Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नवीन नाशिकमधील सर्वात मोठ्या पार्कची प्रतीक्षा संपली; आचारसंहितेपूर्वी सेंट्रल पार्कचे भूमिपूजन?

Share

नवीन नाशिक । प्रतिनिधी

नवीन नाशिकमधील मनपा प्रशासनाचा १७  एकरचा भूखंड गेल्या कित्येक वर्षांपासून वापराविना पडून होता. याठिकाणी ‘पेलिकन पार्क’ चा प्रकल्प फोल ठरला मात्र येत्या काही दिवसातच सिंगापूरच्या धर्तीवर ‘सेंट्रल पार्क’ हा नवीन प्रकल्प याठिकाणी तयार होणार असून त्यामुळे नवीन नाशिकच्या विकासात अजून भर घालणारा मोठा प्रकल्प येत असल्याने सदर प्रकल्पाचे कामाचे भूमिपूजन आचारसंहिता लागण्यापूर्वीच होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

नाशिक महानगरपालिकेची स्थापना १९९२  मध्ये झाल्यानंतर मनपाने सिडको प्रशासनाकडून तीन लाख रुपयांच्या मोबदल्यात 99 वर्षांच्या कराराने नवीन नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला १७  एकरचा भूखंड ताब्यात घेतला. येथे उद्यान विकसित करण्यासाठी पुण्याच्या पुणा अम्युझमेंट कंपनीला ही जागा देण्यात आली. संबंधित कंपनीने पहिल्या टप्प्यात या ठिकाणी पेलिकन पार्कची उभारणी करत केवळ मुंबई-पुण्यात दिसणारी आधुनिक खेळणी उपलब्ध करून दिली.

अल्पावधीतच हा पार्क पर्यटनस्थळ म्हणून नावारुपास येऊ लागला. मात्र दृष्ट लागावी तसा प्रकार घडला आणि १९९५  मध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर पेलिकनच्या वैभवाला उतरती कळा लागली आणि बघता बघता उभे राहिलेली स्वप्ननगरी अल्पावधीतच लयास गेली. त्यानंतर सुरु झाली होती कोर्टाची लढाई. मधल्या काळात नवीन नाशिकमधील सर्वच राजकीय पक्षांच्या नेते-कार्यकर्त्यांनी पेलिकनच्या समस्येविषयी आपापल्यापरीने प्रयत्न केले. तत्कालीन आमदार नितीन भोसले यांनी या प्रश्नावरून विधानसभा गाजवली. तेथूनच या प्रश्नाला गती मिळाली असली तरी हा प्रश्न निकाली काढण्यात भोसलेंचे प्रयत्न अपयशी ठरले.

पुढे गल्ली ते दिल्ली सत्तास्थाने बदलल्यानंतर आमदार सीमा हिरे यांनी पेलिकनचा प्रश्न सोडविण्यासाठी आग्रही भूमिका ठेवली. नवीन नाशिकच्या मध्यवर्ती भागात असलेल्या १७  एकरच्या भव्य भूखंडावरील पेलिकन पार्कची न्यायालयीन लढाई संपुष्टात आणतानाच आ.हिरे यांनी आपल्या मतदारसंघातील जे ड्रीम प्रोजेक्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केले त्यात या प्रोजेक्टचा समावेश केला असून मुख्यमंत्री व महाराष्ट्र शासनाकडून या जागेच्या पुनर्विकासासाठी सकारात्मक पावले उचलण्यात आली आहेत व सदर प्रकल्पाला लागणार निधी देखील देण्याची तयारी दर्शविली आहे.

ज्येष्ठ नागरिक उद्यान
ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून उद्यानात त्यांच्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात येणार आहे. येथे ज्येष्ठ नागरिक सकाळ-सायंकाळ आनंदाने वेळ घालवू शकतील. त्यांच्यसाठी या भागात स्वतंत्र आसन व्यवस्थाही केली जाणार असल्याने हे ठिकाण ज्येष्ठांसाठीही हक्काचे ठिकाण म्हणून नावारुपास येईल.

असे असेल सेंट्रल पार्क

रेस्टॉरंट
उद्यानाची सफर करताना पोटपुजा करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यातील रेस्टॉरंटची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. पाणी, चहा-कॉफीपासून नाश्त्याचे विविध पदार्थ, शीतपेय, आईस्क्रीम व भोजनाचा आनंद घेण्याचीही सुविधा उपलब्ध होणार आहे.

तलाव
उद्यानाच्या प्रवेशद्वाराकडे तोंड करून उभे राहिल्यास मध्यवर्ती कारंजाच्या डाव्या बाजुला भव्य कृत्रिम तलावाची निर्मिती केली जाणार आहे. तलावाभोवती हिरवळ व आसनव्यवस्था केली जाणार असल्याने अबालवृद्धांसह तरुणाईसाठी देखील हे विरंगुळ्याचे ठिकाण ठरावे.

स्वतंत्र पार्किंग
उद्यानाला भेट देणार्‍या पर्यटकांच्या बस व इतर गाड्यांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजुला मोठ्या बस व गाड्यांची व्यवस्था असून उजव्या बाजुला चारचाकी गाड्यांसह दुचाकींच्या पार्किंगची सुविधा आहे.

अ‍ॅम्पि थिएटर
वनराईजवळील भागात सुसज्ज असे शंखाकृती अर्धगोलाकार ५००  आसन व्यवस्था असलेल्या अ‍ॅम्पि थिएटरच्या माध्यमातून मनोरंजनाची भेट उद्यान दर्शकांना मिळणार आहे. या ठिकाणी अत्याधुनिक ध्वनी यंत्रणा बविण्यात येणार असल्याने रंगमंचावरील कार्यक्रमांचा आनंद अवर्णनीय असेल यात शंका नाही.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!