Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिकरोड कारागृहात देशातील पहिली कॉम्प्युटर लॅब ; तज्ञ प्रशिक्षकांकडून मिळणार बंदीजनांना मार्गदर्शन

Share

नाशिकरोड । प्रतिनिधी

बंदीजनांना संगणकाचे अद्ययावत ज्ञान मिळावे, सोशल मीडिया, इंटरनेट, ई कॉमर्सची माहिती मिळावी, शिक्षा भोगून झाल्यावर या ज्ञानाच्या बळावर रोजगार-व्यवसाय करता यावा, यासाठी येथील मध्यवर्ती कारागृहात अद्ययावत कॉम्प्युटर लॅब सुरू झाली आहे. समता फाऊंडेशनच्या सहकार्याने सुरू झालेली या लॅबमध्ये कोर्सेससाठी तीनशे कैद्यांनी नाव नोंदणीही केली असून कारागृहात कॉम्प्युटर लॅब सुरू करणारे नाशिक हे पहिलेच कारागृह ठरल्याची माहिती अधीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली.

नाशिकरोड कारागृहात खून, जन्मठेप, बॉम्बस्फोट आदी विविध प्रकारचे तीन हजारांवर बंदी आहेत. त्यामध्ये निम्मे पक्के (शिक्षा सुनावलेले) कैदी आहेत. त्यांच्या पुनर्वनसनासाठी प्रशासन शिक्षण, प्रशिक्षण कार्यक्रम राबवते. कारागृहातून बाहेर पडल्यावर त्यांना स्वयंरोजगार मिळावा, व्यवसाय सुरू करता यावा, ताठ मानेने जगता यावे, हा त्यामागील उद्देश आहे. बंद्यांना फक्त कॉम्प्युटर ट्रेनिंगची कमतरता होती. ती आता दूर झाली आहे. अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद, पोलीस उपमहानिरीक्षक (औरंगाबाद) दिलीप झळके यांचे मार्गदर्शन यासाठी उपयुक्त ठरले.

कारागृहाच्या ग्रंथालयात ही लॅब सुरू करून तीस कॉम्प्युटर टेबल्स, खुर्च्या तसेच प्रशिक्षकही उपलब्ध करून देण्यात आले आहे. संगणकाची दुरुस्ती, देखभालदेखील ही संस्थाच करणार आहे. तसेच नामवंत सॉफ्टवेअर कंपन्यांशी संस्थेने करार केला असून त्यांच्यामार्फत कैद्यांना कारागृहातच कामही मिळवून दिले जाणार आहे. लॅबच्या उद्घाटनासाठी समता फाऊंडेशनचे संचालक मधुसूदन अग्रवाल, पुरुषोत्तम अग्रवाल हे खास हेलिकाप्टरने आले. कार्यक्रम संयोजनासाठी प्रशिक्षक, तज्ञांसह तीस सेवक आणले होते.

सर्वच बंद्यांना टॅली, एमएस ऑफिस, मराठी-इंग्रजी डीटीपी आदींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. बंद्यांसाठी योगा, आयटीआय, दुचाकी दुरुस्ती, प्लबिंग, ब्युटीपार्लर, टेलरिंग आदी कोर्सेसही चालविले जातात. तसेच बंद्यांना जगण्याची प्रेरणा मिळावी म्हणून शिक्षेतून सशर्त सूट दिली जाते. कारागृहातील कारखान्यातून गेल्यावर्षी सहा कोटींचे तर शेतीतून ४२  लाखांचे उत्पन्न मिळाले होते.
प्रमोद वाघ, जेल अधिक्षक

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!