पाण्यासाठी पंचायतीला टाळे

पुणे महामार्गावर मनेगावकरांचा रास्ता रोको; विरोधी पक्षनेते पाटील यांची मध्यस्थी

0

सिन्नर  वार्ताहर तालुक्यातील मनेगाव येथील ग्रामस्थांनी गावाला भेडसवणार्‍या पाणीटंचाईवर उपाययोजना केल्या जात नसल्याच्या निषेधार्थ काल प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. इशारा देऊनही एकही वरिष्ठ अधिकारी गावात न फिरकल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी नाशिक -पुणे महामार्गावर येत रस्ता रोको आंदोलन सुरु करत वाहतूक बंद पाडली. यावेळी ट्राफिक जॅममध्ये अडकलेल्या विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्तीने हे आंदोलन मागे घेण्यात आले. थेट जिल्हाधिकार्‍यांना मनेगावच्या पाणीप्रश्नाबाबत तातडीची बैठक बोलावण्याची सूचना ना. विखे यांनी केली.

भोजापूर धरण पूर्ण भरलेले असताना मनेगाव व परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून पाणीपुरवठ्यासाठी नियोजन करण्यात येत नसल्याने दि.१ सप्टेंबर रोजी तहसीलदारांना निवेदन देऊन ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राजाराम मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार नितीन गवळी यांना यासंबंधीचे निवेदन देण्यात आले होते. मात्र गेले दोन आठवडे परिस्थितीत सुधारणा झाली नाही व प्रशासनाकडून पाणी पुरवठ्याबाबत कोणतीही पाऊले उचलली न गेल्यामुळे काल  (दि.१५) सकाळी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले.

या आंदोलनात सहभागी असणार्‍या ग्रामस्थ व महिला आंदोलकांनी गुरेवाडी फाटा परिसरात सिन्नर बायपास येथे सकाळी ११ वाजता महामार्ग अडवून वाहतूक रोखून धरली. हे आंदोलन सुरु झाल्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी आंदोलकांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिण्याच्या पाण्याशी संबंधित असणार्‍या या आंदोलनाकडे तालुक्यातील सर्वच प्रशासकीय अधिकार्‍यांनी पाठ फिरवल्यानें ग्रामस्थ आंदोलनावर ठाम होते.

महामार्ग ठप्प झाल्याने या आंदोलनाचा फटका राज्याचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील यांना देखील बसला. वाहन गर्दीत अडकल्याने विखे पाटील स्वतः मार्ग काढत आंदोलकांपर्यंत आले. पाणी प्रश्नाबाबत सुरु असलेल्या आंदोलनाची माहिती घेत ना. विखे यांनी तात्काळ जिल्हाधिकार्‍यांशी संवाद मनेगावचा पाणीप्रश्न तातडीने सोडवण्याची सूचना केली. तसेच तालुक्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत तातडीने बैठक घेण्याचे निर्देश दिले.

यानंतर ग्रामस्थांनी हे आंदोलन मागे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याची विंनती ना. विखे यांनी केल्यावर रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. मयूर शिरसाठ, मदन सोनवणे, दिगंबर सोनवणे, राजेंद्र सोनवणे, संजय गांजवे, भाऊसाहेब शिंदे, अनिता सोनवणे, भागाबाई सोनवणे, मधुकर सोनवणे, सुनिता सोनवणे यांचेसह ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते.

 

LEAVE A REPLY

*