Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

काझीगढीवासियांना दिलासा नाहीच; यादी आज जाणार मनपाकडे

Share

जुने नाशिक । प्रतिनिधी

येथील अतीधोकादायक स्थितीत आलेल्या काझीगढी परिसरातील नागरिकांना अद्याप कायमचा दिलासा मिळालेला नाही. ‘आम्हाला कायमची व पक्की घरे मिळत नाही तो पर्यंत येथून जाणार नाही’ अशी ठाम भूमिका घेणार्‍या काझीगढीवरील नागरिकांना चुंचाळे येथे हलविण्यात येणार आहे. मात्र अद्याप त्याला मुहूर्त मिळालेला नाही. एका रेशनकार्डवर किमान दोन घरे तरी मिळावी, अशी मागणी येथील नागरिक करीत आहे.

दरम्यान आज (दि.22) काझीगढी येथील खालील बाजूस राहणार्‍या नागरिकांंची यादी मनपाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे गढीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देऊन व स्थलांतरीत होण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. संततधार सुरू असलेल्या पावसामुळे काझीगढीचा धोका सतत वाढत होता; तर प्रशासनाची डोकेदुखी वाढत होती.

एकीकडे गढी ढासळण्याचा धोका तर दुसरीकडे नागरिकांची जिद्द यामुळे संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी महापालिका व पोलीस प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार तत्काळ काझीगढीवरील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे आदेश दिलेले होते. त्यानुसार कारवाईला सुरुवात करण्यात आली होती.

मनपा शाळा क्रमांक 16 सह गाडगेमहाराज मठ आदी ठिकाणी येथील नागरिकांना राहण्याची सोय करण्यात आलेली आहे. सध्या खालील बाजूचे सुमारे 25 कुटुंब त्या ठिकाणी राहत असले तरी पाऊस बंद होताच पुन्हा गढीच्या खालच्या बाजुला असलेल्या घरांमध्ये येतात. या ठिकाणी जनावरे व इतर साहित्य असल्याने त्यांना कायमची सोय होत नाही तोपर्यंत येथून जाणार कसे, असे प्रश्‍न उपस्थित करीत आहेत.

दोन घर द्यावी
एका रेशन कार्डवर आई-वडिलांसह तीन भाऊ, त्यांच्या बायका व मुले असा परिवार आहे. मनपाकडून मिळणारे घर छोटे असून त्यात पूर्ण कुटुंब राहू शकत नाही. म्हणून मनपाने दोन तरी घरे देण्याची सोय करावी.
– प्रदीप बडगे, नागरिक

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!