे गरजेचे आहे.वामन दळवी

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!