Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

#Flashback : पुलोदचे इंदिरा काँग्रेसला आव्हान; इंदिरा काँग्रेसच्या जागा घटल्या

Share

नाशिक | रमेश शेजवळ

  • पुलोदला भरीव यश
  • शरद पवारांची ताकद वाढली
  • जिल्ह्यात पुलोदची हवा
  • शरद पवारांचा जंगी सत्कार
  • शरद पवार स्वगृही

पंजाब राज्यात खलिस्तान चळवळीने १९८० पासूनच वेग घेतला होता. पंजाब राज्य भारतापासून वेगळे करून स्वतंत्र खलिस्तान राष्ट्राची निर्मिती करण्यासाठी खलिस्तान चळवळीतील जहाल दहशतवादी जर्नेलसिंग भिंद्रनवाले याने अमृतसरचे सुवर्णमंदिरच ताब्यात घेऊन तेथे प्रचंड शस्त्रसाठा जमवला होता. सुवर्णमंदिर खलिस्तानी दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनले होते. भिंद्रनवालेचा बंदोबस्त केल्याशिवाय पंजाबमधील दहशतवाद थांबणार नाही, हे लक्षात घेऊन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुवर्णमंदिरात लष्कर घुसवून भिंद्रनवालेचा खात्मा केला.

या कारवाईमुळे सुवर्णमंदिराच्या पावित्र्याचा भंग आणि शीख समुदायाचा अवमान झाल्याचा प्रचार पंजाबमध्ये केला जात होता. याच कारणावरून ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी शीख अंगरक्षकांनी इंदिरा गांधींची हत्या केली. यानंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. त्यांनी डिसेंबरमध्ये लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका घेतल्या. देशात इंदिरा लाटच उसळली. या लाटेचा प्रभाव कायम असतानाही १९८५ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी विरोधकांची पुलोद नावाने मोट बांधून काँग्रेसला कडवी झुंज दिली.

१९८० च्या निवडणुकीत १८६ जागा जिंकणार्‍या काँग्रेसचे संख्याबळ १६१ पर्यंत खाली आले. नाशिक जिल्ह्यातील सर्वच्या सर्व १४ मतदारसंघांत काँग्रेसचा पराभव झाला. शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसला राज्यात ५४ जागा मिळाल्या. तथापि पुलोदमधील घटक पक्षांमुळे विरोधकांचे संख्याबळ शंभराहून अधिक होते आणि काही अपक्षही बरोबर होते.

काँग्रेसने २८७ जागा लढवून १६१ जिंकल्या, तर समाजवादी काँग्रेसने १२६ जागा लढवून ५४ वर विजय मिळवला. ६१ जागा लढवणार्‍या जनता पक्षाचे २० उमेदवार विजयी झाले, तर ६७ जागांवर उमेदवार देणार्‍या भाजपच्या पदरात १६ जागा पडल्या. शेतकरी कामगार पक्षाने २९ जागांवर उमेदवार उभे करून १३ ठिकाणी विजय संपादन केला.

माकप आणि भाकप अनुक्रमे १४ व ३१ जागा लढवून प्रत्येकी दोन जागा जिंकल्या. यातील प्रत्येकी एक एक जागा नाशिक जिल्ह्यातील (सुरगाणा व नांदगाव) होत्या. लोकदल, रिपब्लिकन, फॉरवर्ड ब्लॉक यांना एकही जागा मिळाली नाही, तर 1506 अपक्षांपैकी २० उमेदवार विजयी झाले.

१९८५ साली पुन्हा एकदा सत्ता मिळाल्यानंतर इंदिरा काँग्रेसने मुख्यमंत्री म्हणून वसंतदादा पाटील यांना पुन्हा संधी देण्यात आली. पंतप्रधान राजीव गांधी आणि वसंतदादा पाटील यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यातच मुंबईला केंद्रशासित प्रदेश करायचा केंद्राचा प्रयत्न असल्याचा आरोप वसंतदादा पाटील यांनी केल्याने मतभेदांची दरी आणखी वाढली. राजीव गांधी यांनी वसंतदादा पाटील यांना राजीनामा देण्यास सांगितले. त्यानंतर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना जून १९८५ मध्ये मुख्यमंत्री करण्यात आले.

