Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : नाशिकरोड कारागृहात सर्जनशीलतेचा ‘सागर’

Share

नाशिक । प्रतिनिधी

फिरत्या चाका वरती देसी मातीला आकार…विठ्ठला तु वेडा कुंभार… या उक्तीला साजेशे असेच काही काम नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात सुरु आहे. येथील बंदीवानांनी यंदा बारा फूट उंचीची आणि कागदाच्या लगद्यापासून आकर्षक गणेश मूर्ती घडवली आहे. मूर्तीचा साजही पर्यावरणपूरक आहे. यंदा कारागृह शाडू मातीच्या दीड हजार मूर्ती नागरिकांसाठी विक्रीस उपलब्ध करणार आहे.

येथील बंदीवानांनी बनवलेल्या आकर्षक गणेशमुर्तींसह इतर साहित्याला मोठी मागणी आहे. विशेष म्हणजे, एका मुर्तीकार असलेल्या बंदीवानाने इतर बंदीवानांना मुर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले. त्यांना सोबत घेत हजारो गणेशमुर्ती बनविल्या आहेत. यंदा मोठी उलाढाल यामाध्यमातून होणार असल्याचे कारागृह अधिक्षक प्रमोद वाघ यांनी देशदूतशी बोलताना सांगितले.

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात बंदीवानांना स्वतःच्या पायावर उभे राहणयासाठी शिवणकाम, विणकाम, लोहारकाम, चर्मकला, सुतारकाम, बेकरी, रसायन, मूर्तिकाम, धोबीकाम अशा वेगवेगळ्या कामांत प्रगत केले जाते. बंदीवानांकडून अनेक वस्तुंची निर्मित केली जाते. विशेष म्हणजे सर्व वस्तु उच्च दर्जाच्या आहेत. अशा वस्तुंची विक्रि करुन गेल्या वर्षी कारखाना विभागाने साडेसहा कोटी रुपयांचे उत्पादन घेतले होते.

सागर पवार मुळचा रत्नागिरी जिल्ह्यातील पेण येथील आहे. तो मुर्तीकार आहे. सध्या तो नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. कारागृहात आल्यावरही त्याने आपल्या कलेची साधना सुरूच ठेवण्याचा निर्धार केला. त्यासाठी त्याने इतर २० बंदीवानांना प्रशिक्षण दिले.

कारागृहात तेव्हापासून स्वतंत्र मूर्ती विभाग सुरु झाला. कारागृहाला गेल्या वर्षी मूर्ती विक्रीतून तेरा लाखांचे उत्पन्न मिळाले. या कैद्यांनाही चांगला रोजगार मिळाला. गेल्या वर्षी चौदाशे गणेश मूर्ती तयार करण्यात आल्या होत्या. यंदा मोठ्या मूर्तींवर भर असून अधिक उलाढाल होणार आहे.

रक्षाबंधन मेळ्याचे उद्घाटन

बंदीवानांनी केलेल्या गणेश मूर्ती नागरिकांसाठी प्रवेशव्दारावरील प्रगती विक्री केंद्रात विक्रीस उपलब्ध झाल्या आहेत. या केंद्राचे उदघाटन पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते आज झाले. वीस बंदीवानांनी डिसेंबरपासून मेहनत घेऊन एक हजार गणेश घरगुती आणि मंडळाच्या मूर्ती तयार केल्या आहेत. नागरिकांना मूर्ती तसेच सतरंजी, फर्निचर, फिनेल आदी वस्तू विक्रीस उपलब्ध आहेत. कारागृहात दहा कारखान्यात मिळून चारशे कैदी काम करतात. कारागृह अधिक्षक प्रमोद वाघ, वरिष्ठ कारागृह अधिकारी अशोक कारकर, कारखाना व्यवस्थापक पल्लवी कदम, यशवंत फड, सहाय्यक आयुक्त ईश्वर वसावे,नाशिकरोडचे वरिष्ठ निरीक्षक एस.वाय. बिजली, उपनगरचे भारतकुमार सूर्यवंशी, कारागृह उपमहानिरीक्षक बी. एस. टिकारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!