Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

कृषी क्षेत्रात संधीचे ‘पीक’; पदवी अभ्यासक्रमाकडे वाढता कल

Share

नाशिक । प्रतिनिधी

कृषी अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. सध्या अभियांंत्रिकी अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांनी काहीअंशी पाठ फिरवल्याचे चित्र असले तरी कृषी क्षेत्रात करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशावर लक्ष केंद्रित केले आहे.

राज्यातील कृषी विद्यापीठांमार्फत अ‍ॅग्रिकल्चर कॉलेजमध्ये कृषी पदवीचे अभ्यासक्रम शिकवले जातात. वैद्यकीय, अभियांत्रिकी या पारंपरिक ‘करिअर स्वप्नांं’कडे न बघता कृषी पदवी (बीएस्सी-अ‍ॅग्री) अभ्यासक्रमाच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

‘कृषी’त करिअर करण्यासाठी दरवर्षी उपलब्ध जागांच्या दोन ते तीन पट जास्त अर्ज येतात. कृषी पदवीधरांना उपलब्ध असलेल्या सरकारी व खासगी क्षेत्रातील नोकरीच्या संधी, अभ्यासक्रमाची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया, विविध गटांना सरकारकडून मिळणारी सवलत व अन्य बाबींमुळे ही मागणी वाढली आहे.

शेतीमध्ये उत्पादनवाढीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. फळ उत्पादनाकडे संपूर्ण राज्यातील शेतकर्‍यांचा कल वाढला असून त्यामुळेच अन्नधान्याच्या उत्पादनापेक्षा फळांचे उत्पादन वाढलेले दिसून येते. दुग्ध उत्पादन, कुक्कुटपालन, पशुसंवर्धन याकडे शेतीपूरक व्यवसाय म्हणून पाहिले जाते.

शेतीमध्ये काम करण्यासाठी मजुरांची कमतरता भासू लागल्यामुळे कृषी अवजारांच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळून स्वयंचलित अवजारांचा शेती व्यवसायात वापर वाढलेला दिसून येतो. शेतीसाठी पाण्याची कमतरता भासू लागल्यामुळे सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर वाढला आहे.

या सर्व बाबींचा विचार करता उत्कृष्ट शेती व्यवसायासाठी कृषी व कृषी संलग्न क्षेत्रात म्हणजेच उद्यान विद्या, कृषी अभियांत्रिकी, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, अन्न-तंत्रज्ञान, कृषी जैवतंत्रज्ञान, मत्स्य विज्ञान, पशुसंवर्धन या विषयांतील प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणे काळाची गरज आहे.

आज कृषी क्षेत्रात अनेक बाबींना महत्त्व प्राप्त झाले आहे. आर्थिक गुंतवणूक, कृषीमालासाठी उपलब्ध असलेली बाजारपेठ, अधिक उत्पादकतेसाठी स्पर्धात्मकता, अत्याधुनिक अवजारांचा उपयोग, प्रक्रिया उद्योग, तण नियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर, शेतीपूरक उद्योगांची निर्मिती, दुग्धोत्पादन या बाबींचा शेती व्यवसायामध्ये समावेश झालेला दिसून येतो.

नोकरी/व्यवसाय संधी
कृषी पदवीधारकांना एमपीएससीमार्फत महसूल व अन्य विभागांमध्ये वर्ग-१, वर्ग-२ पर्यंतच्या सर्व पदांवर नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे होणार्‍या परीक्षेमध्ये कृषी पदवीधर यशस्वी होत असून राष्ट्रीयकृत बँकांमध्ये कृषी अधिकारी/ विकास अधिकारी या पदावर कृषी पदवीधरांची नेमणूक होत आहे.

अन्न महामंडळ, पणन महामंडळ व खादी ग्रामोद्योग या ठिकाणीही कृषी पदवीधारकांना नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. खासगी क्षेत्रामध्येही अनेक बियाणे, कीटकनाशके, खते, ठिबक व तुषार सिंचन कंपन्या, खासगी क्षेत्रातील बँका, प्रक्रिया उद्योग तसेच कृषी सेवा सल्ला, विमा कंपन्या तसेच कृषी पदवीधारकांना पदवी, पदव्युत्तर महाविद्यालयांमध्ये व्याख्याता, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यामध्येही विविध पदांवर काम करण्याच्या संधी या पदवीधारकांना आहेत. कृषी विद्यापीठाअंतर्गत कृषी संशोधन केंद्रामध्ये शास्त्रज्ञ या पदावर कार्य करण्याच्या संधी उपलब्ध आहेत.

फलोत्पादन हीच भविष्यातील शेती
राज्यापुरता विचार करता कृषी क्षेत्राला प्रशिक्षित मनुष्यबळाची जोड मिळाली तर हे क्षेत्र अधिक वेगाने झेप घेऊ शकते. फलोत्पादन हीच भविष्यातील शेती आहे. इतर पिके व फलोत्पादनात भविष्यात संघटित मूल्य साखळी निर्माण करण्यास मोठी संधी असून या ठिकाणी कृषी शाखेचे शिक्षण घेणारे विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजवू शकतात. विद्यार्थ्यांनी शेतीकडे लक्ष केंद्रित केले तर सह्याद्रीसारख्या किमान तीनशे उत्पादक कंपन्या राज्यात उभ्या राहू शकतात.
विलास शिंदे, संचालक, सह्याद्री फार्मर्स आणि प्रोड्युसर कंपनी, मोहाडी

अजून प्रवेशप्रक्रिया सुरू
या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. सध्या दोन प्रवेश फेर्‍या बाकी असून महाविद्यालयात ४० टक्के प्रवेश झाले आहेत. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आजतायगत एकही जागा शिल्‍लक राहिलेली नाही.
प्रा. साजन हिंगोणेकर, दुलाजी नाना पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!