Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

५६ हजार दुबार, मयत मतदारांची नावे वगळली; सोमवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार

Share

नाशिक । प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीचा बिगुल येत्या सप्टेंबर महिन्यात वाजणार असून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात मतदार याद्या शुद्धीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्हा निवडणूक शाखेकडूनही मतदार याद्या नूतनीकरण केले जात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात मतदार यादीतील ५६ हजार दुबार व मयत नावे वगळण्यात आली आहे. सर्वाधिक नावे सिन्नर मतदारसंघातून कमी करण्यात आली आहे.

राज्यातील २८८  विधानसभा जागांसाठी निवडणूक होणार असून येत्या १५ सप्टेंबरपर्यंत आचारसंहिता लागू होण्याची चिन्हे आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदार याद्या शुद्धीकरणाचे काम हाती घेतले आहे. नाशिक जिल्ह्यात १५ विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात मतदारांची संख्या ही ४५ लाखांच्या घरात होती. आयोगाच्या कार्यक्रमानुसार जिल्हा निवडणूक शाखेकडून १५ जुलैला प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली होती. येत्या १९ ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

त्यापूर्वी यादीत नाव नसेल अशा मतदारांना यादीत समाविष्ट करणे, मतदार यादीतील मयत, दुबार आणि स्थलांतरित मतदारांच्या नावांची वगळणी करणे आणि त्या आधारे मतदार याद्यांचे शुद्धीकरण करून मतदार यादी दोष विरहित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

या मोहिमेत जिल्ह्यातील ५६ हजार दुबार व मयत मतदारांची नावे वगळण्यात आली आहे. सर्वाधिक दुबार व मयत मतदार हे सिन्नर तालुक्यात आढळले आहेत. या ठिकाणी ९ हजार ६०७ मतदारांची नावे वगळण्यात आली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारांची नावे यादीत गहाळ होती.त्यामुळे अनेकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागले. विधानसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी निवडणूक शाखेने दक्षता घेतली आहे. तसेच वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या नव मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा व मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विशेष मतदार नोंदणी मोहीम देखील राबविण्यात आली होती.

मतदारसंघ आणि वगळण्यात आलेली नावे
नांदगाव – ४७७८
मालेगाव (मध्य) –  ३७३१
मालेगाव (बाह्य) – ३४३४
बागलाण – १९१७
कळवण – ३२८२
चांदवड – ४९४२
येवला – ४९४२
सिन्नर – ९६०७
निफाड – २६२१
दिंडोरी – ६१९६
नाशिक पूर्व – १७४०
नाशिक मध्य – ३१२१
नाशिक पश्‍चिम – १०९२
देवळाली – १३०८
इगतपुरी – ३२७९

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!