Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

वीजदाब वाढून टीव्ही, बल्बचे स्फोट

Share

नाशिकरोड । प्रतिनिधी

टाकळी रोडवरील सिंगापूर गार्डनमध्ये विजेचा दाब अचानक वाढल्याने घरांमधील टीव्ही, फ्रीज, एलईडी बल्ब, सेट टॉप बॉक्स, पंखे आदी विद्युत उपकरणांचे मोठे नुकसान झाले. दुसर्‍या दिवशी डीपीमध्ये स्फोट झाला. भिंतीमध्ये विद्युत प्रवाह उतरत आहे. गेल्या वर्षीही असाच प्रकार घडला होता. त्यामुळे रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. महावितरण कंपनीनेही नुकसान भरपाईबाबत हात वर केल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. रहिवाशांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. परिस्थिती बघून वीज कर्मचार्‍यांनी उपाययोजना सुरु केल्या आहेत.

सिंगापूर गार्डन परिसरात दि.१६ रोजी विजेचा दाब प्रचंड वाढून वीजेवरील घरगुती उपकरणांची मोठी हानी झाली. त्र्यंबक सोनवणे यांचा शार्प कंपनीचा साठ हजाराचा टिव्ही तसेच फ्रीज, इनर्व्हटर, सेट टाप बाक्स, फ्रीजचा स्वीच बॉक्स, रेडिओ व एलईडी बल्ब जळाले. आर.आर. कल्याणी यांचे पाच एलईडी ब्लब, पंखे, सेट टॉप बॉक्स तर सुनील भट यांचे एलईडी बल्ब, सेट टॉप बॉक्स जळाले. विश्वास जाधव आणि विलास पगारे यांचे टिव्ही जळाले. दिवाळीत फटाक्यांप्रमाणे स्फोट झाल्याचे नागरिकांनी सांगितले. डीपीत स्फोट झाल्यामुळे शेजारील झाडानेही पेट घेतला.

नागरिकांनी आरोप केला की येथे भूमीगत वीजपुरवठा असताना नवीन इमारतीला याच डिपीतून झाडांवरुन वायर टाकून वीजपुरवठा केला आहे. प्रमाणापेक्षा जास्त कनेक्शन दिल्यानेच असे स्फोट होत आहेत. डीपीला आग लागली असताना वीज कर्मचा-यांनी पाणी टाकून ती विजवली. गेल्या वर्षीही असाच प्रकार होऊन नागरिकांचे नुकसान झाले होते.

याबाबत येथील नागरिकांनी द्वारकावरील महावितरण कार्यालयाशी फोनवर संपर्क करुनही कर्मचारी वेळेत आले नाहीत. ज्यांची उपकरणे जळाली आहेत त्यांनी पोलिसांकडून पंचनामे करुन घ्यावेत, असेही सांगण्यात आले. संतापाची बाब म्हणजे उपकरणे दुरुस्तीसाठी जो खर्च येईल तेवढाच देण्यात येईल, उपकरण संपूर्ण जळाले असेल किंवा निकामी झाले असेल तर तो खर्च मिळणार नाही, असे वीज अधिकार्‍यांनी सांगितल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. ज्यांचे नुकसान झाले त्यांना पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवून पंचनामे करण्याचे काम मागे लागले आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!