निलंगेकर यांनाही लवकरच राजीनामा द्यावा लागला. एम.डी. (वैद्यकीय) परीक्षेत आपल्या मुलीचे गुण वाढवण्यासाठी परीक्षा समितीवर दबाव आणल्याचा आरोप झाल्याने निलंगेकरांनी राजीनामा दिला. त्यानंतर मार्च १९८६ मध्ये शंकरराव चव्हाण यांच्याकडे राज्याचे नेतृत्व सोपवण्यात आले. शंकरराव दुसर्‍यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. विधानसभेच्या निवडणुकीत समाजवादी काँग्रेसला सत्ता मिळाली नाही. त्यामुळे अनेक आमदार शरद पवारांना सोडून इंदिरा काँग्रेस पक्षात दाखल झाले.

शेवटी शरद पवारांनी औरंगाबादेत १९८६ साली पक्षाचे अधिवेशन भरवून राजीव गांधींच्या उपस्थितीत समाजवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. पुढे जून 1988 मध्ये शंकरराव चव्हाण यांना केंद्रात राजीव गांधींनी अर्थमंत्री करून राज्याचे मुख्यमंत्रिपद शरद पवारांच्या स्वाधीन केले.

नाशिक जिल्ह्यातील विजयी उमेदवार
मतदारसंघ विजयी उमेदवार पक्ष
इगतपुरी             शिवराम शंकर झोले                        समाजवादी काँग्रेस
नाशिक              दौलतराव सोनूजी आहेर                    भाजप
देवळाली            भिकचंद हरिभाऊ दोंदे                     भाजप
सिन्नर                तुकाराम सखाराम दिघोळे                 समाजवादी काँग्रेस
निफाड             मालोजीराव सदाशिव मोगल               समाजवादी काँग्रेस
येवला               मारोतराव नारायणराव पवार               समाजवादी काँग्रेस
नांदगाव            माधवराव बयाजी गायकवाड               भारतीय कम्युनिस्ट
मालेगाव            निहाल अहमद                                 जनता पक्ष
दाभाडी             पुष्पाताई व्यंकटराव हिरे                     समाजवादी काँग्रेस
चांदवड             जयचंद दीपचंदी कासलीवाल               भाजप
दिंडोरी             हरिभाऊ शंकर महाले                        जनता पक्ष
सुरगाणा           जिवा पांडू गावित मार्क्सवादी                कम्युनिस्ट
कळवण           काशिनाथ नारायण बहिरम                  समाजवादी काँग्रेस
बागलाण          रुंजी पुंजाराम गांगुर्डे                           समाजवादी काँग्रेस

नाशिक जिल्ह्यात समाजवादी काँग्रेसचे सात, भाजपचे तीन, जनता पक्षाचे दोन, भारतीय कम्युनिस्ट आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा प्रत्येकी एक याप्रमाणे विरोधी पक्षांचे सर्व आमदार विजयी झाले. जवळपास संपूर्ण जिल्हा शरद पवारांच्या पाठीशी उभा राहिला. शरद पवारांचा नाशिकमध्ये जंगी नागरी सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना शरद पवार यांनी नाशिक जिल्ह्याचे पालक म्हणून भूमिका बजावण्याचे आश्‍वासन दिले होते.

अपक्ष (बंडखोर) म्हणून मैदानात उतरलेले सिन्नरचे आमदार सूर्यभान गडाख यांचाही पराभव झाला. जिल्ह्यात मोठा प्रभाव असलेल्या शरद जोशी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेने पुलोदला पाठिंबा दिला होता. 1984 च्या लोकसभा निवडणुकीतील इंदिरा लाट १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत ओसरली होती. अनेक इंदिरानिष्ठांना पराभव पत्करावा लागला.

नाशिकमध्ये जयप्रकाश छाजेड, इगतपुरीत विठ्ठलराव घारे, निफाडमध्ये माणिकराव बोरस्ते, नांदगावमध्ये जगन्नाथ धात्रक, कळवणमध्ये ए. टी. पवार, बागलाणमध्ये शंकर अहिरे आदी इंदिरानिष्ठांना पराभवाची छाया अनुभवायला मिळाली. बळीराम हिरे यांनी पुष्पाताई हिरे यांचे पती व्यंकटराव हिरे यांचा आधीच्या निवडणुकीत पराभव केला होता. या पराभवाचा वचपा बळीराम हिरे यांच्या पत्नी पुष्पाताईंनी इंदिराबाई यांचा पराभव करून काढला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!