Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

सरपंचांसह उपसरपंचांचे मानधन बँकेत जमा होणार

Share

नाशिक । प्रतिनिधी

राज्य सरकारने सरपंचांच्या मानधनात गेल्याच महिन्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयापाठोपाठ आता सरपंच, उपसरपंचांचे मानधन बँकेत ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या सेवकांप्रमाणे सरपंच, उपसरपंचांचे मानधन तसेच बैठकीच्या भत्त्यांचे मानधन थेट बँकेत जमा होणार आहे.

या निर्णयाचा राज्यातील २८ हजाराहून अधिक सरपंच, उपसरपंचांना फायदा होणार आहे. राज्य सरकारने अध्यादेश जारी करून राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचांचे मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील ग्रामपंचायत सेवकांचे वेतन ऑनलाईन पद्धतीने थेट बँकेत जमा करण्यात येते.

सरपंच, उपसरपंचांचे मानधन व ग्रामपंचायत सदस्यांना बैठक भत्ताही ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा प्रस्ताव सरकारकडे विचाराधीन होता. त्या प्रस्तावाला राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाअंतर्गत एचडीएफसी बँकेतील खाते क्रमांकामध्ये मानधनाची रक्‍कम जमा करून संबंधितांना अदा करण्यात येणार आहे.

दर महिन्याला प्रत्येक ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच तसेच सदस्यांचे लॉग इन करून माहिती अद्ययावत करावी. सरपंच, उपसरपंच व सदस्यांमध्ये बदल झाला असेल तर दर महिन्याला ग्रामसेवकाने संबंधितांची माहिती अद्ययावत करावी. या माहितीची गटविकास अधिकारी तसेच पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी खातरजमा करावी. तसेच मानधन व सदस्य बैठक भत्ता संबंधितांच्या खाते क्रमांकावर त्याच दिवशी अथवा कार्यालीन कामकाजाच्या दुसर्‍या दिवशी जमा करावा, असे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत.

दरम्यान, राज्य सरकारने एक महिन्यापूर्वीच सरपंचांच्या मानधनात वाढ केली. त्यामुळे दोन हजार लोकसंख्येच्या गावाच्या सरपंचाला एक हजारावरून तीन हजार रुपये वाढवण्यात आले. २००१ ते ८ हजार लोकसंख्येसाठी दीड हजारांवरून चार हजारांवर मानधन करण्यात आले. आठ हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे मानधन दोन हजारांवरून पाच हजार रुपये करण्यात आले आहे.

मात्र, उपसरपंचांना एक ते दोन हजार रुपये एवढेच मानधन सुरू करण्यात आले. दरम्यान, सरपंच, उपसरपंच यांना देण्यात येणार्‍या मानधनावरील खर्चापैकी ७५ टक्के खर्च सरकार उचलणार आहे. उर्वरित २५ टक्के मानधनाची रक्‍कम संबंधित ग्रामपंचायत स्वनिधीमधून देण्यात येणार आहे असे समजते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!