Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

फाईल टपाल विभागातच नोंदणी करण्याची सक्ती; जि.प.सीईओ भुवनेश्वरी एस.यांचे आदेश

Share

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषदेत फायली गहाळ होण्याचा प्रकार अजूनही कायम असून काही कामाच्या फायली तर राजकीय पदाधिकारी व ठेकेदार घेऊन फिरत आहेत. ही बाब निदर्शनास आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस.यांनी कुठलीही फाईल टपाल विभागातच नोंदणी करण्याची सक्ती केली आहे.यामुळे या कामात सुसूत्रता येईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जिल्हा परिषदेत विविध विकास कामांच्या फायली राजकीय पदाधिकारी आणि ठेकेदार घेऊन फिरतात परिणामी फायली गहाळ होण्याचे प्रकार वारंवार घडत आले आहेत.असाच एक प्रकार शिक्षण विभागात एका सेवकाकडून फाईल दाबून ठेवण्याचा प्रकार मागील सप्ताहात उघडकीस आला होता.हा मुद्दा स्थायी समितीच्या बैठकीत समोर आला त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी फाईलची नोंदणी ही टपाल विभागातच करण्याची सक्ती केली आहे.यासंदर्भात संबंधित विभागातील अधिकारी,सेवकांनी त्या-त्या फाईल नोंद करण्याचे आदेश त्यांनी काढले आहेत.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत फायलींचा प्रवास हा नेहमीच कळीचा मुद्दा ठरत आलेला आहे. जिल्हा परिषद सदस्य महेंद्रकुमार कालेे यांनी सर्वसाधारण सभेत तर एका फाईलचा प्रवास हा तब्बल ४२ टेबलावरून होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.हा प्रवास कमी करावा,अशी मागणीही त्यावेळी त्यांनी केली होती.फायली वेळेवर निघत नाही.त्यावर पान पान भर शेरे लिहिले जातात,अशी तक्रारही खुद्द अध्यक्ष शितल सांगळे यांनीही सर्वसाधारण सभेत केलेली आहे.

फाईल गहाळ होण्याचा प्रकार नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उघडकिस आला.डॉ.आत्माराम कुंभार्डे यांनी शिक्षण विभागातील राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजनेची फाईल तब्बल दीड वर्षांपासून सापडत नसल्याचे सांगितले होते. या मुद्यावरून त्यांनी संबंधित सेवकाला सेवकाच्या कपाटातच ही फाईल सापडल्याचे दाखवून दिले होते.

फायलींचा अशाप्रकारच्या लांबलेल्या प्रवासाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे त्यामुळे याची दखल मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस.यांनी घेतली असून फायलींचा प्रवास कमी होण्याच्या दृष्टीने नव्याने आदेश काढले आहेत. या आदेशानंतर तरी फायलींचा प्रवास थांबून सुसूत्रता येईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!