Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

‘टॅक्स टेररिझम’ने देशात मंदी; सुप्रिया सुळे यांचा केंद्र सरकारवर घणाघात

Share

नाशिक । प्रतिनिधी

देशात केंद्र शासनाच्या जीएसटीसह विविध टॅक्स टेररिझम मुळे आर्थिक मंदी आली आहे. मंदीच्या या सावटामुळे देशातील उद्योग व्यवसाय संकटात सापडले आहेत. अनेक कामगारांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आहे, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर केला. देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी केंद्रात पॉलिसी मेकिंगची गरज आहे, असे सुप्रिया यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित संवाद दौर्‍यासाठी सुप्रिया सुळे काल  नाशिक येथे आल्या होत्या.  यावेळी राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

देशातील प्रश्‍न बेरोजगरिसह अनेक प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी केंद्रात पॉलिसी मेकिंग करण्याची गरज आहे. उद्योगात स्थैर्य निर्माण होत नाही तोपर्यंत अर्थव्यवस्था वाढू शकत नाही. असे असताना मुख्यमंत्र्यांना राज्यातील प्रश्‍न दिसतच नाहीत. त्याकरता त्यांनी अर्थमंत्र्यांना भेटण्याची गरज आहे, असा टोला सुप्रिया यांनी लगावला.

केंद्र सरकारने ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प राबवला खरा, पण निधीअभावी कामे होताना दिसत नाहीत. नाशकात ‘स्मार्ट सिटी’साठी केवळ ९० कोटी रुपये आले आहेत. त्यामुळे ‘स्मार्ट सिटी’चे नेमकें काय होत आहे हा प्रश्‍न आहे. सरकारकडे पैसे नसल्याने सरकारी मालमत्ता विकण्याची वेळ सरकारवर आली आहे. त्यामुळे हे प्रकल्प पूर्ण होतील की नाही का प्रश्‍नच आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

संकटाच्या काळात वापरण्यासाठी ठेवण्यात आलेला रिझर्व्ह बँकेचा रिझर्व्ह निधी सरकार कडून काढून घेत आहे. हे धोकादायक असून देशातील आर्थिक मंदीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. या प्रश्‍नांवर चर्चा होण्याऐवजी कोण कुठल्या पक्षात जातोय यांच्यावरच चर्चा होत असल्याने वाईट वाटत असल्याचे त्या म्हणाल्या.

त्यामुळे राजकारणाची व्याख्याच बदलली आहे. त्याला सर्वच जबाबदार आहे. शासनाच्या विरोधात बोलणार्‍यांच्या विरोधात कारवाई केली जात असल्याची चर्चा सगळीकडे असल्याचे सांगून निवडणुका फक्त जिंकायला लढल्या जात नाही; तर एक व्हिजन घेऊन काम काम करण्यासाठी लढल्या जातात असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, देवीदास पिंगळे, आमदार दीपिका चव्हाण, नरहरी झिरवाळ, माजी आमदार दिलीप बनकर, उत्तम भालेराव, श्रीराम शेटे, नानासाहेब महाले, दिलीप खैरे, गजानन शेलार, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे, शेफाली भुजबळ आदी उपस्थित होते.

अघोषित दडपशाही
शासनाच्या विरोधात कोणी बोलले की लगेच त्याला नोटिसा काढल्या जात आहेत. अजित पवार तसेच इतर नेत्यांचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने आपण बोलत नाही; परंतु विधानसभा निवडणुकाजवळ येताच सत्ताधारी सोडून इतर सर्व नेत्यांना नोटिसा तसेच त्यांंचे अटक सत्र सुरू होते; हे समजण्याइतकी जनता खुळी नाही. आज प्रत्येकजण दहशतीत असून शासनाची एकप्रकारे अघोषित दडपशाही सुरू असल्याचा आरोप सुळे यांनी केला.

मला बायोडेटा पाठवा
मंदीच्या फटक्यामुळे नाशिकसह राज्यामध्ये बेरोजगारीचा प्रश्‍न अधिक गंभीर बनला आहे. दुसरीकडे जनसंवाद यात्रेत मुख्यमंत्री मोठ्या प्रमाणात नोकर्‍या उपलब्ध असल्याचे सांगत आहेत. महाराष्ट्रात एवढ्या नोकर्‍या असतील तर युवकांनी मला आपआपले बायोडेटा पाठवावेत मी ते मुख्यमंत्र्यांकडे देऊन नोकर्‍या देण्याची विनंती करेल. युवकांच्या या प्रश्‍नांवर आम्ही काम करायला तयार आहोत असे सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले.

‘त्यांना रांगेत उभे राहावे लागणार
गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या, कारवाईच्या धमक्या तसेच खोटी आणि फसवी आश्‍वासनं देऊन आघाडीच्या नेत्यांना युतीत प्रवेश दिला जात आहे. हे सगळे मंत्री झाले तर सत्ता तशीही आमचीच राहणार अशी कोपरखळी त्यांनी मारली. नाती प्रेमाने जोडली जातात, धाक दाखवून नाही. जाणार्‍यांबद्दल कटुता नाही. तत्त्व आणि विचार याचा विचार केला पाहिजे निवडणूक नेत्यांमुळे नाही तर कार्यकर्त्यांमुळे जिंकता येते हे आम्ही दाखवून देऊ. जे पक्ष सोडून जाताय, ते परत येणारच मात्र त्यांना थेट पदे मिळणार नाहीत त्यांना आता रांगेत उभे राहावे लागेल.

भुजबळांच्या चर्चेला बगल
राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते छगन भुजबळ लवकरच शिवसेनेत प्रवेश करत असल्याची चर्चा असल्याचा प्रश्‍न विचारला असता आपणास गॉसिप करण्यास आवडत नसल्याचे सुळे म्हणाल्या. तसेच नाशिकमधील सर्व कार्यक्रमाचे नियोजन भुजबळांंंनी केले. गेली दोन दिवस समीर भुजबळ आपल्या समवेत प्रत्येक कार्यक्रमात आहेत. यामुळे भुजबळांबद्दल जे बोलले जाते त्यावर आपला विश्‍वास नसल्याचे सांगत सुळे यांनी या विषयाला बगल दिली.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!