कालिदास कलामंदिराची भाडेवाढ रद्द करा अन्यथा आंदोलन

नाट्यकलावंतांचा मनपाला इशारा

0

नाशिक | प्रतिनिधी शहरातील सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या कालिदास कलामंदिराची भाडेवाढ करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या हालचाली सुरू आहेत. भाडेवाढीस शहरातील नाट्य कलावंतांनी विरोध केला आहे. याप्रकरणी कलावंतांच्या शिष्टमंडळाने महापालिकेकडे भाडेवाढ रद्द करावी, कलामंदिरातील त्रुटी व दुरुस्त्या लेखी स्वरुपात सुचविल्या आहेत. भाडेवाढ रद्द करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कलाकारांनी महापालिकेला दिला आहे.

कालिदास कलामंदिरात होणार्‍या कार्यक्रमांंसाठी मोठ्या प्रमाणावर भाडेवाढ केल्याने सांस्कृतिक क्षेत्रास खीळ बसणार आहे. सांस्कृतिक चळवळ जोपासली जावी व भाडेवाढ रद्द व्हावी, यासाठी कलाकार, कलारसिकांची काल  (दि.२०) ‘कालिदास’मध्ये बैठक आयोजित केली होतीे. त्यावेळी उपस्थितांनी भाडेवाढीबाबत तीव्र स्वरुपात प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यामध्ये ज्येष्ठनाट्यकर्मी सदानंद जोशी, दिग्दर्शक सचिन शिंदे, दत्ता पाटील, विनोद राठोड, लक्ष्मण कोकणे, अभय ओझरकर आदीची उपस्थिती होती.

नाट्य कलावंतांच्या शिष्टमंडळाने नुकतीच आयुक्तांची भेट घेत, कालिदास कलामंदिराची भाडेवाढ रद्द करावी, यासंदर्भात त्यावेळी सकारात्मक चर्चा झाली.

कलावंतांनी राज्यातील नाट्यगृहांचे भाडेदर याचही माहिती लेखी स्वरुपात दिली आहे. त्या तुलनेत कालिदास कलामंदिराची भाडेवाढ जास्त आहे. ती हौशी व प्रायोगिक नाट्य कलावंतांना परवडणारी नाही. संगीत, नृत्य क्षेत्रातील कलावंतांबद्दल हेच आहे. त्याप्रमाणे त्याचप्रमाणे मुंबई, पुण्यातून अथवा नाशिक बाहेरील कलकारांना येथे येऊन नाटक सादर करणार्‍या व्यावसायिक नाट्यकंपन्यांनाही भाडेवाढीची फटका बसणार आहे.

नाशिक सांस्कृतिक क्षेत्रात याचा विपरीत परिणाम होणार आहे. या संदर्भात सविस्तर चर्चा झालेली आहे. ‘कालिदास’ची भाडेवाढ रद्द करावी अन्यथा आंदोलन करण्यात येणार आहे. कालिदास कलामंदिर नूतनीकरणानंतर दुरुस्तीसोबत सूचना कलावंतांनी सुचविल्या आहेत, त्याचाही मनपाने विचार करावा, असा सूर कलावंतांचा बैठकीत उमटला.

‘कालिदास’चे सौंदर्य कायम टिकावे, यासाठी काही कार्यक्रमांना कलामंदिर देण्याबाबतचे निकष कठोर करणे अपेक्षित आहे. शाळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ‘कालिदास’ दिल्याने खुर्च्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे शाळांचे कार्यक्रम तसेच राजकीय पक्षांचे मेळावे, यांना कालिदास भाड्याने देतांना नियम, निकष ठरविणे महत्वाचे ठरणार आहे, असे कलावंतांनी सांगितले.

सांस्कृतिक नुकसान
कालिदास कलामंदिराची भाडेवाढ झाल्यास शहरात सांस्कृतिक कार्यक्रम अल्प प्रमाणात होतील. भाडेवाढीमुळे कलावंतांचा व प्रयोगाचा खर्चही निघणार नाही. हीच भाडेवाढ राहिल्यास राज्यातील कलावंत शहरात प्रयोगासाठी येणारच नाहीत. महानगरपालिकेने ‘कालिदास’ची भाडेवाढ रद्द करावी.
-सचिन शिंदे (दिग्दर्शक ), विनोद राठोड (प्रकाश योजनाकार)

त्रुटी व दुरुस्ती
‘कालिदास’मध्ये लावण्यात आलेले स्पॉट लाईट तांत्रिकदृष्ट्या योग्य नाहीत. नाटकांसाठी आवश्यक असलेले व सर्वत्र वापरले जाणारे कॅनरा कंपनीचे (१ हजार वॅट) किमान २५ स्पॉटलाईट लावावेत. विंगेत आलेले पॉवर पॅकचे युनीट मागे घेणे-जेणे करून त्याच्या आवाजाचा त्रास होणार नाही. नाट्यगृहातील एलईडीसाठी स्वंतत्र डिमर बोर्ड उपलब्ध करुन द्यावा. विंगा व मागचा पडदा काळ्या रंगाचा व त्याची फ्रेम लाकडी असावी, अशी दुरुस्ती कलावंतांनी सुचविली आहे.

कार्यक्रमाची वर्गवारी
नाटक प्रायोगिक ४ तास, नाटक व्यावसायिक ४ तास, बालनाट्य ४ तास, सेमिनार, बैठक, चर्चासत्र, परिसंवाद ४ तास, पुस्तक प्रकाशन ३ तास, गॅदरिंग किंवा सांस्कृतिक कार्यक्रम ३ तास, हौशी नाट्य संस्थांसाठी ३ तास, तालमीसाठी ३ तास, रंगीत तालीम ३ तास, एस. सी. डी. प्रोजेक्टर, स्पॉट लाईट १ हजार वॅट बालनाट्य ५० रुपये, स्पॉट लाईट १ हजार वॅट एकांकिका ७५ रुपये, व्यावसायिक नाटकांसाठी १०० रुपये, बाहेरील आणलेले लाईट ५०० वॅट २५ रुपये व १ हजार वॅट ५० रुपये, नाटकांसाठी लेव्हल्स-एका लेव्हल्सचे भाडे १० रुपये अशी कलावंतांनी वर्गवारी सुचविली आहे.

राज्यातील नाट्यगृहांचे भाडे
दीनानाथ नाट्यमंदिर, मुंबई -६५ हजार
गडकरी रंगायतन, ठाणे -५१ हजार
बालगंधर्व रंगमंदिर,पुणे- ४ हजार ५००
यशवंत नाट्यमंदिर,पुणे -४ हजार ५००
अण्णाभाऊ साठे स्मारक,पुणे- ४ हजार ५००
भीमसेन जोशी नाट्यगृह,पुणे- ४ हजार ५००
म.फुले सांस्कृतिक भवन,पुणे -४ हजार ५००
विष्णुदास भावे नाट्यमंदिर,वाशी- ३ ते ८ हजार
भोसले नाट्यगृह,कोल्हापूर -७ हजार
हुतात्मा स्मृती मंदिर,सोलापूर -६ हजार

 

LEAVE A REPLY

*