Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

विधानसभा निवडणूक २०१९ : नाशिक पूर्वमध्ये अटीतटीची लढाई; आजी-माजी पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

Share

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात १२ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी १० नाममात्र असून खरी अटीतटीची लढाई राष्ट्रवादी आघाडीचे बाळासाहेब सानप व भाजप युतीचे राहुल ढिकले यांच्यात होत आहे. या मतदारसंघात जिल्ह्याचे आजी-माजी पालकमंत्र्यांची प्रतिष्ठाही पणाला लागल्याचे चित्र आहे.

या मतदारसंघात सुरू असलेला दोन्ही उमेदवारांचा प्रचार व त्यांना मतदारांचा मिळत असलेला प्रतिसाद हा तुल्यबळ असल्याने अखेरपर्यंत ही लढाई निकराचीच होणार असल्याचे बोलले जात आहे. नाशिक पूर्वचे विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांना भाजपने उमेदवारी डावलण्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांचा हात असल्याचे लपून राहिले नाही.

सानपांना डावलतानाच या मतदारसंघातील मनसेनेचा तगडा उमेदवार मानलेल्या राहुल ढिकले यांना राष्ट्रवादीच्या हातातून खेचून घेत त्यांना भाजपची उमेदवारी महाजन यांनी मिळवून दिली. तर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भाजपला शह देत विद्यमान आमदार सानपांनाच राष्ट्रवादीत खेचले. आता सानपांनी ढिकलेंचा पराभव केला तर तो पालकमंत्री गिरीश महाजन यांचा नैतिक पराभव मानला जाणार आहे. तर सानपांचा पराभव झाल्यास सानपांसाठी शेवटपर्यंत सर्व शक्यता पार करून त्यांना उमेदवारी देणारे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांचा हा नैतिक पराभव असणार आहे. यामुळे दोन्ही पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा या मतदारसंघात पणाला लागली आहे.

दोन्ही उमेदवारांचा प्रचार वेगात सुरू असून दोघेही प्रत्येक उमेदवारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. सानप यांनी आमदार असताना पाच वर्षांत या मतदारसंघात केलेली भरीव विकासकामे, सामान्य कार्यकर्ता ते आमदार व पक्षवाढीसाठी अडचणीच्या काळात योगदान देणारा सच्चा कार्यकर्ता असा सानपांचा प्रवास व प्रतिमा असतानाही त्यांना भाजपने डावलल्याने याची मोठी सहानुभूती सानप यांना मिळत आहे.

पक्षाचे आदेश असले तरी अडचणीच्या काळात अनेक नगरसेवक तसेच पदाधिकार्‍यांना सानपांनी केलेली मदत याची जाणीव असलेले अनेक नगरसेवक व पदाधिकारी त्यांना अंतर्गत मदत करत असल्याची चर्चा आहे. सहानुभूती व विकासकामे, तसेच सर्वसामान्या-ंमधील नेता ही प्रतिमा त्यांना तारते का हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

स्व. आमदार उत्तमराव ढिकले यांची पुण्याई, दोन वर्षे मतदारांपर्यंत पोहोचून अडचणी सोडवण्याचा केलेला प्रयत्न, भाजपसारख्या पक्षाची ताकद, नाशिक पूर्व हा भाजपचाच बालेकिल्ला असल्याने युतीच्या कार्यकर्त्यांची फळी, इतर मतदारसंघांप्रमाणे येथे न झालेली बंडखोरी या राहुल ढिकलेंच्या जमेच्या बाजू आहेत, तर मनसेनेचे अनेक कार्यकर्तेही ढिकलेंसोबत गेल्याने आघाडी तसेच मनसेनेची ताकद कमी झाल्याचे मानले जात आहे. पक्षाची लाट, युतीच्या कार्यकर्त्यांची फळी, दोन वर्षांचा संपर्क व वडिलांची पुण्याई ढिकलेंना किती तारते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!